Monday, October 26, 2020

साद प्रतिसाद भाग ३

 साद प्रतिसाद

लेखिका --सौ.वैजू फडके. 

       अनेकवेळा ऐकलेली ही शब्दांची जोडी आज एक लिखाणाचा विषय होऊन आली आहे. विषय कळल्यावर दोन दिवस विचार केला व बुद्धीला साद घातली आणि त्याचा प्रतिसाद म्हणजेच माझे हे लिखाण होय. 

             व्यावहारिक अर्थाने साद म्हणजे घातलेली हाक आणि त्याला मिळणारे उत्तर म्हणजे प्रतिसाद. रोज अनेकवेळा व्यवहारात हे चालू असते. उदा. मुले शाळेच्या वेळेत शाळेला जाणे, गृहिणीने बोलावल्यावर जेवणासाठी टेबलाभोवती घरातील सर्व सदस्य एकत्र येणे वगैरे. या साद प्रतिसादात फक्त व्यवहार असतो. 

                साद प्रतिसादाचा खरा अर्थ कळतो  तो भावनिक सादातून आणि त्याला आलेल्या प्रतिसादातून. उदा. लहान बाळाशी आई लाडे लाडे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव आणि त्याचे हुंकार हा त्याचा सुंदर प्रतिसाद असतो. प्रेमाची साद पण यातच मोडते. सिनेमात नायक नायिका अनेक वेळा प्रेमाने साद देतात. 'तुमने पुकारा और हम चले आये.. 'इथे नायक नायिकेच्या सादाला गाण्यातून प्रतिसाद देतो. डोळयातून पाणी येणे हेही एक प्रतिसादाचे उदाहरण आहे. मग ते आनंदाश्रू असोत वा दुःखाश्रू. साद प्रतिसाद हा सकारात्मक किंवा नकारात्मक या दोन्ही स्वरूपात असू शकतो. मात्र नकारात्मक प्रतिसाद हा मानसिक दुःख देणारा असतो. 

            तिसरा साद हा आभासी असतो. लेखकाला किंवा कवीला एखादी गोष्ट साद घालते असे वाटणे. उदा. साद देती हिमशिखरे...या सादाला मात्र प्रतिसाद नसतो. याशिवाय राजकीय तसेच सामाजिक अशी उदा. देता येतात. समाजाला संतांनी जनजागृतीसाठी केलेले आवाहन . यातूनच आषाढी वारी निर्माण झाली. हा एक समाजाचा संतांच्या सादेला दिलेला प्रतिसादच आहे. राजकीय नेते संपाची साद ही विशिष्ठ हेतूने देतात. अनेक लोक एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देतात. हा एक प्रतिसादच आहे. कोरोनाच्या या संकटात लोकांनी मोदींच्या हाकेला भरभरून प्रतिसाद दिला. कोरोना योद्धे म्हणजेच पोलीस, परिचारिका यांना सलामी देताना त्यांच्या सन्मानार्थ विशिष्ट दिवशी लोकांनी टाळ्या वाजवून मोदींच्या सादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

           निसर्गाने साद घालण्याची ही कला पक्षी, प्राणी यांनाही दिली आहे. त्यांनाही वेळोवेळी प्रतिसाद मिळतो. निसर्गातील बदलानुसार काही पक्षी म्हणजे कोकिळा, मोर वेगवेगळे आवाज काढतात. तर काही नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी म्हणजेच तिच्याकडून प्रतिसाद मिळवताना विशिष्ट आवाजात शीळ घालतात. प्रत्येक प्राणिमात्राच्या जन्मदात्रीने विशिष्ट आवाज काढल्यावर पिल्ले तिच्याभोवती जमा होऊन प्रतिसाद देतात. झाडेसुद्धा याला अपवाद नाहीत. लाजळूच्या पानांना स्पर्श केल्यास ती एकदम मिटतात. हा त्यांचा प्रतिसादच आहे. 

         अशाप्रकारे साद प्रतिसाद हा माणूस तसेच प्राणीपक्षी , झाडे यांच्यात आढळतो. माणसाने मात्र त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत. असा हा साद प्रतिसाद असेल तरच ही वेगवेगळी नाती बहरुन येतात आणि फुलतात.

vaijuphadake23@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

साद-प्रतिसाद

लेखिका-सौ.सीमा उरूणकर

 "वाचवा ,वाचवा मला कुणीतरी "पूजा सैरावैरा या खोलीतून त्या खोलीत जिवाच्या आकांताने धावत होती. आणि तो धारदार शस्त्राने वार करीत तिच्या मागे धावत होता. ती मदतीसाठी बाल्कनीतून साद घालू लागली .पाचव्या मजल्यावरचा हा प्रकार खाली वॉचमनने पहिला .प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीत, ओरडत, बाकीच्यांना साद घालत तो वर धावला .अपार्टमेंट मधील सर्वांनी पूजा ला तातडीने मदत केली. समोरच असलेल्या' ॲस्टर आधार' हॉस्पिटल मध्ये मध्ये तिला नेले .पण डॉक्टरांपर्यंत पोहोचल्यावरच तुटक- तुटक त्याचे नाव सांगत अखेरचा श्वास घेतला. सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे हा सर्व प्रकार पूजाच्या चार वर्षांच्या स्वरा समोर घडत होता. ती रडत रडत त्या दादाला म्हणत होती "दादा नको मारुस माझ्या आईला, दादा, दादा" आणि त्याच वेळी पूजा तील एक 'आई' स्वराला पळून जाण्यासाठी सांगत होती. ही होती स्वतःच्या जिवाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी ची तीव्र प्रतिक्रिया!! गेले सहा महिने त्याच दादाच्या फॅमिलीला त्याच्या आईचा अपघात होऊन पायाला दुखापत झाल्याने हीच पूजा जेवण देत होती. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते .त्यानंतर लहानग्या स्वराची कोर्टासमोर चार वेळेला साक्ष झाली. एवढी किती पोर प्रत्येक वेळी जशीच्या तशी घटना सांगत होती. त्याची ही जबानी झाली पण पोलिसांच्या ताब्यात असलेला तो एक बाल गुन्हेगार होता सज्ञान होण्यासाठी म्हणजे सोळा वर्ष पूर्ण होण्यासाठी चार महिने बाकी होते .स्वराचे बाबा, देवगडला असणारे काका मोठ्या आशेने न्यायासाठी व असे त्याने का केले, यासाठी पोलिसांकडे येत होते. पण... प्रतिसाद शून्य! याचे उत्तर कदाचित माहिती असूनही प्रतिसाद शून्य !!कोल्हापूर मध्ये ठळक अक्षरात मोठी बातमी झळकली. महिलांनी, दक्षता समितीने मोर्चे काढले, न्यायासाठी साद घातली.. पण..... प्रतिसाद शून्य! थोड्या दिवसांसाठी त्याला बालसुधारगृहात पाठवले .काही दिवसांनी बाहेर येऊन तो आता मस्तपैकी फिरतोय पण स्वराचे काय तिचा बाबां पुढे अगणित प्रश्न...  त्या घटनेने अतिशय रडकी, त्रास देणारी स्वरा एकदम शांत झाली ,अबोल झाली .सतत आई लागणारी ती देवगडला काकू सोबत राहू लागली. मग तिच्या कडे बघून नातेवाईकांचे काळीज आक्रंदन करू लागले आणि स्वराच्या बाबांचा पुनर्विवाह करण्याचे नियोजन झाले. खरच, कोणाच्याही जीवनात केव्हा, कसा, किती आणि कोणता पालट करायचा याचं गणित केवळ आणि केवळ ईश्वराच्या हातात असतं याची प्रचिती आली. स्वराला नवीन आई येताना एक छानशी मोठी बहिण  घेऊन आली. नवी आई म्हणजे साक्षात पूजाच! अत्यंत सुसंस्कारित, कुशल, अध्यात्मिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत प्रेमळ, नावाप्रमाणेच सतत खळखळून हसणारी स्मिता!!!! पुनर्विवाह पुनर्जन्मा सारखाच ठरला!!!!! दैवी साक्षात्कार झाला .!! त्यांचे आयुष्य आता कुठे पुन्हा सुरळीत होऊ पाहत आहे पण या घटनेमुळे मनात अनेक प्रश्न साद घालीत राहू लागले ....16 वर्षांच्या मुलाने इतके क्रूरपणे अघोरी कृत्य का बरे केले असावे? "काकू काकू" म्हणून नेहमी बोलावणारा भर दुपारी तीन वाजता घरात येऊन  धारदार शस्त्र काढून सपासप वार करतो म्हणजे या गुन्हेगारी प्रवृत्ती मागे विकृती होती का की ब्लू व्हेल सारखा हा ही एक भयानक खेळ आहे ?नंतर तर ऐकिवात आले, की सध्या कमी वयाच्या मुलांचा गुन्ह्यात असा वापर करण्याचे टेक्निक आलेले आहे. असे आता कित्येक गुन्हे घडू लागले आहे. या प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांमध्ये 'अळीमिळी गुपचिळी' सारखा प्रकार कधी थांबणार ?अशा प्रकारच्या पोलिसांची संख्या आपल्याकडे जास्त आहे, की कर्तव्य निष्ठेने सेवा बजावताना वीरगती प्राप्त होणाऱ्यांची? यांना बालगुन्हेगार म्हणत असताना यांचे हे गुन्हे खरंच बालां सारखे असतात का? केवळ ते बालगुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्यांना सोडून देऊन चालेल का? हल्ली समाजात असे बालगुन्हेगार, त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे याला सोशल मीडिया ही जबाबदार आहे का? यासाठी आपली आणि समाजाची डोळस, वैचारिक कृतिशील जबाबदारी कोणती ?या अशा विचारांच्या सूक्ष्म- सूक्ष्म जाळ्यात प्रतिसादात्मक उत्तरे अंधुक अंधुक दिसू लागली आणि पानावरच्या दवबिंदू परी मनातच विरून जाऊ लागली ,मनातच विरून जाऊ लागली....

seemaurunkar@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

                 साद-प्रतिसाद

लेखक-   सौ सुषमा कौस्तुभ दातार

        गेले दोन तीन दिवस सोशल मीडियावर आणि सर्व न्यूज टीव्ही न्यूज चॅनेलवर एकाच विषयाची चर्चा सुरू आहे ते म्हणजे अभिनेता सुशांत सिंग रजपूत ने केलेली आत्महत्या. त्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एवढी प्रसिद्धी, पैसा सर्वकाही असताना तो डिप्रेशनमध्ये का गेला असावा? आत्महत्या करण्यासारखे काय घडलं असावं त्याच्या आयुष्यात?  त्याने कोणाला साद घातली नाही की  त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही?  साद घालण्यासारखं कोणी नव्हतं का त्याच्या आयुष्यात? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

        मला वाटतं या क्षेत्रातील माणसांना अपयशाची भीती वाटत असावी. त्यांना मिळणारी प्रसिद्धी, लोकांना त्यांचं असलेलं आकर्षण याचीही एक झिंग असते. ती प्रसिद्धी कायम राहील की नाही,  पुढे काम मिळेल की नाही याची भीती असते त्यांच्या मनात. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात असे चढ-उतार up and downs हे असतातच, अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या उद्योगपती, सेलिब्रिटीज पर्यंत सर्वांच्याच. अमिताभ बच्चन हे याचे ज्वलंत उदाहरण.

        आपल्या मनातील प्रश्न,  कोलाहल, भीती बोलण्यासाठी आपल्याजवळ आपल्या आयुष्यात एक तरी माणूस पाहिजे. मग ते मित्र-मैत्रीण असो, बहीण असो अथवा अन्य कोणीही की जे आपलं म्हणणं ऐकून घेतील,  त्यांची चेष्टा करणार नाहीत, चारचौघात त्याची चर्चा करून खिल्ली उडवणार नाही. आपण साद घातली तर त्याला योग्य प्रतिसाद  देणार कोणीतरी असलं पाहिजे.

        पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेक माणसं घरात असायची. सर्वांचे आयुष्य साधं, सरळ, सोपं होतं,  गरजा कमी होत्या,  राग, लोभ, प्रेम सर्व मोकळेपणानं व्यक्त व्हायचं. पण आता घरात इन मीन तीन माणसं,  हम दो हमारा एकच !प्रत्येकाला स्वतंत्र खोली. प्रत्येक जण आपापल्या खोलीत बसून लांब जगाच्या कोपर्‍यात असलेल्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे बोलतील पण समोरासमोर बसून एकमेकांशी शब्दांनी बोलून संवाद साधणार नाहीत. ' संवादशैली 'लोप पावेल की काय अशी काही वेळा भीती वाटते.

        आम्ही लहान असताना सर्व भावंड एकत्र खाली गाद्या घालून झोपायचो. झोपताना सख्ख्या,  चुलत बहिणींना,  भावांना खुसूखुसू गुपित सांगितलं जायचं, मन मोकळं व्हायचं. पण आज मात्र माणसं समोरच्याशी बोलतच नाहीत. भांडणासाठी, ओरडण्यासाठी का होईना पण त्यांनी बोलावं असं काही वेळेला वाटतं. प्रवीण दवणे म्हणतात त्याप्रमाणे भावनांनी ठासून भरलेली कोठारच ही. 

        प्रत्येक वेळी आपण साद  घातली की शब्दांनी प्रतिसाद मिळावा असं नाही. नुसतं आपलं म्हणणं ऐकून घेणं हा सुद्धा मोठा प्रतिसाद असतो. हल्ली मुलांना काही शेअर करायची सवय राहिलेली नाही, नकार पचवता येत नाही.  घरात एखाद दुसरच मुलं असतं. मुलांनी साद घालावी की प्रतिसाद द्यायला आई-वडील तत्परतेने तयार असतात, मुलाचा प्रत्येक शब्द झेलला  जातो. मग एखाद्या सादाला नकारात्मक प्रतिसाद आई-वडिलांकडून मिळाला की झालं, एखादी वस्तू देणार नाही,मोबाईल देणार नाही की लगेच आत्महत्या. अरे,  इतकं स्वस्त आहे का आपलं  आयुष्य !यापेक्षा कितीतरी मनाविरुद्ध प्रतिसाद पुढच्या आयुष्यात पचवायचे असतात. हे बिंबवण्यात पालक कमी पडतात की काय? मुलांवर प्रेम जरूर करावं पण त्यांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या दुर्बल करू नये. सोशल मीडियावर आपण केलेल्या पोस्टवर लाईक्स आले नाहीत,योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर अस्वस्थ होणारी माणसं आहेत.

        समाजात वावरताना दहापैकी सात लोक हे  आपल्याला योग्य प्रतिसाद  देणारे असतातच असं नाही हे स्वीकारायला हवं म्हणजे समोरच्याने प्रतिसाद दिला नाही तरी आपण अस्वस्थ होणार नाही. यासाठी मुलांची जडणघडण तशी व्हावयास हवी. घरात आजी आजोबा हवेत,  नात्याची माणसं हवीत, फॅमिली फ्रेंडस हवेत. मुलांना आपला धाक नसावा तर वातावरण मैत्रीचं असावं.

        तसेच आपणही एखाद्या गोष्टीला,  प्रसंगाला प्रतिसाद देताना,  प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक द्यायला हवी. आपल्याला सर्वच गोष्टी नीट माहीत नसतात. काही वेळा अर्धवट, चुकीची माहिती असू शकते. आपल्या प्रतिसादाने समोरच्यावर काही नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना याचा विचारही आपण कमेंट्स करताना करावयास हवा. आपल्या वागण्या बोलण्याचा नकळत परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. त्या माणसाच्या भूमिकेतून विचार करावयास हवा अर्थात हे वाटते तितके सोपे नाही.

       "मोडून पडलं घर पण मोडला नाही कणा

        पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा"

                  कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या कवितेप्रमाणे नुसतं 'लढ 'म्हणणार कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हा दिलासा,  हा प्रतिसाद खूप मोठा असतो.

sushamakdatar@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

             साद - प्रतिसाद

लेखिका-- डॉ अनुराधा कुलकर्णी.

८-९वर्षांपूर्वची गोष्ट आहे ही! मी व माझा भाऊ-- दादा, श्रेष्ठा ट्रॅव्हल्सतर्फे कैलास  मानसरोवर यात्रेला गेलो होतो.'श्रेष्ठा'ची अवस्था 'नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा 'अशी होती. श्रेष्ठाची लोकं सर्वात शेवटी सोडली जात. त्यातच आमचा लीडर, अमित कुलकर्णी आजारी पडला. त्याला परतावं लागलं. सर्व सूत्रे शेर्पा शांगे याच्या हातात आली.

     उंचावर जाऊ लागल्यावर काहीतरी विचित्रच  होत होतं. Mountain sickness म्हणतात त्याला. खाऊ नये असं वाटतं ,दमायला होतं. सूप व  चहा, कॉफी, गरम पाणी बरं वाटतं आणि  सारखं घ्यावच लागत! रोज सकाळी lasix ची  गोळी देतात. मानसरोवर दर्शन व स्नान केलं! अतिशय थंड पाणी! चार तांबे घेतले तरी हुडहुडी भरली! पण स्फटीकासारखं स्वच्छ पाणी होतं, नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा होता.  तिथल्या टेकडीवरील बुद्धाचं दर्शन घेऊन  कैलास 

परिक्रमेला निघालो.

    दारचेनहून सुरू होते परिक्रमा. कैलास हर ठिकाणाहून वेगळाच भासतो.... भव्य,आदरणीय! निःशब्द होतो आपण!  एक वेगळीच शांतता जाणवते.यमद्वारातून  पुढे चालणं सुरू झालं.देरापुक येथे आलो.  संध्याकाळ झाली होती.तेथून कैलासाचे दर्शन  होत होतं--भव्य, स्पष्ट, अद्भूत!चरणस्पर्श करून आलो.   अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं! मनं तृप्त झालं. 'याचसाठी केला होता अट्टाहास!' रात्री तिथे मुक्काम होता.  

     दुसऱ्या दिवशी खरं तर मोसम खूप आल्हाददायक होता, favourable   होता.भारतसरकाचं पथक आमच्यासमोरच दोलमापास व गौरीकुंडसाठी गेले. शांगेच्या खूप विनवण्या करून सुध्दा काही उपयोग झाला नाही.  कैलाशला मनात साठवतच दारचेनला परत आलो. मन  खूप खट्टू झालं.

दुसऱ्या दिवशी नंदीपर्वत व जैनांचे 

ऋषभदेव यांची अष्टपद परिक्रमा होती. सकाळी लवकरच निघालो.  मनात पक्कं ठरवलं होतं, नंदीपर्वत व अष्टपद करायचचं! गाडीतून उतरल्यावर शांगे  देवाची प्रार्थना करीत असताना त्याला सांगून आम्ही ६-७जण निघालो. सोबत कृष्णा म्हणून दिल्लीचा एकजण professional trakerहोता.  त्याच्या भरवशावर आम्ही निघालो. तो तिथूनच Everest  basecampला जाणार होता.  हवामान खूप चांगलं होतं. अष्टपद समोरच दिसत होता. भव्यता डोळे दिपवून टाकत होती. कैलासचा वेगळाच नजारा दिसत होता! अष्टपद जवळच भासला तरी लांब होता तो!  पुढे निघालो नंदीपर्वताकडे. बाकी  सर्वजण तिथेच थांबले ,दादासुद्धा थांबला. कृष्णा व मी पुढे निघालो. थोडं पुढे गेलो आणि हवामान एकदमच बदललं. वारा सुटला, पावसाचे थेंब पडू लागले. 

मुंगुसासारखे दिसणारे प्राणी ओरडू लागले. त्यांना आपल्याआधी चाहूल लागते म्हणे! हिमालयात आपलाच हेका चालवायचा नाही ,असं सगळ्यांनी बजावलं होतं.

 नंदीपर्वताला  नमस्कार करून परत फिरलो.

    समोरून एक तरुणी व एक शेर्पा उतरताना दिसले. ती रशियन होती. इकडेतिकडे हरवायला नको म्हणून त्यांच्यामागे उतरू लागलो. जिथून चढायला लागलो होतो तिथे आलो. पण दुसऱ्या मार्गाने!

     आता पंचाईत झाली, बरोबरचे दुसऱ्या बाजूला होते टेकडीच्या. कृष्णा म्हणाला, ते गेले असतील. पण मला दृढ विश्वास होता,दादा मला सोडून जाणारच नाही! परत फिरलो त्याला शोधायला. मोसम खराबच होता! आम्ही दोघंही 'दादा,दादा 'अशा हाका  जोरजोरात मारताच होतो खूप अस्वस्थ वाटू लागलं.  पाचच मिनिटात डोळ्यासमोर नाही नाही ते तरळून गेलं.  मन चिंती ते वैरी न चिंती! आणखी पुढे गेलो.हाक मारीतच होतो.खरोखर प्राण कंठाशी आल्यासारखं झालं. रडू यायला लागलं...... आणि, आणि दादानी   'ओ ' म्हटलं!  सादाला प्रतिसाद दिला! काय सांगू तुम्हाला! डोळे आपोआप झरू लागले.  आवाजाच्या दिशेने तो उतरून आला. २ मिनिटे बोलूच शकलो नाही. घालमेल थांबली. त्याला कळेना मी का रडतोय ते. पाऊस सुरू झाल्यावर बाकीचे परतले,हा तेवढा थांबला होता आमची वाट पहात!

    वेळ न दवडता परत फिरलो. गाडीजवळ आल्यावर सर्वांनी घेरलं व भडिमार केला. किती उशीर, बाकीच्यांची पर्वा नाही,वगैरे वगैरे.  त्यांना सर्व सांगितले. हवामान आता एकदम निवळले होते व आमच्या मनावरचे मळभही! यात्रेचा शेवटचा दिवस होता तो!

     पण तो साद व त्याला मिळालेला प्रतिसाद, मनाची घालमेल----न  विसारण्याजोगे!

   जय कैलाशनाथ!

  बम बम भोले!

anuradhakul1961@gmail.com

🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻

                  "साद-पडसाद"  

          लेखक--पल्लवी गोलंगडे                                                हा विषय मांडत असताना माझं मन व बुद्धी एकमेकांशी द्वंद्व करायला लागले.माझ्या बुद्धीवर मनानं विजय मिळवला.माझ्या आंतरिक मनाच्या प्रतिसादामुळे मी हे विचार मांडू शकले.

तान्हुलं रडत रडत जन्माला येतं पण तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं.तुम्ही त्याला छातीशी घेता तेव्हा त्याला तुमच्या हृदयाची भाषा कळते. तुम्ही त्याच्याशी बोलतात तेव्हा ते टुकुर टुकुर बघत असतं. तुमचा स्पर्श,आवाजाला ते प्रतिसाद देतं. त्याच्याशी बोलू लागला की कधी हुंकार देतं तर कधी खळखळून हसतं. मोठं होऊ लागताच त्याची नजर तुम्हालाच शोधू लागते. अंगाईगीत गाता तेव्हा शांत झोपून जातं. एखादा शब्द बोलणारं हे बाळ आपण त्याच्यात इतके गुंगून जातो की ते कधी मोठं होतं कळतच नाही. हे मुल उद्या शिकून मोठं होतं तेव्हा आई-वडिलांचे डोळे आत्मिक समाधानाने पाणावतात.

आईचं वात्सल्य व बाळाची ममता असणारी अनेक उदाहरणे आहेत.वाघाच्या  हल्ल्यातून हरिणाचे पाडस बचावतं त्यावेळी आईच काय इतर सहकाऱ्यांच्या डोळ्यातील भाव बघून त्यांच्याबरोबर आपल्यालाही गलबलून येतं.नजरेआड होणाऱ्या वासराच्या शोधासाठी हंबरून गाईने घातलेली आर्त साद , सैरभैर झालेली ती आणि अचानक तिच्या नजरेसमोर आलेले वासरू एकमेकांकडे धावत सुटतात.ती त्याला चाटून जवळ घेते.तेही तिला बिलगते.

निसर्गाने मानवाला घातलेली साद ,पावसाचे थैमान ,महापूर ,अस्वच्छ पाण्यामुळे होणारी रोगराई वादळ, त्सुनामी यासारख्या घटना. दुष्काळ ,भूकंप , उष्ण वाऱ्याच्या लहरी ,पेट घेतलेले ॲमेझॉन जंगल या सर्वांमुळे होणारे नुकसान म्हणजे मानवाने स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाडच आहे .मानवाने इंधन ज्वलनातून ,जंगलतोडीतून आपल्या प्रगतीसाठी निसर्गाचा केलेला गैरवापर त्यातून उमटणारे हे पडसाद आहेत. निसर्ग तुमचा मायबाप आहे हे ओळखून किरण राव ,मेघा पाटकर यांनी पाणी फाउंडेशन, नर्मदा बचाव यासारखे मोठे प्रकल्प राबवले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ ,बाबा आमटे अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्याचे सुंदर रूप आपल्या नजरेसमोर आहे.

आदिम काळात भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा आदिवासी आपल्या लोकांना संकटाच्या वेळी, आनंदाच्या वेळी, दुःखाच्या वेळी विशिष्ट प्रकारचा आवाज करून साद घालीत असत त्यातून सर्व समूह एकत्रित होत असे.

महात्मा गांधींनी दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह या कामासाठी  अहिंसेच्या मार्गाने जाऊन जनतेला साद घातली व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणात सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ध्येयाला गवसणी घालण्याचे ठरवले होते .कोंढाणा ,रायगड, जावळी काबीज करत त्यांनी अनेक किल्ले जिंकले.भारत वर्षातील श्रेष्ठ आचार्य गुरु द्रोणाचार्य यांनी आपल्या सर्व शिष्यांना श्रेष्ठ विद्या दिली पण शिष्याकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादातून अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर निर्माण झाला. डॉक्टरने पेशंटला घातलेली साद व डॉक्टरांच्या स्पर्शाने पेशंटला धीर मिळतो आणि त्याच्याकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादामुळे तो लवकर बरा होतो. त्याचप्रमाणे पशू-पक्षीही जोडीदाराला मोहित करण्यासाठी साद घालीत असतात.

सखी ही तर कितीही दूर असली तरी टेलिपॅथी सारखी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिची साथ असते. मनाच्या कोपऱ्यात तिची जागा असते.आपल जीवन तिने किती खोलवर व्यापले आहे तेवढ्याच खोलवर आपणास प्रतिसाद मिळतो.

"पांडुरंग कवा भेटल , अंवदा वारीला जायला भेटल की नाय ?ज्ञानबा तुक्याच्या पालखीचे दर्शन होणार का नाय? चार घास सुखानं खायला मिळायचं देवा तवा तुम्ही रुसलात तर या पामराने बघायचं तरी कुणाकडं" अशी भक्तांची आर्त साद विठूमाऊली पर्यंत पोहोचतेच. देव कुठल्या न कुठल्या रूपात त्यांना भेटत असतो. "आपल्या लेकरा- बाळावर त्यांचा अशिर्वाद हाय" या मिळणाऱ्या अनुभूतीमुळे देवाचे नामस्मरण सतत त्यांच्या मुखी असते.

श्री ज्ञानदेवांच्या हाकेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही .लोकांनी त्यांना वाळीत टाकले तेव्हा त्यांना संतत्व ,श्रेष्ठत्व सिद्ध करायला लागलं यासारख्या घटनांतून वाल्याचा वाल्मिकी झाला हा प्रतिसाद योग्य वेळेला मिळाला तर चांगलं कार्य निर्माण होऊ शकते.

थोड खट्ट झाले तरी माझ्या लायकाचे केस उभारतात डोळ्यात जरब धाक असते पण माझ्या स्पर्शाने त्याच्यात लीनता येते व शेपटी हलवून व्यक्त केलेल्या प्रेमाला त्याचा तो प्रतिसाद असतो मला एकदा छोटा एक्सीडेंट झाला.मी छोट्या खड्ड्यात पडले तर एखाद्या बॉडीगार्ड सारखा उभा होता . दोन पाय छातीच्या दोन्ही बाजूला होते व त्याच्या डोळ्यातील भाव असे होते की तुला काय झाले ?उठत का नाही आहेस !तुम्ही दिलेल्या प्रेमाची परतफेडच असते हे मी अनुभवलेलं आहे. तुम्हाला पुस्तके, निसर्ग साद घालतो.तुमचे मित्र बनायला सगळे तयार असतात पण मला वाटते तुम्ही किती जणांना योग्य प्रतिसाद देऊ शकता......?

Gulmohar. builders @ gmail.com


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मायबोली_इचलकरंजी

Friday, October 23, 2020

साद प्रतिसाद भाग २

     *साद-प्रतिसाद*
    © डाॅ.श्रुती

      अशी किती तरी उदाहरणं आहेत की त्यात आपल्याला प्रत्यक्षात कोणीही साद घातलेली नसते अन्  प्रतिसादाची अपेक्षाही कोण करत नसतं.पण तरीही या साद- प्रतिसादाच्या क्रिया नकळत  एकमेकांकडून घडतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत होईल असंही नाही हं! ज्याला त्याची साद जाणवली तोच त्याला प्रतिसादही देतो.
तुझ्या स्पर्शाने जागी होते सृष्टी सारी,
दारी सडा-रांगोळी ही तुझ्याच आगमनाची तयारी.
      सुर्य नेहमीच उगवतो पण आपल्यातले ठराविकजणच  सकाळी लवकर उठून सडा-रांगोळी करून त्याला प्रतिसाद देतात.नाहीतर ८-९ पर्यंत झोपणारेही आहेतच की.खरंच किती सुख मिळत ना सकाळी-सकाळी अंगणात वावरताना.दूर कुठुन कोकीळेचा आवाज साद घालत असतो.तर कधी पारिजातकाच्या फुलांचा सडा आपल्याला साद घालुन जवळ बोलवत असतो.  
कोपऱ्यात बसूनही,सिमेंटच्या चौकटीत राहूनही,
आमचा पारिजातक सगळ्यांनाच खुणवायचा,
रोज सकाळी फुलांचा सडा पाडायचा.
     वेगवेगळी फुलं,पानं,पक्षी किती जण साद घालत असतात आपल्याला.
*अचानक तो जवळ आला,*
*काही वेळातच त्यांना मोहून टाकलं,*
*दोघांचं काहीच नातं नसलं तरी;*
*डोळे त्याच्या शोधात निघाले*
         *तो होता-"सुगंध".*
    या अंगणातील सुगंध हवेत दरवळताच आपण आपल्या आवडीच्या सुगंधाकडे नकळत आकर्षिले जातो.त्याच्या शोधात निघतो.त्या सुगंधाला आणि त्याच्या रूपाला प्रतिसाद देणारे आपण एकटेच नसतो बरं का! फुलपाखरं आधीच पोहचलेली असतात.मग ही फुलपाखरं आपल्याला साद घालतात आणि आपण त्यांना पकडण्यासाठी धडपडू लागतो.आनंदाने बागडु लागतो.
*तुला शोधण्यासाठी नजर जाते माझी दूरवर,*
तू कधी या फुलावर, तर कधी त्या फुलावर.*
पिवळा, जांभळा, निळा, तपकिरी रंग तुझा मखमली.
इवल्याशा हातांना झाली तुला पकडण्याची घाई.
      किती आकर्षक रंग असतात ना या फुलपाखरांचे.त्यांनी साद घातली अन् आपण त्याला प्रतिसाद  दिला नाही असं होईल का?अशीच प्रतिसाद देण्याची घाई आपण करतो, जेंव्हा काळे ढग दाटून येतात तेंव्हा.काही बाहेर राहिलय का?भिजण्यासारखं असेल तर त्याला आत आणण्याची लगबल.
तो ढग बघ कसा आतुरलाय,मातीत मिसळण्यासाठी वेडापिसा झालाय.
         वैशाखात भाजुन निघालेली ही जमीन थंडगार होण्यासाठी या ढगांना साद तर घालत नसेल ना?मग पाऊस पडला की सगळं कसं थंडगार होतं.
पहिला पाऊस पडला की सगळं आहे तिथंच ठेवायचं,
पावसात जाऊन मनसोक्त भिजायचं.
       पहिला पाऊस कोणाला साद घालत नाही हो!आवडतच ना सगळ्यांना भिजून प्रतिसाद द्यायला.कवि लोकांना तर पावसाळा म्हणजे एक उत्सव!ते कविता करून या पावसाला प्रतिसाद देतात.त्यांच्या आठवणीत रमतात.
आठवणी असतातच अशा प्रसंगानुसार आठवण्यासारख्या,
काही क्षणातच हसवून किंवा रडवून जाण्यासारख्या.
       बसमध्ये खिडकीकडेला एकटं बसलेलो असताना या आठवणी आपल्याला साद घालतात. प्रतिसादात आपल्या डोळ्यातून कधी अश्रू ओघळतात तर कधी गालावर हसू उमटतं.
थोड्यावेळात आठवणी मागं पडतात आणि लक्ष बाहेरच्या सृष्टीवर पडतं.
खिडकीकडेची जागा त्यातून येणारा थंडगार वारा,
चहु दिशेने पसरलेला सृष्टीचा हिरवागार नजारा.
         हा नजाराच साद घालत असेल म्हणूनच तर त्याच्या प्रतिसादात आपण खिडकीकडेची जागा पकडण्यासाठी धावत असतो.आपल्या बाजूच्या खिडकीतून नदी दिसली तरी आपलं समाधान होत नाही. पलीकडच्याच्या खिडकीतूनही नदीची दुसरी बाजू बघण्याची आपली धडपड चाललेली असते.संथ वाहणारी नदी बघितली की किती समाधान मिळतं.समुद्रही या नदीला साद घालत असेल का?
निळा समुद्र तिला खुणावे ये मज भेटीला
डोंगर दर्या पार करून आली तुजला भेटाया.
        समुद्राला प्रतिसाद देण्यासाठीच तर ही नदी डोंगर- दर्या,खाच-खळगे सगळं पार करून धावत-पळत समुद्राकडे निघालेली असते.समुद्रकिनारा तर प्रत्येकाला हवाहवासा.वेगळाच आनंद मिळतो.समुद्र, नारळाच्या झाडांची रांग आणि तिथं जर राधा-कृष्णाचं मंदिर असलं तर..तर वातावरणात नवचैतन्य निर्माण होतं.निसर्ग आणि देवाचं सानिध्य शारीरिक, मानसिक थकवा दूर करुन मन:शांती देतं.राधा - कृष्णाची सुबक मूर्ती न्याहाळत असताना मन गोकुळात जाऊन पोहचतं.कृष्णाच्या बासरीच्या आवाजाचा कानोसा घेत राधा, कृष्णाच्या मागं कशी धावत असेल या विचारांत माझं मनही राधा - कृष्णाच्या मागं धावू लागतं.
साद घालुनी बासरीची सखा कृष्ण तीला खुणावे,
मग बावरी ही राधा त्याच्याच मागे धावे.
    इचलकरंजी.
shrutiapatil93@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
            *साद-प्रतिसाद.* 
लेखिका-सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर.
               साद-प्रतिसाद हा विषय कट्ट्यावर आला आणि मी विचार करू लागले. खरतर काहीच सुचत नव्हते. हे ही येता जाता विचारायचे, काही लिहिलंस का ग? 
मला एकदम पू. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधले रावसाहेब आठवले, जे पू.ल. ना सारखे सारखे 'झाली का स्टोरी' असे  विचारत होते. 
गंम्मत वाटली. 😀
'हे इंसां तू दे साद,
मिलेगा तुझे प्रतिसाद।
ध्वनी के साथ सुनेगा,
प्रतिध्वनी का नाद'।
            किती सुंदर ओळी आणि आताच्या परिस्थितीला अगदी योग्य.खरं तर निसर्ग आपल्याला खूप भरभरून देत असतो.  पण माणसांला सतत जादा काहीतरी हवे असते. तो एकमेकांशी ईर्ष्या करत असतो. 
        वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करतो. त्यातूनच या कोव्हिड १९ चा जन्म झाला. आज तो मानवाच्या हातून निसटला आहे. त्याने सगळीकडे हाहाःकार माजवलाय. सगळे देश या संकटाला तोंड देत आहे.
          आपला देश गरीब आहे. चीन सोडता सगळ्या जगाची मिळून होईल, तेव्हढी लोकसंख्या एकट्या भारताची आहे. 
              या साठी मोदीजी सगळ्यांना मदत करण्याची विनंती करत आहेत. प्रत्येक जण फुल ना फुलाची पाकळी देऊन खारीचा वाटा उचलत आहे.
      अशा मध्ये आपली फिल्म इंडस्ट्री ही मागे नाही, खूप मनापासून काम करीत आहे. 
लाखो परप्रांतीय मजदूर मुंबईत अडकले होते. प्रत्येकाला आपापल्या घरी जायची घाई होती. त्या लोकांसाठी *सोनू सूद* देवता बनून आला. आज पर्यंत त्याने ३०,००० च्या वर लोकांना सुरक्षित घरी पोचविले आहे.  
*अक्षय कुमार* ने २५ कोटी रु. 'P M .Care fund'  ला दिले. *अमिताभ बच्चन* यांनी कल्याण ज्यूवेलर्स, सोनी पिक्स यांच्या सहकार्याने एक लाख फ़िल्म इंडस्ट्रीशी निगडित कामगारांची जेवणा खाण्याची व्यवस्था केली. 
     अशी खूप जणांनी छोटी-मोठी मदत केली. 
५-६ वर्षा पूर्वी मी लेह लडाखला गेले होते. तेंव्हा आमच्या बरोबर एक गाईड होता. त्याचे नांव अमीर खान . 
        आपल्या हिरो आमिर खान पेक्षा ही हा देखणा. हा मुलगा 'दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स' मध्ये शिकत होता. जिथे मनमोहनसिंग, अमर्त्य सेन यांच्यासारखे प्रख्यात अर्थतज्ज्ञ शिकले. 
       मी अमिरला विचारले, 'अरे मग तू गाईड म्हणून का काम करतोस'?  त्याने जे उत्तरं दिले, ते ऐकून मला त्याचे खूप कौतुक वाटले. 
तो म्हणाला, 'ये मेरा कश्मीर, कारगिल बहुत सुंदर है। मुझे ये सुंदरता आपतक पहुचांनी है और उसे सलामत रखना है। यहां की गरिबी दूर करनी है। जबतक ये आर्टिकल ३७० नहीं हटेगा, यहां  तरक्की नही होगी। मैने और मेरे  दोस्त लोगोंनें अपनी मिट्टी को वचन दिया है, हम यंहा तरक्की करके ही रहेंगे'। 
माझ्या मनात आले, ही त्याला त्याच्या मातीने घातलेली सादच आहे.
किती विश्वास.  
                मला एकदम आमचा काळूराम आठवला.  काळाभोर, देखणा असा हा आमचा लॅब्रॅडोर. त्याचे नांव आम्ही ब्लॅकी ठेवले होते. मी त्याला प्रेमाने काळूराम म्हणायची. 
               आमच्या घरी आला, तेंव्हा तो जेमतेम एक महिन्याचा होता. तेंव्हा त्याचे ते घाबरलेले डोळे पाहून मला एकदम भरून आले. मी त्याला जवळ घेतलं आणि तो पण लगेच मला बिलगला. 
            मी जिथे असे तिथे तो माझ्या पायात येऊन बसत असे. रात्री तर सगळे झोपले, की तो मला उठवत असे व छानपैकी माझ्या मांडीवर झोपत असे. त्याच्यासाठी मी चक्क महिनाभर जागरण सुद्धा केले. 
                पुढे तो मोठा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी खाली पिंजरा केला आणि तो तिथेच राहू लागला. 
          त्याची माझ्या मुलीशी व सासूबाईंशी खूपच गट्टी होती. तो मोठा झाल्यावर मी मात्र कधीतरीच त्याच्यावरून हात फिरवत असे. 
                        तो ही शांतपणे त्या दिवसाची वाट पहात असे. एकदा चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहीले व काळूराम पळून गेला. थोड्या अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात आत जाऊन बसला. 
          दिवसभर माझी मुलगी व सासुबाई शेताजवळ जाऊन त्याला हाका मारत होते. तो काही बाहेर येईना.  
     मी मुलीला म्हंटले, अगं मी जाऊन बघू का? तसे त्या दोघी म्हणाल्या, 'तुझं कुठं त्याच्याशी एवढं सख्य आहे? आम्हाला बधत नाही, तो तुला काय बधणार'? 
संध्याकाळ झाली तशी मला पण त्याची काळजी वाटू लागली. मी ह्यांना घेऊन शेताकडे गेले. 
      काळू महाराज शांतपणे शेतात  बसले होते. मला पाहिल्या बरोबर, त्यानं तोंड फिरवलं. मी थोड्या मोठ्यानं 'काळू-राम काळू-राम, येरे राजा. चल घरी जाऊया', अशा दोन तीनदा हाका मारल्या. 
            आणि काय आश्चर्य, तो पळत पळत येऊन मला बिलगला. जणू त्याचा माझ्यावरचा राग पूर्ण गेला होता. मला धन्य धन्य वाटलं. 
साद ही फक्त एकमेकांना घातलेलीच असते असे नाही तर मनाने अंतर्मनाला घातलेली ही साद च असते. 
         त्याचे प्रतिसाद ही मनातच उमटतात.
सोनू सूद, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन याना त्यांच्या अंतर्मनाने घातलेल्या सादे ला हा प्रतिसादच आहे. 
                            इचलकरंजी.
vijaybenadikar@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

"साद – प्रतिसाद " 

लेखिका -सौ. हेमा दत्तात्रय देशपांडे

“सुप्रभात हेमाराणी ! उठताय ना?” “हेमाराणी!”, किती गोड साद! वाटलं, ऐकतच रहाव ! तोही प्रतिसादच होता माझा ! तोपर्यंत पुन्हा साद आली , "हेमलता , उठ आता !” आता मात्र डोळे उघडून पाहीलच , एवढी सुंदर गोड साद कोण घालतय ?” पाहते तो काय ?, माझं वय  हसतमुखाने माझ्यासमोर उभे होते. अगदी आदबीने, गोड साद घालून, मला उठवत होते. “ काय लक्षात आहे ना? आजची तारीख , वार? काही आठवतय का? कि विसरलं?” आताशा असच होत बाई माझ, हे विसरल.........ते विसरल ............. लक्षातच राहत नाही. “ए सांग बाबा आता , काय आहे आज? तारीख, वार? सांग बाबा !” अग आज २१ जून , विसरलीस? “ हो! हो! आज ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस” हो ना? शिवाय आज दिवस मोठा असतो” “अजून काय?” बघ........... आठव! अजून काय? तुझा काहीतरी संबंध आहे! बघ, नीट आठव! येईल लक्षात”! “अरे हो” खरच कि! आता आल लक्षात! विसरलेच होते मी. २१ जून! माझा वाढदिवस! पण हे तुझ्यामुळेच हं ! सगळे म्हणतात, ‘वयामुळे विसरायला होत. “सगळे म्हणू देत, पण तू नको म्हणूस. मी तुला आठवायला मदत केली. विसरायला नाही!” हो रे, खरचं, तू मला आठवण करून दिलीस, किती चांगला आहेस तू! खास दिवसाची, खास सुरुवात केलीस, थॅंक्यू हं !”
     “ठीक आहे! ठीक आहे! आता उठ, फ्रेश होऊन खास दिवस अजून खास कर!” 
      “ए , मी काय म्हणते , मी आज वॉकींगला, व्यायामाला दांडी देऊ का? लोळू दे ना थोडावेळ तुझ्याशी गप्पा मारत ?”
      वयाने एकदम रागाने पाहिले माझ्याकडे, “तू जर अस काही करणार असशील , तर जातो मी निघून , चक्क वयाने माझ्याकडे पाठच फिरवली."
बाब   बमी एकदम घाबरले , उठून वयाला अडवत म्हंटल, “नको रे बाबा नको! चुकलच माझं! कान पकडते, उठा बशा काढते पण मला सोडून जाऊ नको. तू सांगशील ते सार ऐकीन , अगदी प्रॉमिस!”
      मग वयानेही मोठ्या दिमाखात सांगायला सुरुवात केली. “ व्यायाम ......... मग तो चालण्याचा असो , योगा, प्राणायाम असो चुकवायचा नाही . कबूल?” “ हो हो ......! तिखट , मीठ, साखर प्रमाणात खाणं! कबूल? “ हो.......... हो..........!”
         तू सांगितलेलं सगळ मला कबूल आहे. तुझ मी सगळ ऐकीन. त्याप्रमाणे वागीन सुद्धा. खुश? आता वयाचा रागही थोडा दूर झाला होता . चेहऱ्यावर थोडी स्मितरेषा उमटलेली दिसत होती . मग मी हि धीर करून म्हंटल, “ माझपण एक मागणं तू ऐकशील? मी मागेन ते देशील?”
          “चल दिल, माग काय हव ते !”
    “ मला न अजून खूप वाचन, लेखन , गायन करावसं वाटत. अगदी मी तुझ्या साथीने शाळा , कॉलेजमध्ये करत होते ना........तस्सं! खूप हिंडाव , फिराव, जग पहावं! नवनवीन शिकावं ..... शिकवावं ! खूप साऱ्या सख्या असाव्यात, नाती जोडावीत, नाती वाढवावीत अस मला वाटत. करशील ना तू माझी ही इच्छा पूर्ण ? तुझी साथ-सोबत असेल तरच हे शक्य आहे. करशील ना एवढं?”
         गालातल्या गालात , मिश्कील हसून वयाने प्रतिसाद दिला......आणि म्हणाला.....तथास्तु !!!
इचलकरंजी.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘                   साद-प्रतिसाद
लेखिका-- सौ अश्विनी शिरूर
    साद प्रतिसाद हा विषय दिल्यावर खरं तर पहिल्यांदा कोकिळाच आठवली. तिच्या 'कुहू' ला जर आपण प्रतिसाद दिला तर ती लगेच परत 'साद' घालते. 
             कोणताही सजीव सादेला प्रतिसाद देतोच. पण निसर्ग सुद्धा प्रत्येक ऋतू नुसार हाकांना प्रतिसाद देत असल्याचं आपण पाहतो. माती पहिल्या पावसाने सुगंधित होते. तृणांना अंकुर फुटतो आणि पावसाच्या सादेला प्रतिसाद देत सृष्टी हिरवीगार होते. वसंतात झाडांना नवी पालवी फुटते. झाडे चहू अंगांनी बहरून येतात. हिरव्या रंगांच्या विविध छटांनी सृष्टी नटते. हा सृजनाचा काळ असतो. हिवाळ्यात पानगळती चालू होते. याचा अर्थ पिकल्या पानांची निवृत्ती आणि नवीन पानांना संधी. उन्हाळ्यात झाडे सुकतात, पण मूळे खोलवर जातात. झाडांचे जमिनीबरोबरचे नाते घट्ट ठेवण्याला त्यामुळे मदत होते. 
          निसर्गप्रमाणेच पशू पक्षी ही सादेला प्रतिसाद देतात. कुत्रा, मांजर, बैल हे पाळीव प्राणी. त्यांना जीव लावला तर ते आपल्या मालकांसाठी काय काय म्हणून करणार नाहीत! शिवाजी महाराजांचा कुत्रा, त्याने महाराजांच्या चितेत उडी घेऊन आपली निष्ठा निभावली होती. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याने प्राणपणाला लावून, मैलोन मैल दौड करून आपल्या मालकाची संकटातून सुटका केली. त्यात चेतक धारातीर्थी पडला, पण मालकाला सुखरूप ठेवण्याचं काम त्याने इमानाने केलं.
            मुक्या जीवांना प्रेम लावलं तर त्यांचा प्रतिसाद ही प्रेमाचाच असतो. पण त्यांना क्रूरपणे वागवले तर ती ही त्यांच्या धन्याकडे जायला बघत नाही, हे पूर्वीही सिद्ध झाले आहे. परवा केरळ मध्ये झालेली हत्तीणी बद्दल ची घटना तर सर्वांना माहितीच आहे. आपली भूक भागवण्यासाठी म्हणून तिने अननस खाल्ला, पण तो स्फोटकांचा अननस खाऊन तिची सोंड फाटली. पण मानवाच्या घृणास्पद आणि क्रूर गोष्टीसाठी तिचा प्रतिसाद हा चकित करणारा होता. तिने कुणालाही इजा न करता जलसमाधी घेणे पसंत केले. अशा वेळी खरं तर हत्ती बेफाम होऊन खूप नासधूस करतात. पण तिला कदाचित हा इतका मोठा धक्का होता, की तिचा प्रतिसाद ही त्याच प्रमाणे धक्का देऊन गेला. वाघांच्या बछड्याना घरी आणून पाळल्यावर ती सुद्धा जीव लावतात अशी सोनाली या वाघाच्या बछड्याची कथा असलेला धडा आम्हाला शाळेत सुद्धा होता. 
       झाडांशी आपण बोललो तर ती प्रतिसाद देतात असं एक उदाहरण मी मध्ये वाचलं होतं. एक आजी आजोबा निवृत्तीनंतर कोकणात शेती घेऊन रहात होते. त्यांची खूप छान बाग व शेती होती. दुर्दैवाने एक दिवस आजोबा देवाघरी गेले. घरातले सगळे नातेवाईक आले. दोन मुलं, सुना, नातवंडे होती, ते आले. दोन दिवस कुणाचं लक्ष गेलं नाही, पण तिसरे दिवशी बाहेर लक्ष गेल्यावर पाहिलं तर बागेतल्या एकूण एक झाडांनी त्यांना पाणी देऊन सुद्धा माना टाकल्या होत्या. मग आजींनी प्रत्येक झाडापाशी जाऊन, हात फिरवून त्यांच्याशी गप्पा मारल्या, तर झाडे टवटवीत दिसू लागली. हे दोघे रोज प्रत्येक झाडाशी बोलायचे. दोन दिवस त्या झाडांना कोणी साद घातली नव्हती. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद अतिशय क्षीण होता.
     या उदाहरणांवरून एक लक्षात येते, की झाडे, झुडपे, पशू, पक्षी किंवा मानव यांना प्रेमाची साद घातली तर ते प्रेमाचा प्रतिसाद देतात. 
ash.shirur98@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
                 साद प्रतिसाद
          लेखिका-सौ दीपाली फडके
     शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध ही पाचही माध्यमे आपल्याला साद घालत असतात. आपणही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. तो ही कधी शब्दातून, कधी स्पर्शातून, कधी कृतीतून तर कधी नजरेतून आणि कधी अव्यक्त ही असतो.
       आषाढ महिना आला की आपल्याला वेध लागतात ते पावसाचे. त्या मृदगंधित वातावरणात भक्ती जागृत होते, डोळे पाझरू लागतात आणि वाट दिसू लागते ती पंढरीची. विठुरायाच्या दर्शनाची आस तीव्र होते.
     'विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ' असा गजर करीत आषाढीची वारी सुरू होते. दरवर्षी भक्तीच्या परमोच्च सोहळ्याचे आपण साक्षीदार असतो. शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध ही पाचही माध्यमे विठुरायाच्या चरणी लीन होतात. अभंगातून घातलेली साद, तुळशीच्या माळांचा तो गंध, विठुरायाचे सावळे रुप, तो चरणस्पर्श, भक्तिरसात भिजणारे वारकरी हे सारे वातावरण अतिशय विलक्षण असते. डोळे मिटल्यावरही माऊलींचा तो अश्व रिंगण घालताना दिसत असतो.
       लाखो वारकरी विठुरायाला साद घालतात आणि त्याला शरण जातात. ती शिस्त, तो समजूतदारपणा, ती भेटीची आस, ती आर्तता, तो आनंद, ते समाधान अनुभवण्यासारखेच आहे. आपल्याला कुठेही कसलाच भेदभाव जाणवत नाही, जाणवत राहते ते फक्त आणि फक्त भगवंताचे अस्तित्व. नामाचा जयघोष करत ते चालणे आणि त्यातले कष्ट जाणवतच नाहीत.
       संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा अनेक संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी न चुकता येतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. आधी हे सारे संत चालत यायचे आणि आता लाखो लोक येतात. हे सारे संत भक्त म्हणून किती श्रेष्ठ आहेत, नाही का? त्यांनी भगवंतांला घातलेली साद आणि भगवंताने त्याला दिलेला प्रतिसाद म्हणजे भक्तीचे सर्वोच्च रूपच जणु...
      संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक कष्ट सोसले. ही चारही भावंडे शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला गेली असताना रेड्याने वेदपठण केले. आपण सारे एक आहोत हे सांगताना भगवंत त्यांच्या हाकेला धावून आला. निर्जीव भिंत ही जेव्हा चालवली जाते त्यासाठी विठू माऊली च प्रतिसाद देते. गीता जेव्हा मराठीतून ज्ञानेश्वरी म्हणून जनमानसात येते तो ही भागवंतांचाच सुंदर प्रतिसाद आहे असेच वाटते. म्हणून तर पसायदान हे त्यांचे वैश्विक मागणे आहे.
' आता विश्वात्मकें देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे|
तोषोनी मज द्यावे, पसायदान हे'
        संत गोरा कुंभार यांची तर भक्ती किती श्रेष्ठ आहे. यांनी तर आपले काम करताना म्हणजे माती कालवून ती पायांनी तुडवत असताना स्वतःच्या रांगत आलेल्या छोट्या बाळालाही तुडवले. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते इतके गुंग झाले होते की आपण काय केले हे ही त्यांना समजले नाही. जेव्हा ते लक्षात आले तेव्हा त्यांनी केलेला तो विठ्ठलाचा धावा, ती घातलेली आर्त साद भगवंतांच्या हृदयी पोचली अन ते छोटे मूल रांगत रांगत परत आले. ती भक्ती, तो खरेपणा, ती आर्तता सारे काही विलक्षण!!
'निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी
तेणे केले देशोधडी, आपण यासी मायबापा'
      संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले. पण त्यांनी कोणालाही दोष न देता भगवंताला निर्मळ साद घातली अन भगवंताने ते अभंग त्यांना जसे होते तसे परत दिले. हा भक्तीचा महिमा खरच खूप मोठा आहे. 
          संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत निवृत्ती नाथ, संत सोपानदेव यांनी ही भक्तीची आणि भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. हे सारे किती श्रेष्ठ आहेत आणि प्रत्येकाची भक्तीही तेवढीच श्रेष्ठ आहे.
         असा अनुभव आपल्यालाही कधीतरी येतो. आपणही मनापासून साद घातली तर भागवंतही प्रतिसाद देतो कधी कळत तर कधी नकळत.. असाच काहीसा अनुभव आम्हाला जगन्नाथ पुरीमध्ये आला.
जगन्नाथ पुरी म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती रथयात्रा आणि तो भाविकांचा उसळलेला महासागर. ती लोकांची अपार श्रद्धा आणि त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी चाललेली धडपड. पुरीमधले हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पसरलेले हे भव्य मंदिर आणि मंदिरासमोरील रथयात्रेसाठी असलेला लांब, रुंद रस्ता मनात भरतो. 
हे सगळे जरी असले तरीही येथील दर्शन व्यवस्था ही अगदी निराळी आहे. एक तर येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यात आपणही उभे असतो. एक एक प्रवेशद्वार उघडले जाते. त्या गर्दीतून आपण पुढच्या माणसांना ढकलत पुढच्या भागात जात असतो. ही मानसिकता असेल तरच आपण आत जाऊन दर्शन घेऊ शकतो. 
        आम्ही ज्या दिवशी तेथे होतो तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे देवळात  रांग लावून दर्शन घ्यायला खूप गर्दी होती. 
आम्ही असेच ढकलाढकली करतच गाभाऱ्यात पोचलो. तिथे आपण आत प्रदक्षिणा घालू शकत नाही, मात्र तिथल्या पंड्या लोकांना पैसे दिले तर मग काहीही घडू शकते. आम्हाला प्रदक्षिणा घालायची तर खूप इच्छा होती. पण लुबाडून घ्यायची इच्छा मात्र नव्हती. त्यामुळेच मनात देवाचा धावा सुरू होता.
' नको देवराया, अंत आता पाहू
  प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे '
अशी अवस्था आमची झाली होती.
आम्ही देवासमोर जाऊन उभे राहिलो अन आमचे डोळे आमच्याही नकळत मिटले गेले. आम्ही मनापासून जी साद घातली तिला भगवंताने ओ दिली. आम्ही अगदी सहज एकही पैसा न देता प्रदक्षिणा घातली. या ठिकाणी सामान्य भाविक पोचू शकत नाही तेथे आम्ही प्रदक्षिणा घातली. 'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना' असे झाले. आम्ही बाहेर आलो ते डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रु घेऊन आणि कृतकृत्य होऊनच.. इतक्या सहज आणि सुंदर दर्शनाने आमची स्वप्नपूर्ती झाली.
          अशी मी अनुभवलेली आपल्या जीवनातली साद प्रतिसादाची अविभाज्य लय...
अनाहत वाहत राहणारी....
अव्याहत जाणवत राहणारी.....
phadkedeepali@gmail.com

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

साद-प्रतिसाद भाग १

                  साद प्रतिसाद              
*गहिरी साद* 

 लेखिका---*© चित्कला कुलकर्णी.          

प्रिय,
      खरं सांगू ?  परवा बऱ्याच दिवसांनी तुझा अनपेक्षित फोन आला. मी तर हुरळूनच गेलो, अधीर झालो. अगं, किती वाटायचं .... तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात म्हणून... !! तू म्हणालीस, "कसा आहेस?.." तुझ्या एवढ्या शब्दांनी डोळ्यांत टचकन् पाणी तरळलं. पण, पुढं तू तुझ्या बढतीची बातमी दिलीस. मला आनंदच झाला. क्षणभर वाटलं, तू खास माझ्यासाठी वेळ काढून बाहेर फिरायला चल.. असं म्हणतेस की काय...अगदी पूर्वीसारखं ..पुढं तू मला मोठ्या आनंदात विचारलंस, "तुला काय हवंय?"  मीही तुला उलटपक्षी विचारलं, "तुला नेमकं काय हवंय?"(पण, मनातच हं!) मी हसून वेळ साजरी केली.
        तुला खरं खरं सांगू ??  असं विचारण्यापेक्षा अंतर्मनातले अव्यक्त साद प्रतिसाद ओळखता आले असते तर!  साद प्रतिसादाची भाषा उपजावी लागते... उमजावी लागते नां गं ! हो, मला जे हवं होतं आणि अजूनही हवंय त्यात मी गुरफटून राहिलो नाही, इतकंच. तू मला पूर्वी जशी होतीस तशीच हवी आहेस. मी हे अगदी खरं खरं लिहीत आहे. विश्लेषण कशाला करू ? आणि त्यानं साधणार तरी काय गं! आपणच आपल्याला पारखं झाल्यासारखं नाही का वाटत?

आपण खरंतर शाळेपासून एकत्र होतो. तू पूर्वीपासूनच तशी अबोल. शांत, विचारी आणि ध्येयनिष्ठ. पण, जेव्हा बोलशील तेव्हा अचूक, सडेतोड. तुझ्या ह्याच गुणांवर मी भाळलो.  तरुणाईतल्या माझ्या त्या सादाला तुझा संयत प्रतिसादही मिळत गेला. एकत्र येण्याचा विचारही आपण केला होता. पण , हळूहळू तू तुझ्या कार्यक्षेत्राशी समरस होत गेलीस. तुझं कार्यक्षेत्र  रुंदावलं. माझी साद मूक होत गेली. अन् अनामिक हुरहूर तेवढी काळजात  राहिली..
   तुला आठवतं ??  एकदा आपण  नदीकाठी भेटायचं ठरवलं होतं. तुझ्या आवडीचा निशिगंध मी घेऊन  वाट पहात होतो. पण अचानक तुझा बेत बदलला. अत्यंत महत्त्वाच्या कामामुळं तू येऊ शकणार नाहीस असा  खूप उशिरा फोन आला. निराश झालो. एवढं काय महत्त्वाचं काम असेल असा विचारही मनात आला. पण तेव्हाच ठरवून टाकलं, इथून पुढं फार स्वप्नं रंगवायची नाहीत. भूतकाळातही  फार  रमायचं नाही. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही अत्यंत महत्त्वाचे क्षण येतात की त्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर निराशा येते. त्यापेक्षा जे घडलं ते थोडं दूर ठेवता आलं पाहिजे नाही का ? तो विचार मनात रेंगाळत राहिला तर रंगवलेल्या स्वप्नांचा रंग उगाच फिका होत जातो. हं... ..!! वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकीन उसे इक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा...
   पुढं  तू एका पाठोपाठ पदव्या, सुवर्ण पदकं मिळवत गेलीस. तुझ्या कार्यक्षेत्रात एक एक पायरी चढत अगदी उच्च पदावर पोहचलीसही. मला तुझं खूप कौतुक वाटायचं आणि आजही तितकंच वाटतं. पण, हे सगळं मिळवता मिळवता तू आत्ममुग्ध होत गेलीस की काय असा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. मला कधी कधी वाटायचं की तुझं मन मला समजलंच नाही त्यामुळंच तर  माझी साद पोहचत नसेल का ?
   एकदा नं, आपल्या आवडत्या ठिकाणी असाच एकटा बसलो होतो.  पश्चिम क्षितिजाकडे नजर गेली. नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात आकाशातल्या बदलत्या रंगांचं प्रतिबिंब दिसत होतं. आकाशातल्या मूळ रंगांपेक्षा  प्रवाहातले रंग वेगळेच असतात बघ. एक अगदी ओळखीचा हवाहवासा वाटत असतानाच तो बघता बघता अनोळखी होऊन जातो. तोपर्यंत दुसरे रंग उमटतात आणि  येणारे तरंग त्यांना उठाव देतात. मनाचं असंच असेल का गं ?
    माझं म्हणशील तर एका लयीत आयुष्य सुरू आहे. माझ्या कार्यक्षेत्रात कुठं थांबायचं हे मी ठरवल्यामुळं मला माझ्या छंदांना वेळ देता येतो. आस्वाद घेत चालू आहे. तरीही, तुझी आठवण  मनात सतत ताजी असते. आज काही वर्षांनी जेव्हा पुन्हा शांतपणे तुझा  विचार केला तेव्हा माझंच मला हसू आलं. अगदी पहिल्यांदा तुझ्याबद्दल  सहेतुक पण काहीसं वेगळं वाटायचं .आताही ओढ आहेच पण त्यात निर्हेतुक आपलेपणा आहे.. पूर्वी आपण बऱ्याचदा भेटत असू. प्रत्येक भेटीत मी मनात काही निर्णय घेत होतो. पण, माझ्या अव्यक्त सादाला  हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तू म्हणशील, मीही एका प्रतिसादाची अपेक्षा केली होती आणि तो मला मिळाला नाही.
यावर मी काय बोलू ?
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणं, साद प्रतिसादाची भाषा प्रथम उपजावी लागते, उमजावी  लागते. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन काही वेळा  या भाषेपुढे जाऊन निर्णय घेता आले पाहिजेत...
   आजच सकाळी तुला फोन केला होता. कदाचित तू महत्त्वाच्या कामात असशील. म्हटलं पत्र लिहून पाठवू. इतर कागदपत्रं पहाताना नक्कीच हे पत्र वाचशील.
पत्र पूर्ण करून पेन ठेवणार एवढ्यात तुझा फोन आला.. ( तुझं बोलणं झाल्यावर मी मोठ्या आनंदानं हे पुढंचं लिहून पूर्ण करतो.) नेहमीप्रमाणं कामातली प्रगती सांगितलीस. मीही कौतुक केलं. सहजच तू विचारलंस, " काय करतोस ?" मी म्हटलं "तुझ्याशीच बोलतोय पण पत्रातून. तुला फारसा वेळ नाही नां मिळत म्हणून.." तुला मोकळा वेळ मिळाला होता. आणि तू पत्र वाचून दाखवण्याचा आग्रह धरलास. मीही वाचून दाखवलं आणि तू तडक यायला निघालीस... माझ्या काळजात झिणझिण्या आल्या. तुझ्याशी कसाबसा बोललो खरा...मला आतून खूप भरून आलं गं...हा जो तुझा येण्याचा निर्णय होता तो साद प्रतिसादाच्या भाषेपुढचा होता नां.. ?
बस्स !!!  मिळाला मला ....
   ----तुझाच , (असं म्हणण्याची     आवश्यकता आहे का ??)
     Chitkala.kulkarni20@ gmail.com
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
              साद-प्रतिसाद
लेखिका-सौ.स्मिता शिरीष कुलकर्णी
      हे दिसायला सोपे शब्द असले तरी त्याबद्दल लिहायला घेतल्यावर विचारांचा नुसता गुंता होऊ लागला. ग्रुप वर बर्‍याच जणांचे लेखही वाचले, पण फक्त एखाद्या सादेला प्रतिसाद देणे इथे ही व्याख्या संपते का? एका आईच्या हाकेला बाळाचा प्रतिसाद ,डॉक्टरांच्या उपचारांना पेशंटचा प्रतिसाद, हा प्रतिसादच असतो. पण एवढाच संकुचित अर्थ असू शकेल का? म्हणून मग मी शब्दकोशही चाळला. त्यातही ' प्रतिक्रिया 'असाच शब्दार्थ आहे. मग प्रतिक्रिया हा शब्द असताना प्रतिसाद हा शब्द कसा आला असेल? जरा खोलात जाऊन विचार करताना लक्षात आले की साद म्हणजे sound किंवा voice आणि प्रति म्हणजे copies,  नकल. म्हणजेच repeatation of sound is प्रतिसाद. जसे ध्वनी /प्रतिध्वनी .आपणच उच्चारलेला शब्द जसा दरीतून आपल्याला पुन्हा ऐकू येतो. क्रिया-प्रतिक्रिया एखाद्याने भेटल्यावर हात जोडले की समोरचा तसेच करतो. मला वाटते साद/ प्रतिसादाचा ही अर्थ तसाच होतो. एखाद्या गोष्टीसाठी साद घातली आणि ती पुन्हा पुन्हा उच्चारली गेली म्हणजेच ती मनात रुजवली जाते, त्याला प्रतिसाद म्हणतात.
उदाहरणार्थ महात्मा गांधींनी इंग्रजांना 'भारत छोडो 'असा हुकूम दिला ,पण हे शब्द केवळ गांधीजींचे न राहता,  लाखो जनसमुदायाच्या तोंडून उच्चारले गेले तेव्हा ती प्रसिद्ध अशी 1942 ची 'चले जाव 'चळवळ झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांनी हिंदुस्थानातून परत जायच्या प्रक्रियेला सुरुवात केली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हर हर महादेव' ची घोषणा केली पण जेंव्हा  हजारो मावळ्यांच्या तोंडून, दऱ्याखोऱ्यातून 'हर हर महादेव 'दुमदुमू लागले तेव्हा  स्वराज्यासाठी सर्वांनाच स्फुरण चढले.म्हणजे केवळ एका सादे मुळे नाही तर हजारो प्रतिसादामुळे त्याला वजन आले.
तीच गोष्ट' वंदे मातरम 'ची !समूहाने जेव्हा वंदे मातरम चा घोष सुरु होतो तेव्हा माणसांच्यातच  नाही तर हवेतही एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. हाच तो साद-प्रतिसाद याचा परिणाम! असा परिणाम होण्यासाठी सामर्थ्यवान शब्दांची आणि खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असते, ज्यांच्या सादेला योग्य व अपेक्षित प्रतिसाद मिळतो.
पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर माननीय नरेंद्र मोदींचे' मेरे प्यारे देशवासियों' आणि ' स्वच्छ भारत अभियान 'हे आजही प्रत्येकाच्या तोंडून सतत ऐकू येते. त्यांच्या सुरुवातीच्या भाषणातून सतत हे ऐकल्यामुळे त्याचा प्रतिसाद उमटला तो लोकांच्या क्रियेतून! परदेशात दिसणारी स्वच्छता आपल्या देशात यायला 100 वर्षे लागतील असे म्हणणारे आज देशाच्या स्वच्छतेसाठी पुढे सरसावलेले दिसतात .100 वर्षाची ही पोकळी 5 वर्षात भरून आलेली दिसते.
आता त्यांनी साद घातली आहे 'आत्मनिर्भर भारत 'आणि ' Make in India' ची!त्यांच्या या सततच्या उल्लेखामुळे 130 करोड भारतीयांकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाच्या तोंडी हे शब्द आल्याशिवाय रहात नाहीत. मग भले ते चेष्टेच्या रूपात आले तरी ते सतत कानावर पडल्यामुळे त्याचा प्रतिसाद थोरांपासून पोरांपर्यंत सर्व थरातून मिळत आहे.
कोणत्याही सादाची पुनरावृत्ती झाली की त्याचा अनेक वेळा पुनरुच्चार होतो आणि मग ती गोष्ट डोक्यात पक्की बसते आणि मनावर कायमची ठसते. एखादी गोष्ट मनावर बिंबवल्या शिवाय त्याचा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार एखादी साद घातली गेली की त्याचा प्रतिसाद आपोआप मिळत जातो. अशी वाक्ये जनमानसाच्या अंतर्मनावर कायमची कोरली जातात, आणि त्याची ' ब्रीदवाक्य' होतात.
तुम्हाला असे वाटेल की अशा मोठ्या लोकांनी बोललेल्या जड शब्दांनाच प्रतिसाद मिळतो की काय ?पण तसे नसते .अगदी साधं उदाहरण म्हणजे लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना संस्कार वर्गात घालण्याची जरूर नसते. आपल्या स्वतःच्या वागण्यातून आणि त्यांना एखादी गोष्ट सतत सांगून त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करवून घेऊ शकतो. पूर्वी घरातील मोठी माणसं मुलांकडून परवचा म्हणून घ्यायची. त्यांच्या या नित्यनेमामुळे मुलांचे श्लोक व पाढे सहजरित्या पाठ व्हायचे.  बाहेरून घरी आले की पाय धुणे, काम झाल्यावर वस्तू आवरून ठेवणे, यासारख्या गोष्टी मुलं अनुकरणाने शिकतात. त्यामुळे आपल्या क्रियेतून घातलेली ही एक प्रकारची सादच म्हणावी लागेल ना? जी रोज केल्यामुळे त्याला छान प्रतिसादही मिळतो .
अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ज्या प्रतिक्रिया,प्रतिसादात रूपांतरित होतात. जसे की, केव्हाही, कुठेही राष्ट्रगीत ऐकू आले की आपण आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहतोच, मग ही प्रतिक्रिया समजायची की प्रतिसाद ?असा मलाच प्रश्न पडतो.पण खरंच अर्थाअर्थी दोन्ही शब्द सारखे वाटले तरी त्यातील सूक्ष्मता कळण्यासाठी आपण तेवढेच जागरूक असणे खूप जरुरी आहे.
प्रतिक्रिया ही ठराविक लोकांकडूनच मिळते, तर प्रतिसाद हा समाजातील सर्वांकडून किंबहुना सर्व समाजाकडून अपेक्षित असतो. त्यामुळेच कदाचित समानार्थी असले तरी दोन्ही शब्दांचे संदर्भ वेगळे असतात तर असा हा प्रतिसाद/ प्रतिक्रियेतील सूक्ष्म फरक शोधताना खरंच खूप मजा येते. तर मग तुम्ही पण एकदा   Try करून पहाल का? नाही...  मी तर म्हणते  पहाच.
Skismita@gmail.com
Mobile no. 9922112732
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
                साद प्रतिसाद
लेखिका-सौ.शुभांगी लेले
        "रे मना आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली,ही किमया भोवताली"
       हे गीत ऐकताना जाणवतं माणसाला डोळे आहेत,तरी बघण्याची द्रुष्टी हवी.
पूर्ण चंद्र बघितला कीं, सागराला उधाण येतं.उन्हात पाऊस पडला कीं,इंद्रधनुष्य दिसतं,डोंगर हिरवेगार दिसू लागतात.एकंदरच निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टी सादाला दिलेला प्रतिसाद आहे.
         अलिकडेच कोरोना संदर्भात मा.नरेंद्र मोदीनी 10मि.लाईट घालवायला सांगून मेणबत्ती लावायला सांगितले,घंटानाद करायला सांगितला,मास्क बांधल्याशिवाय बाहेर पडू नका वगैरे गोष्टीसाठी भारतीयांना साद घातली आणि उत्तम असा प्रतिसाद त्याना मिळाला.करोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही ,म्हणून त्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टीना आपल्याला प्रतिसाद द्यायला हवा.
    अंध मुलांकडून शिकावं.....कसा प्रतिसाद द्यायचा असतो ते!आमच्या गंगामाईत 'य़ल्लव्वा' नावाची अंध गायन  शिक्षिका आहे.विशारद आहे.मुलांना सुंदर शिकवते.तिला काहीही नवीन सांगायचे असले कीं,मला आवर्जून सांगते. मी तिला, 'तुला नक्की जमेल ,कर'.म्हंटलं की त्यासाठी खूप झटते आणि करुन दाखवते.गाण्याना चाली लावते,गीत रचते.तिचा मिळणारा प्रतिसाद बघून आपण धडधाकट असून कांहीच केलं नाही,याची जाणीव होते.
   देशासाठी लढणाऱ्या , जवानांना सलाम करावासा वाटतो.देशरक्षणासाठी घातलेल्या सादाला दिलेला प्रतिसाद अमुल्य आहे.
       अरे ला, का रे प्रतिसाद देणं सोपं आहे.पण अरे ला शांतपणे ऐकून घेऊन नंतर शांतपणे योग्य प्रतिसाद देणं अवघड आहे.
      सर्व मैत्रिणींचे लेख वाचून लिहिलेला हा लेख माझा प्रतिसाद आहे.
धन्यवाद.
       Shubhangi lele sl @.com.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
           साद प्रतिसाद 
     लेखिका-सौ ज्योती विलास जोशी       
      बाबविषय खूपच व्यापक आणि लिहायला तितकाच सकारात्मक आणि आव्हानात्मक! मनाला साद घालणारा आणि प्रतिसादाची अपेक्षा करणारा असा!
          'साद-प्रतिसाद'या शब्दद्वयीचा विचार करताना त्याला समांतर किंबहुना त्यांच्या थोड्याशा जवळपास जाणारा असा क्रिया-प्रतिक्रिया हा जोडशब्द असू शकतो, असे वाटले पण फरक आहे.
          साद जितकी आर्त, तितकाच प्रतिसाद व्याकुळ असतो पण तितकाच तो सकारात्मक ही असतो. याउलट, क्रियेला दिलेली प्रतिक्रिया ही नकारात्मक असू शकते.
          सादप्रतिसाद यांमध्ये एका हेअर लाईन इतके अंतर असते असे मला वाटते. म्हणजेच दोघांमध्ये एक पुसटशीच रेघ आहे. आणि ही हेअर लाईन किंवा पुसटशी रेघ साद आणि प्रतिसाद या दोन्हींची इन्टेन्सिटी समान झाली  की पुसून जाते. दोन प्रेमी युगुल एकमेकांना साद देतात आणि एकमेकांकडून प्रतिसादाची वाट पाहतात. जेव्हा दोघांमधील अंतर कमी होते तेव्हा प्रेमाचा पाट वाहू लागतो आणि हेअर लाईन गायब  होते.
       विजापूरच्या गोल घुमटात आपण दिलेला साद  हा प्रतिध्वनीच्या स्वरूपात आपल्याला प्रतिसाद देतो. ह्याच साद प्रतिसादाचा अनुभव घेण्यासाठी आपण गोल घुमट ला भेट देतो.
          महाबळेश्वरचा echopoint ही साद प्रतिसादाचा आनंद देतो.
           टप्प्याचा चेंडू खेळताना देखील टप्पा पडलेला चेंडू पुन्हा हाताला लागावा यासाठी  केलेला प्रयत्न म्हणजे  साद प्रतिसादाचे उदाहरण.
                 प्रतिक्षिप्त क्रिया ही सुध्दा साद प्रतिसादाच्या जवळपास जाणारी अशी आहे. आपल्या मनाला साद दिली की ते प्रतिसाद देते व आपल्या हातून कृती घडते.
           म्हणजेच प्रतिसाद ही साद ह्या क्रियेवर ची प्रतिक्रिया असते असं म्हणायला हरकत नाही.
          मूल जन्माला येत आणि साद प्रतिसादे चा प्रत्यय यायला लागतो. मातेचा स्पर्श होताच बाळ  हुंदका आवरते. अजून नजर न स्थिरावलेला बाळ, आईने साद दिली की नजरेला नजर न भिडवता स्मितहास्य करतो. केवढी ती प्रेमळ साद आणि केवढा तो सुंदर प्रतिसाद!
           सकाळच्या कोवळ्या उन्हात अंगणात बसलेले बाळ, मुठीमुठी भरून जोंधळे उडवते, तेंव्हा चिऊ- काऊची पलटण त्याच्याभोवती, त्याच्या बॉडीगार्ड सारखी  गोळा होते.साद प्रतिसादाचे हे बोलके उदाहरण.
              दिव्यांग मुलांचा हात ब्रेल लिपी वर फिरतो आणि ती लिपी त्यांना साद देते आणि प्रतिसाद म्हणून  शब्द कागदावर उमटतात.हा स्पर्शाचा साद प्रतिसाद.
        कोशिश सिनेमात मूक बधिर जोडप्याला झालेले बाळ, तसेच अपंग नसावे ही आई वडिलांची इच्छा रास्तच आहे . मुलाची s श्रवणेंद्रिये तपासण्यासाठी जोडप्याने केलेला घंटानाद आणि तो आटापिटा अंगावर शहारा आणतो. काय तो साद आणि काय तो प्रतिसाद! 
       वंदेमातरम ऐकू येताच आपण तटस्थ उभे राहतो ही देशभक्तीच्या सादेला आपण नतमस्तक होऊन दिलेला प्रतिसाद आहे
           एखाद्याची मनस्थिती समजून, त्याच्या भावना आपल्या पर्यन्त पोचल्या हे पोहोचविणारया भावनेला  सुध्दा प्रतिसादच म्हणतात.
                --प्रतिसाद न देणे, हा सुद्धा एक प्रतिसादच .मूक प्रतिसाद म्हणा हवं तर! अशा वेळी आपण घातलेली साद ही अपुरी आहे ह्याची जाणीव व्हायला हवी.
           अमीर खान, नाना पाटेकर ,मकरंद अनासपुरे यांनी जलाशिवार योजनेसाठी आपल्याला साद घातली आहे.'पाणी वाचवा, पाणी साठवा' असे हे अभियान आपल्याला साद घालते आहे. आपला प्रतिसाद अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर व्हा अशी साद दिली आहे. 'मेक इन इंडिया' या अभियानावर भर दिला आहे. त्याला,आपला 'एक भारतीय नागरिक' म्हणून प्रतिसाद आवश्यकआहे. कारण सादेला दिलेला प्रतिसाद जितका मोठा तितका देशाचा विकास मोठा. कारण विकासाला प्रतिसादाची शिडी लागते. तसेच साद जितका वजनदार तितका प्रतिसाद व्यापक.
       इचलकरंजी कृतीगट वाचन कट्टा या ग्रुप वरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. अर्थातच प्रतिसादाची अपेक्षा करते. कारण व.पू.काळे नी म्हटले आहे प्रतिसाद देणारे मन हे साद देणाऱ्या मना इतकेच मोठे असते😄
jvilasjoshi@yahoo.co.in
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
                 साद प्रतिसाद
लेखिका - सौ. दीपा नारायण  पुजारी,
       आज आजोबांना थोडे बरे वाटत नव्हतं. सकाळपासून ते पडूनच होते. अंगही दुखत असावं.'आई गssss आssई आई गं'. तिथंच खेळत असलेल्या  पाच वर्षाच्या रेवाने विचारले "आज्योब्बा तुम्ची आई कुठे आहे? इत्कं बोलावताय तुमी तली येत का नाहीय ती?" आपली आई लगेच येते मग आजोबांची का बरं  येत नाही? असे त्या बालमनाला वाटलं  असावं                    छोटा गोटू आई बाबांच्या बरोबर नाईकबाला गेला होता. काही केल्या तो जयबाप्पा करेना. शेवटी आई थोडी दटावून म्हणाली, "गोटू,नमस्कार कर बाप्पाला." गोटूच्या चेहर्‍यावर भलं  मोठं  प्रश्नचिन्ह होते. "पण आई ,बाप्पा कुठं आहे?" खरंच सगळ्या देवळात असते तशी देवाची मूर्ती इथं  नव्हती. देवळातले पुजारी हसले व त्यांनी समोरच मांडून ठेवलेली फुलांची आरास बाजूला करून नाईकबा दाखवले. आता गोटूचा निरागस चेहरा खुलला.हात जोडून म्हणतो कसा "बाप्पा लपून बसलाय". पण त्याच्या उत्सुकतेमुळं सगळ्या गाभार्‍यात असलेल्या भक्तांना नाईकबाचे दर्शन झालं .
          पुष्कर ९-१० महिन्यांचा असेल त्याच्या बाबांनी नविन कार घेतली होती... लाल मारुती. आजोबांच्या कडेवर बसून तो पूजा बघत होता. आता तो लाल रंगांच्या पळणार्‍या वस्तूंनाच फक्त कार म्हणतो. लाल कार दिसली की तो बोट दाखवून 'काssss 'म्हणतो. इतर रंगांच्या गाड्या त्याच्या लेखी कार नाहीत!!
रोज रात्री ९ वाजता आजीचा फोन वाजला की दीड वर्षांचा राधू "आsssत्या! आsssत्या!" म्हणत पळत पळत फोन कडे येतो. एव्हढासा चिमुकला ओळखतो बरं का ;आई चा फोन वाजला की माछि बोलते आणि  आजीचा वाजला की आत्त्या!!
असे अनेक साद आणि  त्यांना मिळणारे प्रतिसाद! मानवी जीवनाचा अविभाज्य अंग! संवेदनशील असण्याचं लक्षण!
कधी एखाद्या चित्राला मिळणारी पावती!
तर कधी सुगरणी च्या पदार्थांची पोटभर स्तुती !
       कधी सुरेल गाण्याला मिळणारी दाद!
   तर कधी वा!क्या बात है ! असा शेरोशायरी प्रतिसाद .गोठ्यात वासराने हंबरून आईला घातलेली साद,तर आईने वासराचे अंग चाटून दिलेला प्रेमळ प्रतिसाद .
    पाणी घातल्यावर अबोलीच्या बियांचा ऊडी मारून मातीत रुजण्याचा प्रयास
    त्यावेळचा तडतड आवाज.कोवळ्या
उगवतीच्या रविकिरणांनी हळुवार हात
फिरवून जागे केल्यावर पक्षांनी केलेला मंजुळ किलबिलाट ,
   तर संध्याकाळी त्याच केशरी रवीरथाचा निरोप घेताना झालेला गलबलाट .
  पहिल्या जलधारांना मातीत सामावून घेत धरणी मातेने सोडलेला तृप्त श्वास म्हणजे मृदगंधाच्या  रुपातला त्या सरींना दिलेला एहसास!" अशी किती उदाहरणे द्यावीत?
संवेदनशीलता, चेतनाक्षमता ही सजीवांची लक्षणे आहेत. समोर सुंदर काव्य वाचन चाललय पण वा वा ची दाद येत नसेल तर कविता रुसते!कवी हिरमुसतो.एखादा वक्ता विनोदी फार्सिकल बोलून एखादी विसंगती व्यक्त करतो तेंव्हा सभागृह हास्यरसात बुडुन जाते.
           साद प्रतिसाद ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. Reflex action. प्रतिसाद जर ऊत्स्फूर्त असेल, कौतुकाची थाप देणारा असेल तर साद अधिकच आवेगाने येते. साद प्रतिसादाची ही देवाणघेवाण आनंददायक होत जाते.मानवी मन अधिक प्रगल्भ होते. आयुष्य सहज सुंदर बनते. मुले जाणती, धीट, सक्षम बनतात. घरातील वातावरण आनंदी राहते. नात्यांची वीण घट्ट होत जाते. पण हाच प्रतिसाद राग, मत्सर, कीव अशा स्वरुपाचा असेल तर साद ओठातच विरते. जगणे अवघड होते. मुले भित्री होतात. व्यक्त व्हायला घाबरतात. संभ्रम वाढत जातो. खेळीमेळीचे वातावरण नष्ट होते. घरातील भांड्यांमधून बदसूर ऊमटू लागतात. नात्यांची वीण उसवते.
प्रत्येक घर मुलांच्या रुपात समाजालाही सुजाण नागरीक देत असतं . या लहानग्यांच्या वाढीत कुटुंबाची जबाबदारी मोठी असते. मुलांना मिळणारं  प्रेम, माया, आदर व संस्कार यांच्या शिदोरीवर ते मूल वाटचाल करत असतं . त्यामुळे आई वडिलांनी व घरातील इतर सदस्यांनी मुलांना योग्य प्रतिसाद देणं  गरजेचे आहे. इथं एक ऊदाहरण द्यावंस वाटतंय . लहानपणी आमच्या शेजारच्या घरातील हे नाट्य . . . . . .
पेपर देऊन मुलं घरात आल्यावर त्यांचे स्वागत करायला आई दारातच छडी घेऊन बसलेली असे. पेपरमधील चुकांचा दारातच शहानिशा केला जाई. छड्यांचा प्रसाद ही मिळे. ते मूल घाबरून कोमेजून जाई. भितीने दुसर्‍या दिवशीचा पेपर ही अवघड जाई. त्यापेक्षा त्याला मायेने घरात घेऊन, खाऊ पिऊ घालून थोडी विश्रांती घेऊ द्यावी. थोड्या वेळाने अभ्यासाला बसवावं. नंतर सावकाशपणानं झालेल्या चुका टाळण्याकरता सूचना द्याव्यात, तर ते मूल दुसरा पेपर चांगल्या पद्घतीनं लिहू शकेल. त्याचा पालकांवरचा विश्वास वाढेल. पालकांचं  व त्याचं  नातं  जास्त घट्ट होईल.
एडिसनच्या आईनं  हे जाणलं  होतं, म्हणूनच बल्बचा शोध लागला. जगाला एक संशोधक मिळाला व संशोधनाची नवी कवाडं  उघडली गेली. सकारात्मक वातावरणात वाढलेली मूलच समाजासाठी विधायक,भरीव काम करू शकतील, बरोबर ना?
          मो. नं.  -- 9665669148
Email - deepapujari57@gmail.com

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

Tuesday, August 18, 2020

नातं- भाग ५

🔸नातं -कोरोनामुळे जडलेलं🔸 
लेखन - सुषमा कौस्तुभ दातार

        १५ मार्चला साऱ्या जगाबरोबर आपल्या देशात ही कोरोनाने हाहाःकार माजवायला सुरुवात केली. माझा मुलगा धृव याच्या कार्यालयातील पुढील महिन्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आणि म्हणून तो18तारखेला पुण्याहून  इचलकरंजीला आला. धृव बरोबर दोन छोटे पाहुणे आमच्या घरी आले. दोनच दिवसापूर्वी धृवने त्यांना आमच्या पुण्यातील घरी आणले होते. अगदी छोटे दोन महीन्याचे.नुकतच बाहेरच दूध पिऊ लागलेले. तुमची उत्सुकता आता फार ताणून धरत नाही. तर ही छोटी बाळं म्हणजे जीन आणि टाँनिक-मांजरीची दोन पिल्लं. गाडीतून छोट्या बास्केट मधे गप्प पणे झोपून आलेली ही दोन बाळं पहिले दोन दिवस घरात जरा घाबरून होती. पण दोन दिवसांत अशी काही रुळली की त्यांचच घर आहे. आता त्यांना येऊन महीना होऊन गेला आहे. घरभर नाचत असतात,पळापळी खेळत असतात. आंब्याची खोकी,दोरी, कागद, बाँल याचा घरभर पसारा केलेला असतो. त्यांना बाहेरच जग दिसावं म्हणून त्यांना पहिल्यादा अंगणात घेऊन गेलो तेव्हा थोडा वेळ बावरली,घाबरली.आमच्या आसपास फिरत राहिली. पण आता बघता बघता चिकूच्या झाडावर चढायला लागली आहेत. एक दोनदा पडली, उतरता आलं नाही पण चढायचं काही सोडलं नाही.सगळं करुन बघण्याची बालसुलभ उत्सुकता त्यांच्या कडे आहे. त्यांच्या मुळे आम्हीही रोज सकाळी अंगणात बसून चहा पिऊ  लागलो.पक्ष्यांचा चिवचिवाट, कोकीळेचे कूजन आणि जीन टाँनिकचं मुक्त खेळणं बघण्यात तासभर कसा जातो कळतच नाही.
यातील जीन आहे ना ती मांजरी आहे. त्यामुळे तिच्या मध्ये स्त्री सुलभ प्रेमळ पणा ,ज्यात त्यात नाक खूपसून बघण्याची वृत्ती आहे. आमच्या तिघांपैकी कोणी ही काहीही करायला लागलं की जीनबघायला पुढे.मला तर काही वेळा लहानपणीची मैथिलीच आठवते.तिच्याशी बोलायला लागलं की लक्ष देऊन तोंडाकडे बघत राहते. सारखी आमच्या आजूबाजूला फिरत असते. टाँनिक आहे तो बोका आहे. तो आधी भित्रा होता. पण आता तो एकदम शूर झाला आहे. पण तो जरा लांबलांबच असतो.जीन एवढा तो लाघवी नाही. आम्ही बसलो की लगेच दोघं मांडीवर येऊन बसतात. आपण अंगावर हात फिरवावा म्हणून अंग घासत राहतात. रात्री आम्ही टी.व्ही.बघायला बसलो की त्यांच्या अगदी अंगात आल्यासारखं एकमेकांवर उड्या मारत खेळत असतात.मग तो टीव्ही राहतो बाजूला आणि त्यांच्या मार्जारलीला पाहण्यातच वेळ कसा जातो कळतही नाही. टेबल क्लाँथला लटक,माझ्या अँप्रनच्या नाडीला लटक असे उद्योग सुरु असतात. मागून वर चढत खांद्यावर बसायचं आणि पुढुन खाली उतरायचं ,लांबून धावत येऊन हलणाऱ्या वस्तूंवर उड्या मारायच्या ह्या त्यांच्या सगळ्या करामती बघण्यात लाँकडाऊन कसा गेला कळलच नाही. ह्या लाँकडाऊन मुळेच त्यांच एवढं निरीक्षण करता आलं. नाही तर रोजच्या व्यापात एवढे लक्षातही येत नाही. जीन आणि टाँनिक यांच आमच्या जिंजरशी म्हणजे कुत्र्याशी कसं जमेल असं सुरुवातीला वाटलं होतं पण आता तोही त्यांच्या वर ओरडत नाही आणि तीही त्याला घाबरत नाहीत.दोघे एकमेकांकडे बघत बसतात. जीन आणि टाँनिकची आता एवढी सवय झाली आहे की त्यांचा इतका लळा लागला आहे ना की ती पुण्याला परत गेली की चैन पडणार नाही.त्यांना आता पुण्याला पाठवायचं की नाही असं झालं आहे. कोरोना मुळे झालेलं हे सुंदर नवीन नातं!अतिशय प्रेमाचं !मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, ती आपल्यावर खूप प्रेम करतात ह्याची जाणीव करून देणारं!!
        
sushamakdatar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं-  माझंच माझ्याशी🔸
लेखन- तन्मयी कुलकर्णी

लॉक डाऊन वाढतच चालला आहे. सुरुवातीला मला खूप काळजी वाटली. नंतर आईबाबा, शेजारी पाजारी यांच्या बरोबर गप्पांचा फड जमू लागला. वाईटात चांगलं शोधता शोधता मज्जा येऊ लागली. खायचं, प्यायचं, झोपायचं, वाचन, टीव्ही.... मनात येईल तसं . नो रुटीन...   मी पुण्याला शिकायला गेल्यामुळं खूप दिवस घरी राहता यावं अशी मनोमन इच्छा होती; ती पूर्ण होऊ लागली, म्हणून मी खूष होत होते. पण नंतर नंतर कंटाळा येऊ लागला. काय करावं ? मिळालेला वेळ सत्कारणी घालवावा असं वाटू लागलं. किंडलवरची नवनवीन पुस्तक वाचणं, झुंबा, व्यायाम, खेळणं, नृत्याचा सराव, काही पदार्थ करून पहाणं ( पोटावर अत्याचार नाही हं केला !), आणि फोनवर  बोलणं ...असा दिनक्रम सुरू झाला. 
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सगळेजण आपापल्या नातेवाईकांना फोन करून चौकशी करत होते. अर्थात् माझ्या घरचेही त्याला अपवाद नाहीत. खूप वर्षांनी असा रिकामा वेळ मिळाल्यानं लांबचे नातेवाईक, शाळेतले मित्र-मैत्रिणी यांचे नंबर शोधून काढून त्यांना फोन केले जात आहेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. असे फोन करण्यामागचा उद्देश नात्यांना उजाळा देणं, नाती टिकवणं आणि तिची जोपासना. 
            
पण माझ्या मनात खूप दिवसापासून एकच प्रश्न पडत होता की, आपण नेहमीच दुसऱ्यांना  फोन करून विचारतो, "कसे आहात तुम्ही?" इ. इ. त्यांची प्रेमानं चौकशीही करतो. पण, आपणच आपल्याला कधी विचारतो का ???  " कशी आहेस गं तू ?" आणि म्हणूनच मी स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघितला तर....डोळ्यात पाणी तरळलं... माझं मन मला म्हणालं, "तनू , थोडा वेळ, थोडे दिवस रहा गं माझ्यासोबत!  बघ... बघ...माझ्यात किती बदल झाला आहे तो..!!! " आणि मग, त्या दिवशी मी अगदी एक वर्षाची असल्यापासूनचे फोटो काढून बघितले.  माझे हात-पाय, तो गोंडस चेहरा बघून गंमत वाटली. आईनं माझा एक लहानपणीचा फ्रॉक जपून ठेवला आहे. तो बघितला... आणि शहारलेच.. !! हातात धरला तर  तो हाताच्या कोपऱ्याला लागतो  इतका छोटा .. माझ्या घराच्या शेजारीच एक तीन / चार वर्षांचा मुलगा राहतो.  परवा माझ्या चपलेशेजारी त्यानं चप्पल ठेवली.  तेव्हा जाणवलं,  माझे पाय किती मोठे झालेत नं? हातापायाची उंची इतकी झपाट्यानं वाढत गेली की माझं मलाच जाणवलं नाही ... आपण इतके  मोठे कधी झालो ते!  मला माझे फोटो बघून वाटलं की, अरे, इतकी वर्षे आपल्या शरीराची मनाची झालेली वाढ कशी समजली नाही बुवा! 
       
 खरंच, अगदी शाळेत जाण्यापासून आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत असतो; तेव्हापासून "दुसरे कसे आहेत? ते कसे राहतात?" इथंपासून आपण तुलना करायला लागतो. ती छान दिसते नां म्हणून मीही छान दिसायला हवं.... त्यानं पेन घेतलं नं मग मलाही तस्संच हवं... इथंपासून ते तिनं ड्रेस  घेतला नां त्यापेक्षा भारी मला मिळेल का ?  इथंपर्यंत. 
आपण इतरांच्या दृष्टीला चांगलं दिसलं पाहिजे यासाठी केवढा खटाटोप करतो?? दुसऱ्यांचा आदर्श ठेवून तसं वागायचा प्रयत्न करतो....पण.... आपण स्वतःसाठी का करत नाही हा खटाटोप??? माझा हा आयडॉल आहे, यापेक्षा मला माझ्यासारखंच व्हायचंय!!! माझा आयडॉल मीच!!! असं म्हणायला हवं असं मला वाटलं. म्हणून परवापासूनच मी माईंडफुलनेसचा सराव सुरू केला. वर्तमानात जगता यावं हा त्यामागचा मुख्य हेतू .आणि तेव्हा मला स्वतःला वेळ देताना किती सुख मिळतं , मनापासून कसा आनंद घेता येतो याचं उत्तर मिळालं. स्वतःकडे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीनं बघावं तसं मी स्वतःकडे बघू लागले. स्वतःवर प्रेम करायला शिकले. मी जशी आहे तसा माझा मी स्वीकार केला आणि मला खरा खरा आनंद मिळाला. मी  स्वतःशीच भरपूर गप्पा मारल्या. त्याक्षणी जे हवं ते केलं. माझ्या इच्छा मी पूर्ण केल्या. प्रत्येक क्षण अनुभवला. आणि आता  माझ्याही नकळत स्वतःशी कधी  नातं जोडलं गेलं आणि *नात्याची वीण कधी घट्ट*विणली गेली* हे समजलंच नाही.
 
 tanmayeek8@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸हे बंध रेशमाचे🔸
लेखन- दीपा पुजारी
                
माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या मनाचा ठाव लागणं जरा अवघडच.शेवटी विधात्याने घडवलेली गोष्ट ती अगदी सहजपणे कशी उलगडणार .प्रत्येक जण  अंतरबाह्य पूर्णपणे निरनिराळा.परमेश्वराचा बगीचा आहे हा सुंदरच असणार .अगदी विलक्षण आणि विलोभनीय देखावा आहे हा.पण त्यातलं सौंदर्य पाहण्याची नजरच हवी प्रत्येककाकडे हे ही तितकेच खरे!

परमेश्वराने प्रत्येकालाच एक सुंदर आयुष्य दिलंय. प्रत्येकाचा चित्रपट अगदी वेगळा ,त्यात कोणतही साम्य नाही.अगदी प्रत्येकाचा वेगळाच.विधात्याने जन्माला घालून किती सुंदर सुंदर गोष्टी बहाल केल्या मानवाला पण खरचं  या सर्वांची जाणीव कधी आपण मनापासून ठेवतोच असे नाही होत.किती आभार मानावे त्याचे तेवढे थोडेच .पण हा विचार आपल्या मनात देखील येत नाही एवढे बिझी झालो आपण.जगात असे कितीतरी लोक आहेत त्यांना यापैकी काहीही मिळाले नाही ,पण हे कधी आपल्या ध्यानी मनी देखील येत नाही.
     
तसे आपण सगळ्याच बाजूनी धनवान .नात्याची संपत्ती देखील त्याचीच देण .ती देखील प्रत्येकाला मिळतेच असे नाही पण आपण सगळे जण या बाबतीतही अगदी सावकार च आहोत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.जीवन वेगवेगळ्या नात्यांनी कस बहारदार बनून जात .आयुष्यात अशी वेगवेगळी नाती म्हणजे पंचपक्वान्नच जणू .जेवणात जश्या वेगवेगळ्या चटण्या ,लोणची ,कोशिंबिरी जेवणाची लज्जत वाढवतात तशीच ही वेगवेगळी नाती जगण्याची गोडी वाढवून टाकतात ,फक्त साखरेसारखे त्यात विरघळून जाता आलं पाहिजे.कुटुंब म्हणलं की भांड्याला भांडे लागणं आलंच,व्यक्ती तितक्या प्रकृती ,प्रत्येकाचा स्वभाव वेगळा मत वेगळी असणारच.समोरचा माणूस चुकीचा नाही त्याची मतं आपल्या पेक्षा वेगळी आहेत हे मनाला समजावता आलं की नात स्वीकारून त्याची अवीट गोडी चाखता येणं सोपं होऊन जातं.आनंदा चे क्षण ,सण समारंभ  साजरे करताना आपली रक्ताची नाती बरोबर हवीतच ,मनातले हेवेदावे विसरून आयुष्यातील क्षण सुंदर कसे बनवायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात.हे बंध रेशमाचे घडवताना थोडं झुकून आणि थोडं माफ करून वागता आलं की नात्याचं वस्त्र कस जरतारी बनत.कुटुंब कस नात्यांनी फुललेलं असावं,प्रत्येक नात निस्वार्थ भावनांनी भरलेलं असावं सुख समृद्धी चा झरा खळखळता असावा त्यात.कुटूंबात राजकारण नसावच मुळी, लपवाछपवी,कारस्थान याला कुटुंबात स्थान नको,असावं ते निखळ प्रेम,मोकळी मन,प्रत्येक चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि आनंदी वातावरण.आपले आप्त हे परमेश्वराने दिलेली अनमोल ठेव आहे आणि तिला तितक्याच दिलदार मनाने जपुया अस प्रत्येकाला च वाटलं पाहिजे तेव्हा कुठे हा ठेवा जपला जाईल प्रत्येक पिढीकडून.तस अवघड काहीच नाही ,एकाच्या मनाच्या नादाचे झनकार दुसऱ्याच्या मनापर्यंत आपसूक पोहचले तरच ते नात चिरकाल टिकतं. सुइसोबत धागा आणि धाग्यासोबत सुई असली की नात्याचं वस्त्र भरजरी विनलं जातं यात शंकाच नाही.
            
माणसं तर सगळी रक्तामसाचीच त्यांना वेगवेगळी लेबल आपण लावतो अन्यथा परमेश्वराच्या दारी सगळे सारखेच.हातात माती जरी आली तरी त्यात सोनं शोधता आलं पाहिजे म्हणजे जीवन अगदी सुंदर बनून जाईल.तसच प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी परिपूर्ण नाही मिळत पण ज्या मिळतील त्यालाच थोडं वाकून थोडं समजावून घेऊन ,थोडं माफ करून कधीतरी माघार घेऊन ते नातं सुंदर बनवावं आणि जपावं.रुसवे फुगवे ,भांडणं, मतभेद प्रत्येकाच्या वाट्याला असतातच पण रात गई बात गई असच जगावं.नवीन दिवस उगवताना कालच्या घडलेल्या गोष्टींना तिलांजली दिली की आज किती स्वछ आणि सुंदर असेल .
         
नाती काचेसारखी पारदर्शक हवीत स्वच्छ ,सुंदर.काचेवर एक जरी ओरखडा आला तरी त्याची पारदर्शकता भग्न होते .असच नात्याचं देखील.घराघरातून निर्मळ हास्याचे झनकार कानांवर पडले की मनाला किती तृप्त वाटेल.जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात अशावेळी आपली हीच संपत्ती आहे जी खंबीर पणे पाठीशी उभी असते .आनंदाचे सोहळे ज्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांबरोबर साजरे करताना हे क्षण जसे मनाला उभारी देऊन जातात तसेच दुःखाच्या क्षणात देखील आपली हीच नातेवाईक मंडळी खंबीरपणे साथ देतात.म्हणूनच नाती जपा. इथून पुढचा काळ खूप धावपळीचा असणारे,प्रत्येकजण बिझी झालाय .धावपळीच्या या युगात आपण आपली नाती ,नातेवाईक याना कुठंतरी मागे टाकत चाललोय.पण कुटुंब मागे पडता कामा नये .नाती जपण्याची खरंच गरज आहे.परमेश्वराची ही अनमोल ठेव प्राणपणाने जपा,जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.आपल्या लोकांसाठी थोडा वेळ काढा,एखाद्या दिवशी एकत्र जमा,सहभोजनाचा आनंद घ्या .प्रेमाची देवाणघेवाण केल्यानं ते वाढतंच. आपली माणसं हीच  आपली सम्पत्ती आहे याची जाणीव वेळोवेळी आपल्या मनाला करून द्या.आपल्या माणसात मनमोकळेपणाने वावरा, बोला.एकमेकांच्या सुखात ,दुःखात आधार द्या.नाती जपणं ही आजच्या काळाची गरज आहे, ही गोष्ट कुठंतरी लोप पावत चाललीय हीच खंत वाटते.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं माणूसकीच🔸
लेखन- सविता कोकिळ

      आज सारं विश्व एका मोठ्या संकटातून जात असताना माणूस जेवढ्या विपत्ति ना तोंड देतोय आणि अशा परिस्थितीत ही प्रत्येकजण ज्या पद्धतीने पाय रोवून उभा आहे ते पाहता कौतुक करावे तेवढे कमीच आहे.संपूर्ण जगाला या महामारीन जरी वेढलं तरी ही महामारी माणसा माणसांतल एक अढळ नातं दाखवून देतेय ते म्हणजे "नातं माणूसकीच". आज संपूर्ण जगातील घटना काही प्रसंग या नात्याला वृद्धिंगत करताना मनोमन जाणवतंय.आपण नात्यांचे विविध रंग पाहिले . माणूसकीच नात एक वेगळ्याच रंगात रंगलेल. जिकडे पहावं तिकडं सर्वसामान्य माणूस म्हणा ,पोलीस कर्मचारी म्हणा किंवा डॉक्टर ,नर्सेस सगळीकडे आज या नात्याची  इंद्रधनुशी रंगाची उधळण होताना दिसतेय.माणूसकीच हे नातच वेगळं अगदी परक्याना पण आपलंसं करणार .आज बघावं तिकडं हा माणुसकीचा झरा खळखळून वाहताना दिसतोय.अगदी गरीबातला गरीब व्यक्ती पण आपल्या परीने होईल ती मदत करायला पुढे येताना दिसतोय.ठिकठिकाणी अन्नछत्रा सारख्या सेवा चालू झालेल्या दिसू लागल्या.अगदी रस्त्यावरच्या मुक्या प्राण्याना देखील काळजी लोकं घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले.पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी दुधाच्या पिशव्या छोट्या छोट्या पिलांना फोडून दिल्या ,आपल्या शेतकरी मित्रांनी पण आपली शेतीची उत्पन्न लोकांना दान केली.लोक घरं बंद करून आपापल्या गावी गेली अशा परिस्थितीत शेजाऱ्यांना पाजार्यांनी त्यांच्या बाल्कनीतील झाडांना पाणी देऊन एक वेगळाच माणुसकीचा धडा सर्वांना दिला. मोठी श्रीमंत लोक तर मदत करतातच पण या महामारीन कानाकोपऱ्यातल्या लोकात माणूसकीच दर्शन घडवलं.माणुसकीचा किती अगाध महिमा दृष्टीस आणून दिला या महामारीने. रक्ताच्या नात्यासाठी सगळेच सरसावतात मदतीला पण माणुसकीच्या या अलौकिक नात्याने जगाला एक वेगळ्याच रूपाच दर्शन घडवलं.
          
आज ना उद्या या संकटातून आपण सगळेच सुखरूप बाहेर पडू पण उद्याच जग या महामरीतून ताऊन सुलाखून निघालेलं असेल.एक सोन्याची झळाळी घेऊन माणूसकीच वेगळं नात समभाळून  विश्व बंधुत्ववा ची भावना बरोबर घेऊन एक नवीन सतयुग जन्म घेईल यात शंकाच नाही.

savitakokil@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺


🔸नाते आपुले जन्माचे............विश्वासाचे🔸
लेखन- सौ.शुभांगी लेले

ही बहुतेक पु.ना.गाडगीळांची जाहीरात टी.व्ही.वर लागायची.तेव्हा झोपाळ्यावर बसलेल्या पाच पिढ्या बघताना गंमत वाटायची.
मूल जन्माला आलं कीं, त्याला लगेच नाती चिकटतात.आणि आई बाबांबरोबर या सगळ्या नात्यांची माणसाला गरज असते.एकटा माणूस जीवन जगू शकत नाही.नात्यांचीपण मोठी गंमत असते.काही नाती सतत कुरकुरणारी,तटस्थ,प्रेमाची,आपुलकीची,आंबट,गोड असतात.पण ती हवीत.त्या शिवाय गंमत नाही.या सर्व नात्यांची गुंफण रेशमाच्या कशिद्यासारखी असते."अवघा रंग एक झाला"प्रमाणे आपलही नातं मिसळून जायला हवं.नुसतं मिसळूनच नाही,तर रंगसंगतीही खुलुन दिसायला हवी.आईबाबांच नातं प्रेम,त्याग शिकवतं तर बहीणभावाचं नातं मनाला मुरड घालून दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं शिकवतं.
सगळ्यात गुरुंच नातं महत्वाचं.आपण चालत असतोच.पण कुठल्या वाटेवरुन चाललं की ध्येय गाठता येईल हे गुरु शिकवतात.जगात राम,वशिष्ठ,क्रुष्ण सांदिपनी इतकीच शिवराय दादोजी कोंडदेव,स्वामी विवेकानंद,रामक्रुष्ण परमहंसाचं नातं अनुसरणीय आहे.सावरकरांचं देशप्रेमाचं नातं जाज्ज्वल्य होतं.सर्वात जवळचं नातं मैत्रीचं.ते जपायला हवं.ही सर्व नातीतर आहेतच.पण माणसाचे निसर्गाशी असलेलं नातं महान आहे.सत्य आहे. कवयत्री इंदिरा संत म्हणतात,"मातीतून मी आले वरती,मातीचे मम अवघे जीवन."
शेवटी सर्वांचच नातं ,मातीशी आहे. म्हणून नाती जपायला हवीत कशीही असली तरीही!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
                  
नातं
लेखन- डॉ. सौ. गीतांजली आशिष दरुरे

 वाचन कट्ट्याचा लेखाचा विषय चित्कला ताईंनी सांगितला- नातं. विचार शृंखला सुरू झाली आणि कागदावर उतरवू म्हटलं तर माझा नेहमीचा पेनच  सापडेना. खूप शोधाशोध सुरू असलेली पाहून माझा मुलगा- अमेय म्हणाला, आई इतकंच ना?  माझा पेन घे,  त्यात काय?  म्हटलं, त्यात काय?  अरे, त्यात काय नाही विचार !, माझा खूप वर्षांचा सोबती आहे तो,  लाडका आहे अगदी! खास जागा आहे त्याला माझ्या मनात आणि माझ्या पर्समध्ये सुद्धा!.. हे ऐकून तो हसला. पण खरंच तो पेन माझ्यासाठी खास होता. वेगळं नातं होतं माझं त्याच्याशी आणि आज तो सापडत नसल्याने मी पुरती बेचैन होते. अखेर पेन  सापडला आणि शोध मोहीम थांबली. खुप दिवसानंतर आवडीचा एखादा नातलग भेटल्या प्रमाणे आनंद झाला. नातलग... एक निर्जीव नातलग !! वाटलं, अरे ! आपलं काय मग? असंख्य नाती जगतो आपण आयुष्यभर. काय असतं बरं हे नातं नक्की? 
      
थोर भारतीय तत्त्वज्ञानी जे., कृष्णमूर्ती म्हणतात, One  only  exsists  in Relationships !किती खरं आहे हे. नात्यांमध्येच  नात्यांसाठी आणि नात्यामुळेच अस्तित्व असतं आपलं. रक्ताच्या,  कायद्याच्या, ओळखीच्या नात्यात नसतानाही आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. काही हलवून टाकतात आपलं जग, खळबळ माजवतात, आयुष्याला गतिमान करतात, निरसपणा दूर करतात, काही हसवतात,  काही रडवतात, न पुसता येणारी अगदी पक्की छाप मनावर उठून आठवणींचा खजिना बहाल करून निघूनही जातात.... अगदी दूर... कधी आपण काही गोष्टींनी त्यांच्यापासून दुरावतो.. कधी काही तशीच राहतात साथ देत.. अगदी अखेरपर्यंत !!
      
किती विविध रूपांमधील उदाहरण तरी त्यांची.. आई-वडील मुलं, पती-पत्नी,  भाऊ-बहीण, गुरु शिष्य,  मित्र-मैत्रिणी, मामा -मावशी- आत्या आणि भाचे कंपनी, आजी आजोबा नातवंड, प्रियकर-प्रेयसी, सख्खे शेजारी,व्यवसायानिमित्ताने जुळलेले नाते. नाते जन्मभूमीशी,  कर्मभूमीशी, निसर्गाशी,  पाळीव प्राण्यांशी, नाते माणुसकीशी,  नाते भक्ताचे ईश्वराशी आणि सध्या इन्स्टंटच्या जमान्यात इंटरनेटमुळे जुळणारे अगदी आधुनिक ऑनलाइन आभासी नाते... एक ना दोन.. किती हे प्रकार!
      
असे म्हणतात की, प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा एक ऑरा असतो. काही खास लहरी, व्हायब्रेशन्स असतात. या जिथे ज्याच्यापाशी जुळतात तिथे नात्याची सुरुवात होते.
 मला तर वाटतं हा नियम इतर वस्तूंना, अगदी खाद्यपदार्थांना ही लागू होत असेल. असेल का? बघा ना- पाटी म्हटलं की पेन्सिल, बॅट म्हणलं की बॉल, पोळपाट म्हटलं की लाटणं, छोले म्हटलं की भटुरे, झुणका म्हटलं की भाकरी! एकाचं नाव घेतलं की दुसरी वस्तू डोळ्यासमोर अवचीत आलीच म्हणून समजा. 
        
माझ्यामते नातं कोणताही असो- प्रेम, समाधान, आनंद, भावनिक मानसिक सुरक्षितता, पाठबळ, त्रास, मनस्ताप, हुरहुर, खेद, काळजी, कधी अभिमान यातील काही तरी नक्कीच देते. मनस्ताप मिळाला तर मागे टाकून पुढे जायचं. समाधान, आनंद देणार्‍यां नात्यांना मनापासुन जपायच. पूर्वग्रह न ठेवता मनाची दालन सर्वांसाठी मुक्त ठेवून नात्यांच स्वागत करायचं. विनातक्रार, डोळसपणे नातं स्वीकारायचं योग्य प्रतिसाद देत, अतिक्रमण न होऊ देता, स्पेस जपत, नात्यात दरी पडू न देता ते अधिकाधिक फुलवण  शेवटी आपल्याच हाती आहे. हो ना? आणि अशा या नात्यावर सुचलेली एक कविता...
                 
नातं- कधी नकळत, कधी उमजून जुळलेलं.
कधी व्यक्त कधी अव्यक्त शब्दाविण जाणलेलं.
नातं- कधी अल्लड, कधी हळव अन् शहाणही 
कधी पोक्त, निखळ, प्रेमळ जपलेलं मनी...
नातं- कधी बोलकी तर कधी अबोल
कधी हसरं, तर कधी उदास,  निरस, रुसव
नातं- कधी बिलगणार कधी दुरावणार
कधी लाडिक, लडिवाळ
कधी उथळ, कधी खोल मुरलेलं उरी 
नातं- एक सुरेख, रेशमी बंधन ज्याला विश्वास अन् जिव्हाळ्याचे कोंदण. 
हा अंतरीचा जिव्हाळा विश्वास नातं गुंफणारे धागेच. 
पण आजच्या मोहमयी मायाजालात आभास नात्यांचे. 
फोलपणा आभासी विश्वातील मृगजळी नात्यांचा वेळीच आहे ओळखायचा..
आभासी जगातून परत जाणिवांकडं फिरूया
गर्द हिरव्या नात्यांनी पुन्हा नव्याने जगूया.
कधी अलिप्त राहून स्वतःशी  ही नातं जोडूया. 
कधी अलिप्त राहून स्वतःशी ही नातं जोडूया. 
    
 geetadarure@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

नातं- भाग ४

🔸नाते जन्माचे🔸 
लेखन- सौ.हर्षदा मराठे

' Dr.Gauri Weds Dr.Sohan ' अशा मथळ्याची पत्रिका घेऊन सौ. सुहास ताई वझे आणि त्यांची मुलगी गौरी  डॉ.सुखदा खरे यांच्या ओपीडी मध्ये आल्या."डॉक्टर मला ओळखलंत?" सुहास ताईंनी डॉ.सुखदाना विचारलं.क्षणभर डॉक्टर बुचकळ्यात पडल्या.गेली ३५ वर्ष त्या अतिशय निष्णात आणि हुशार gynaecologist म्हणून प्रसिद्ध होत्या.आज अचानक सुहास ताईंना बघून त्या भूतकाळात गेल्या...

 "तुम्ही...सुहास...डॉ.अनंत वझेंच्या पत्नी ना.."
"हो! डॉक्टर ही बघा गौरी! माझी मुलगी!तुमच्यामुळे आज... आम्ही हे सुख अनुभवतोय डॉक्टर!
गौरी च स्वप्नं होतं डॉक्टर होण्याचं..ती तुमच्यासारखी MD Gynac karte ahe तिचा होणारा नवरा MD Radiology करतो आहे. डॉक्टर तुम्ही दोघांनीही तिच्या लग्नाला मुंबईला यायचं आहे."
"अरे वा!अभिनंदन तुमचं सगळ्यांचं!"
"डॉक्टर माझ्या पदरात हे सुख घालणाऱ्या ' गॉड मदर' कोण आहेत हे गौरीला जाणून घ्यायची खूप इच्छा होती. म्हणूनच मी तिला तुम्हाला भेटायला घेऊन आलीय"
गौरीने डॉक्टरांना वाकून नमस्कार केला. डॉक्टरांनी  तिला भरभरून आशीर्वाद देत तिच्या लग्नाला यायचं कबुल केलं.सुरेख, सुडौल बांधा असलेल्या अतिशय स्मार्ट देखण्या अश्या गौरीला बघून डॉ. सुखदांच्या डोळ्यासमोर तिची जन्मकहाणी उभी राहिली......

"अहो डॉक्टर! काहीतरीच काय सांगताय? माझी पाळी जाऊन एक वर्ष तरी नक्कीच झालंय... असं कसं...शक्यच नाही हो हे.."कमलताई सबनीस डॉक्टरांना म्हणाल्या. त्यांना रडू आवरेना.त्याला कारणही सबळ होतं. कमलताई साधारण ४७ वर्षांच्या होत्या. पोट वाढतंय, जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय, अशक्तपणा वाटतोय म्हणून त्या डॉक्टर सुखदा यांच्याकडे तपासणी करायला आल्या होत्या. डॉक्टरांना कमलताई ना फायब्रॉइड किंवा ट्यूमर असावा अशी शंका येऊन त्यांनी त्यांची सोनोग्राफी करायला लावली.
पण रिपोर्ट नुसार त्यांना चक्क दिवस गेले होते.छान सात महिन्याच बाळ त्यांच्या कुशीत वाढत होतं. मॉनिटरवर बाळाचे ठक ठक असे ठोके ऐकल्यावर कमलताई ना अश्रू अवरेनात. डॉ.सुखदा नी त्यांना शांत केलं आणि त्यांची खरी कहाणी सांगायला सांगितली.

"डॉक्टर ,काय सांगू तुम्हाला माझे पती रेल्वे मध्ये नोकरी करत होते. गेल्यावर्षी त्यांनी voluntary retirement घेतली.कारण त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. गेले ४ महिने ते खूप आजारी आहेत. माझी मुलगी इंजिनिअर होऊन सर्व्हिस करतीये. मुलगा बारावी ची परीक्षा देतोय. माझी दोन्ही मुलं खूप हुशार आणि गुणी आहेत हो. डॉक्टर ...मुलीच्या पगारावर कसंबस आमचं घर चाललंय.ह्या बाळाला जन्म देऊन मी त्याचं पालनपोषण तरी कसं करू?शक्यच नाही..शिवाय लोक काय म्हणतील...माझी मुलगी लग्नाची आहे हो..." कमलताई जीव तोडून डॉक्टरांना सांगत होत्या.बडॉक्टरांनाही काही सुचेना.अशी अगदी लाखात एक असलेली पुस्तकात वाचलेली केस पहिल्यांदाच त्या प्रत्यक्ष  बघत होत्या.डॉ.सुखदा यांनी आपल्या दवाखान्यात मी कधीच मुद्दाम गर्भपात करणार नाही असं वचन आपल्या आईला दिलं होतं...आणि ते पाळल ही होतं.अशावेळी ह्या अगतिक कमलताई डॉक्टरांना " माझा गर्भपात करा डॉक्टर!" अशी गळ घालत होत्या. एक आई असूनही कमलताईबखूप हतबल झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला आणि "उद्या तुमच्या मुलीला घेऊन या... मी तिच्याशी बोलते" असं म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी कमलताई आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरांच्याकडे आल्या. डॉक्टरांनी मुलीला कमलताईच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची कल्पना दिली.तिलाही हा खूप धक्का होता.पण डॉक्टर म्हणाल्या,"हे बघ सुमन, तुझ्या आईच्या पोटात नकळत हे बाळ वाढलंय. अशी केस लाखात एक असते.तुम्हाला खरंच हे बाळ नको असेल तर हे बाळ ज्यांना मूल दत्तक घ्यायचाय अशा माझ्या ओळखीच्या पेशन्ट ना देण्याची मी व्यवस्था करीन. पण तुम्ही गर्भपाताचं पातक करू नका...तो गुन्हा आहे.ह्या बाळाला कोणी दत्तक घेतलं नाही तर मी वाढविन तुमच्या बाळाला...पण त्याला जन्म द्या " खूप विचारविनिमय केल्यावर कमलताई आणि सुमननी होकार दिला. कमलताई च्या पतींची संमती घेतली.डॉ.सुखदा यांनी त्यांना आश्वासन दिलं," सगळंव्यवस्थित होईल. असं होतं कधीकधी. तुमची rare case ahe . कोणालाही सांगू नका की तुम्ही गर्भार आहात.दोन महिन्यांनी ऑपरेशन आहे असं सांगा.काळजी करू नका, ईश्र्वर आपल्या पाठीशी आहे"

कमलताई आणि सुमन यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. ठरल्याप्रमाणे कमलताईनी एका गोड गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी अगदी सुदृढ गोबऱ्या गालावर सुरेख खळया असलेली होती.कमलताई नी ती जन्माला आल्याबरोबर "डॉक्टर फक्त एकदा मला तिला बघू द्या! नंतर अजिबात तिला माझ्यासमोर आणू नका...नाहीतर माझ्यातली आई  जागी होईल.. मी तिला दुसऱ्याला देऊ शकणार नाही"असं सांगितलं. ते बाळ इतकं गोंडस  होतं की नर्सेस, आया म्हणायला लागल्या,"अगर कोई इसे नही ले जायेगा तो मै इसे पालुंगी !"
डॉ. सुखदानी तोपर्यंत आपल्या ओळखीच्या अपत्य नसलेल्या पेशंटना कळवले होते. चौथ्या दिवशी डॉक्टरांना मुंबईचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनंत वझे यांचा फोन आला. त्यांच्या पत्नी सुहास १२ वर्षांपूर्वी डॉ.सुखदा यांच्याकडे येऊन गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना "तुम्हाला स्वतःचे मूल होणं शक्य नाहीये तेव्हा तुम्ही एखाद बाळ दत्तक घ्यावं" असा सल्ला त्यांना पूर्वीच दिला होता. डॉ.वझे नी बाळाला पूर्ण तपासल आणि  डॉ. सुखदा ना म्हणाले" डॉक्टर तुमच्या हातच बाळ घेण्यात आम्हाला धन्यता आहे! फक्त एक दिवस हे बाळ कोणाला देऊ नका. मी उद्याच आमचा निर्णय तुम्हाला कळवतो."

डॉक्टर सुखदा यांच्या चेहेऱ्यावर आनंद झळकू लागला. लक्ष्मी सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेल्या डॉ.अनंत व सौ.सुहास वझे यांचं जीवन अपत्याविना नीरस आणि निरर्थक होतं.सौ.सुहास यांनी त्या बाळाची पत्रिका त्यांच्या ओळखीच्या ज्योतिषाला देखील दाखवली ."ह्या मुलीची तिच्या जन्मदात्या आईवडिलांशी ताटातूट होईल ...पण ज्या घराण्यात ही मुलगी जाईल त्या घराण्याचं ही नाव काढेल... खूप निष्णात डॉक्टर होईल ही!" असं भविष्य वर्तवल.

दुसऱ्या दिवशी वझे  पतीपत्नी हजर झाले." आम्हाला बाळाला घ्यायचं आहे!"असं त्यांनी डॉ.सुखदा यांना सांगितलं.डॉ.सुखदा म्हणाल्या," तुमचा विचार पक्का झालाय वाटतं. तुमच्यासारखे आई वडील त्या बाळाला लाभणार हे तिचं भाग्यच!"
इकडे कमलताई ना एकीकडे आपलं बाळ चांगल्या सुखवस्तू घरात जाणार म्हणून आनंदही होत होता ...पण त्यांचं आईचं मनही आक्रंदत होतं.हृदयावर दगड ठेऊन त्यांनी हा निर्णय असहायपणे घेतला होता. डॉ.अनंत आणि सौ.सुहास यांना तर बाळाला बघून स्वर्ग दोन बोटे उरला होता. कमलताई शी त्यांचे काय ऋणानुबंध होते कुणास ठाऊक पण ह्या दोघांसाठी बाळाने जन्म घेतला होता. " डॉक्टर आयुष्यात कधीही आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही.तुम्ही Godmother आहात..आमच्या जीवनाला तुम्ही नव्याने अर्थपूर्ण केलंय. "डॉ.वझे म्हणाले..." मी काहीच केलं नाहीये... कर्ता करविता तो परमेश्वर आहे! त्यानेच तुमच्यासाठी हे बाळ पाठवलं. मी फक्त एक निमित्त.पण हे सगळं चांगलं घडलं याचा मला मनापासून आनंद होतोय.तुमच्या घराण्यात ही मुलगी अगदी सुखात वाढेल याचं मला खूप समाधान आहे."डॉक्टर म्हणाल्या. नंतर रीतसर कायदेशीर दत्तक विधान  होऊन ते कमलताई च बाळ वझेंच झालं.त्यानंतर कमलताई मात्र आजतागायत डॉक्टरांना कधीच भेटल्या नाहीत.आज इतक्या वर्षांनी देखील डॉक्टरांना तो प्रसंग नुकताच घडला असल्या सारखा डोळ्यापुढे उभा राहिला. डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले...

 धन्य ती माऊली कमलताई!आणि धन्य ते डॉ.वझे पती पत्नी !

 कसं जन्मांतरीच नातं असतं ना...माणसाच्या हाती कुठे जन्माला यावं हे नाही... लग्नानंतर कोणाशी *नवीन नातं* जुळेल माहीत नसतं...आई झाल्यावर कसं मूल जन्माला येईल माहीत नसतं...पुढे सून, जावई आणि नातवंडे ... वाढतच जातात ही  रक्ताची नाती...याशिवाय बालपणापासून अनेक आप्त,मित्र मैत्रिणी हितचिंतक ही नाती वेगळीच...पण *सहवासान ही नाती अधिकाधिक घट्ट होतात एवढं मात्र खरं!
               
harshadamarathe6665@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸एका आईची गोष्ट🔸
लेखन- सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर. 

खरच ही एका आई ची गोष्ट आहे. ही।आई आहे एक बुलबुल पक्षी. हो, बहुतेक तिला माझ्या सासूबाई लाल बुड्या म्हणत. माझ्या गच्चीत जायचा रस्ता माझ्या स्वयंपाक घरातून जातो. गच्ची ला जायच्या दारात एक मनिप्लॅन्ट चा वेळ आहे. दर एप्रिल मध्ये, तिथे जोडीने बुलबुल येतात व वेलाची पहाणी करतात. शांतपणे त्या फांद्यांवर बसून भरपूर चिवचिवाट करतात, जसे की जणू एकमेकांना सांगतायत की 'हेच ते आपलं स्वप्नातलं घर'. 
मी दाराआडून त्यांना पहात असते. मग पुढचे ६-७ दिवस, त्यांची लगबग सुरू असते. दोघेही चोचीतुन काडी, कापूस जे मिळेल ते आणत असतात व त्यांच घरटं आकार घेत असतं. आणि मी मनोमन त्यांना माझं घर व वेल त्यांच्या घरट्यासाठी आवडलं, म्हणून खुश होते. 
खरंतर हा छंद मला पहिल्यांदा, माझी लेक (सोनू) डिलिव्हरी साठी आली, त्या वेळी लागला. संध्याकाळी ऊन उतरले की आम्ही दोघी गच्चीत जात असू व रात्रीचे जेवण आटपुनच परत घरात येत असू. थोडा अंधार पडला की मी गच्चीतला लाईट लावायची. 
पण एके दिवशी एक मजेशीर गोष्ट घडली. लाईट लावल्यावर त्या वेलितून एक बुलबुल बाहेर आली आणि त्या लाईट बल्ब वर जोरजोरात चोचीने मारू लागली. ती खूप रागात दिसत होती. तिच्या डोक्यावरील केस (फर) पण पूर्ण उभे होते. तिचा राग तिच्या कृतीतून स्पष्ट दिसत होता. मी लाईट ऑफ केला आणि ती परत घरट्यात गेली. 
२-३ दिवस हेच चालू होते. चवथ्या दिवशी घरट्यातून बारीक आवाज यायला लागले. तिचा व तिच्या जोडीदाराचा मोठं-मोठ्याने चिवचिवाट सुरु झाला. तेंव्हा मला कळले, की अंड्यातल्या तिच्या पिल्लांना बल्ब ची उष्णता सहन होत नव्हती, म्हणून ती चिडली होती. 
ती आई होती. तिची ती तगमग, त्या पिल्लांसाठी होती. त्यावेळी मी एक आई आणि आई होऊ घातलेली माझी लेक, आम्ही दोघीही अचंबित झालो. 

खरच, आई ही फक्त आई च असते. मग तो मनुष्य, प्राणी, पक्षी, कोणत्याही रुपात असो. 
खरंच, "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी". पुढे तिची आणि तिच्या जोडीदाराची, पिल्लांसाठीं सर्व धडपड सुरू झाली. थोडा वेळ ती व थोडा वेळ तो, आळीपाळीने पिल्लांची ड्युटी करत होते.  चोचीतून काही-बाही खायला घेऊन येत होते. पिल्लानाही अन्नाचा वास येत असावा. त्यांच्यात लगेच आ करून घास घ्यायची चढाओढ सुरू व्हायची. 
हे सर्व पहात सोनू आणि मी, अगदी त्यांच्यात रमून गेलो होतो. जसं काही आपलंच बाळ आपण मोठं करतोय. मग एक दिवस विचार केला, की हा क्षण आपण व्हिडिओ शूट करून ठेवावा. मी माझ्या नवऱ्याला व्हिडिओ शूटिंग करायला सांगितले. 
तो ही कॅमेरा घेऊन सज्ज झाला. प्रथम किचन च्या दारातून शूट केलं व हळूहळू थोडे पुढे सरकत गच्चीत प्रवेश केला. लगेच तिने मोठ्याने चिवचिवाट सुरू केला. हे माघारी आले. छान शॉट मिळाला म्हणून आम्ही खुश होतो. 
दुसऱ्यादिवशी सकाळी नेहेमी प्रमाणे माझी नजर वेलीवर गेली, पाहते तर काय, घरटे रिकामे - - - - - .
मला चुटपुट लागली, बिचारी घाबरली आमच्या कृतीला.
मला फार वाईट वाटले व रागही आला स्वतःचा. 
वाटले, आता परत ती येईल ना इथे अंडी घालायला? 
मन अगदी बेचैन होतं. 
पुढं सोनूची डिलिव्हरी झाली, आणि आमचं पिल्लू पण मोठं होऊ लागले.  
आणि पुढचा एप्रिल उजाडला. माझं लक्ष वेलीकडे गेलं. 
आणि पाहते तो काय, ती परत आली होती. 
छान अंडी उबवत बसली होती. 
यावेळी तिला नजरेनेच म्हंटले, बाई तुला आणि तुझ्या पिल्लांना कोणताही त्रास होईल, असं आम्ही काहीही करणार नाही. 
पण दरवेळी इथंच ये अंडी घालायला, माहेरवाशिणी सारखी. 
बहुधा तिला माझी नजर कळली. 
शेवटी, एक आई दुसऱ्या आईशी बोलत होती ना. 

vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नात🔸
लेखन- सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर

आजकाल सर्वत्र हे गाणं सतत ऐकू येत असतं. 
" ऐ मेरी जमी, अफसोस नही, 
   तेरे लिये जो सौ दर्द सहे, 
   मेहेफुझ रहे तेरी आन सदा, 
   चाहे जान मेरी ये रहे ना रहे। "
आणि या ओळी मला आतून हलवून जातात. 

आज एक व्हिडिओ पहिला. पुण्यातील एक स्टाफ नर्स २० दिवसांच्या ड्युटी नंतर घरी परत आली. सर्वांनी तिचे फुले उधळून स्वागत केले. पण घाबरून, कोणीही तिच्याजवळ गेले नाही. शेवटी तिच्या एक मैत्रिणीने तिला प्रेमाने मिठी मारली. हे पाहून  डोळे भरून आले. 
खरंच, आपण नाती फक्त आपल्या रक्ताची व जवळच्या मित्र-मैत्रिणी यांच्यात हुडकतो. 
पण काही नाती किती निस्वार्थ असतात, हे आज कळलं. आणि त्या नात्याशी आपण कुठल्याच नात्याची तुलना करू शकत नाही. आज जगात सर्वत्र Covid19 ने हाहाःकार माजवलाय. सगळं जग भयभीत झालंय.  
 
"पण त्याच वेळी काही लोक, आपल्या जिवाची पर्वा न करता, आपल्या रक्ताच्या नात्यांना बाजूला ठेवून, जिवाची बाजी लावून रुग्णांना जिवदान देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत". 
माझं हे वाक्य खूप मोठं आहे, पण मला ते याहीपेक्षा मोठं लिहायचं होतं. वाटत होतं की त्यात अजून खूप काहीतरी लिहिलं पाहिजे. पण मग जाणवलं, की त्यांच्या विषयी लिहायला माझ्याकडे शब्दच नाहीत. प्रत्येक देशातील डॉक्टर्स, नर्सेस, इतर पॅरामेडिकल स्टाफ, हेल्थ वर्कर्स, पोलिस, सफाई कामगार हे अहोरात्र झटतायत आपला देश वाचवण्यासाठी. 
खरंच हे सगळे लोक *आपले*  कोण लागतात? तरीदेखील देशासाठी त्यांनी 'त्यांच्या आपल्याना' बाजूला ठेवलंय. त्यांनी त्यांची पत्नी, मुलं-बाळं, आई-वडील, बहीण-भाऊ अशी सर्व नाती पणाला लावलीयत.  फक्त देशाबरोबर असलेलं त्यांचं नातं टिकवण्यासाठी. 
आणि 'ते' अहोरात्र झटत आहेत, म्हणूनच आपण उद्या ह्या संकटातून बाहेर येऊ अशी खात्री  आहे. काही डॉक्टर्स घरी न जाता गाडीत रहात आहेत. तर काही घराच्या गेट च्या बाहेरून घरच्यांशी संवाद साधत आहेत. 

सगळं सोडून दिवस-रात्र हॉस्पिटल ड्युटी करत आहेत. हेही शेवटी डॉक्टर व पेशंट यांच्यातलं अतूट नातंच आहे. ते निभावताना ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत. 
हेल्थ वर्कर्स आज घरोघरी जाऊन  सामुपदेशन करत आहेत, लोकांना मानसिक आधार देत आहेत. ही सर्व नाती अनामिक आहेत, जी सर्व नात्यांच्या वरची आहेत. जशी *'देव व भक्त'* ही नाती निःशब्द आहेत तशी. यांची तुलना कोणत्याच नात्यांशी होऊ शकत नाही. 
आपले लाडके पंतप्रधान 'श्री नरेंद्र मोदीजी' देशाला या संकटातून सावरण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत.  त्यांचे तर १३० कोटी देशवासींयां बरोबर रक्तपेक्षाही जवळचे नाते आहे. 
म्हणूनच देशातील प्रत्येकाला वाचवण्या साठी ते काळजी पोटी हात जोडून घरात राहण्याची  विनंती करत आहेत. आम जनतेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी, आपले लाडके श्री रतन टाटा यांनी आपल्या सर्व पंचतारांकित हॉटेल्स ची दारे उघडली. 
खरंतर या लोकांचे कार्य शब्दात वर्णन करण्यापालिकडचे आहे. 

नातं या विषयावर जेंव्हा विचार केला, तेंव्हा मला as a Human Being, इतर सर्व नात्यांपेक्षा ही नाती जास्त भावली, जी शब्दातीत आहेत. आणि या सर्व नात्यांचा उल्लेख झालाच पाहिजे.  हिच आपल्या सर्वांकडून या निःस्वार्थ सेवा करणार्यांना आदरांजली.  

vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं🔸
लेखन- पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर 

साधारण ३०-३५ वर्षां पूर्वीची घटना आहे. अजून जशीच्या तशीच डोळ्यासमोर उभी आहे. 
दुपारी २.३० - ३.०० ची वेळ होती. डॉक्टर ओपीडी, थिएटर वगैरे सर्व आटपून घरी जाण्याच्या तयारीत होते. मी ही माझी कामं आटपून कंसलटिंग मध्ये बसले होते. 
तेवढ्यात सिस्टर सांगत आली, 'सर खेडे गावातून एक पेशंट आली आहे.त्यांच्या बरोबर १५-१६ वर्षाची मुलगी आहे. थोडं अर्जंट आहे असं तिची आई म्हणतीय.' डॉक्टरनी पेशन्ट ला आत बोलावले. ती मुलगी, आई व बाबा असे आत आले.
आई -मुलीचे डोळे रडून सुजलेले होते.मध्येच आई मुलीला रागावत होती. 
मी म्हणाले 'मावशी थोडया शांत व्हा, काय घडलंय ते आधी सांगा.'
आईला कुठून सुरू करावे काही कळेना. थोडा आवंढा गिळून ती बोलू लागली.
'सायेब पाया पडते, माझ्या मुलीला एवढं मोकळं करा. कूटं श्याण खाऊन आलीय कोण जाने? हे व मी एकदम चमकून त्या मुली कडे पाहू लागलो. मी म्हणाले 'मावशी काळजी करू नका, शांत पणे काय झालय ते सांगा.' 'सायेब ७-८ महिन्या पूर्वी लेक मोठी झाली. म्हटलं चला, थोडया दिवसात तीच लगीन लावून द्यायचं, म्हंजी मी मोकळी, अशा विचारात होती. दोन म्हैनं झालं पोरीचं चित्तच थाऱ्यावर नाही. जेवन बी नीट जेवत नाहीं. लई मलमळतय म्हणतीय, म्हनून-शान दागदर कडं घेउन गेले. दागदर म्हंटला, पोरीला दिस गेलेत.' 'काय सांगायचं सायेब, दिसभर म्या शेतात राबती,पोरीला कशाची झळ लागु दिली न्हाय. तर पोरींन ह्ये गुण उधळले.' आईच्या डोळ्यात राग भरला होता. आई म्हणाली 'ह्यो माझा भाव हाय, त्यो बी मदत करतो. ह्याच्याकडच म्या राहते.' 

सगळं ऐकून मला ही खूप वाईट वाटलं. 
डॉक्टरांनी मुलीला तपासले. मुलगी गरोदर होती. आता प्रथम आईला शांत करणे गरजेचे होते. मी त्या आईशी बोलू लागले. त्यांची समजूत घातली. 'तरुणपणी मुलं चुकतात, आपण त्याना संभाळून घेतलं पाहिजे. तुम्ही शांत व्हा, यापुढं ती असं वागणार नाही. आपण तिला समजावून सांगू.'  तिकडं डॉक्टर त्या मुलीला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. पण ती काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. शेवटी डॉक्टर तिला म्हणाले, एक छोटीशी प्रोसिजर आहे. ती केली की झालं, तू बरी होशील. मुलीनं ही कळल्यासारखी मान हलवली. बिचारी घाबरली होती. रीतसर जी प्रोसिजर होती ती करून, मुलीला वॉर्ड मध्ये हलवले. 
आई अजून रडतच होती. दुसऱ्या दिवशी, मुलीला डिस्चार्ज दिला. आई व मुलीच्या डोळ्यात कृतज्ञतेची भाव होते.डॉक्टर नी मुलीला पुढील सूचना दिल्या. मुलीने ही निरागसपणे मान हलवली. आता तिची भीड चेपली होती. दोघीही डॉक्टरांच्या पाया पडून शांत मनाने घरी गेल्या. पुढे आम्ही ही घटना विसरून पण गेलो. असेच ६-७ महिने गेले. 
एक दिवस सिस्टर ने येऊन सांगितले, 'Mam ती मुलगी परत आली आहे.' 
आम्ही दोघांनी चमकून तिच्या कडे पाहिलं. ती परत म्हणाली, 'हो Mam मायलेकी परत आल्यात.'  तिचा नंबरआल्यावर दोघी आत आल्या. आता मुलगी शांत होती, पण आई बेचैन होती. 'सायेब पोरीला परत दिस गेलेत, कायबी करूनशान मोकळं करा.' 
 डॉक्टर म्हणाले, 'अहो मावशी, तुम्हाला हे ऑपरेशन म्हणजे काय गम्मत वाटते का? मुलगी किती लहान आहे याचा विचार करा.' तशी आई सरसावून बसली व शांतपणे बोलू लागली.
'काय सांगू सायेब, गरिबी लई वाईट. लेक धा वरसाची झाली, तवा तिचा बा गेला.' तिने वर हात करुन सांगितले.  'सासरच्या लोकांनी घरा भाईर काढलं. भाऊ म्हनला आक्का, माझ्या कडं ये राहायला आणि माझ्या शेतात काम कर. 
मला बी आधार मिळाला सायेब. मागच्या वेळी दिस गेलं त्या वेळी घरी गेल्या वर पोरीला लई खिदडल, तेंव्हा पोरींनं नांव सांगितलं आणि पाया-खायची जिमिन सरकली.' 
तिच्या चेहऱ्यावर चे भाव सर्रकन बदलले, डोळ्यात राग भरला. म्हणाली 'सायेब कुंपनच श्यात खातय!'  'ह्यो माझा भाव च हाय ह्या सगळ्या माग. विचारलं तर म्हंतोय, माझ्या घरात रहायचं तर हे असंच चालणार, नाई तर तुमची तुमची सोय बगा.' 
सायेब तरनी पोर घेऊन कूटं जावू?  म्हंटल 'आर मग लगीन कर तिच्याशी'. तर म्हनतोय 'हिच्याशी कोन लगीन करनार.' 
'गरिबी लै बेकार असती, सायेब. . बघून न बघितल्या सारकं करावं लागतं.'
आईचा चेहेरा बघवत न्हवता. तिची हतबलता तिच्या नजरेत दिसत होती. 
डॉक्टर तिला म्हणाले , 'असं वारंवार होणं चांगलं नाही मावशी. मुलगी लहान आहे, तिची काळजी घेतली पाहिजे.'  त्यावर ती म्हणाली, 'सायेब दुसरा काही उपाय असल तर सांगा.' 
आम्ही ही हताश पणे तिच्याकडे पाहिले. 
झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी--- मामाच्या गावाला जाऊया

खरं तर मामाभाच्यांचं नातं दुधात विरघळलेल्या साखरे सारखं असतं. 
मुलांना त्यांचा मामा सुपर हिरो वाटत असतो.
पण ज्या मुलांचं बालपण त्यांच्या जवळच्यांच्या कडून च हिरावून घेतलं जातं, त्यावेळी आपण किती हतबल आहोत हे जाणवतं.  आणि मन सुन्न होतं, विचार करण्याची क्षमता संपते. 
vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸सुखद नाती🔸
उमेश कुलकर्णी

चैत्र पालवीसारखी नवनवी मंडळी नवोन्मेषी उत्सुकतेनं, कुतूहलानं डोकावताहेत आणि हळूच स्थिरावताहेत.. खूपच छान ...चैत्र महिना आहेच मुळी पालवण्याचा उमलण्याचा आणि फुलण्याचा...कट्टा असाच बहरत राहो...! या वेळेचा विषय ' *नातं* ' असा आहे. खरंतर खूप मोठा आवाका यात सामावलेला आहे. प्रत्येकाची कित्तेकांशी, कितीतरी नाती असणार... असायलाच हवीत... आईच्या उदरातून या जगात येताना  आईच्या नाळेशी असलेलं शरिरी नातं तुटतं पण त्यानंतर कुणाकुणाशी किती नाती निर्माण होतात हे बघितलं की मन थक्क व्हायला होतं. माणसाशी असलेली नाती सोडाच पण पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, सजीव, निर्जीव अशा कोणाशीही तो  नातं जोडू शकतो. पंचमहाभूतातील कोणताही पदार्थ (ऑब्जेक्ट) त्याला वर्ज्य नाही. इतकंच काय, अदृश्याशीही तो नातं जोडू शकतो. अगदी निश्चिंत आणि निश्चितपणे.... बुद्धीला थोडं ताणलं तर सगळं लक्षात येईलच. पहाटेच्या मंद झुळकीच्या ज्ञातापासून स्वप्नात भेटणार्‍या अज्ञातापर्यंत कशाशीही नातं जोडता येतं. नातं हे  कुणाला तरी अडकवण्यासाठी केलेलं कोळ्याचं जाळं नसतं तर तो आपलेपणाचा जिव्हाळ्याचा एक बंध असतो... आणि तसं असलं तरच हे नातं टिकतं....माझं तलतच्या मखमली हळव्या आवाजाशी असणारं नातं.. पंडित हृदयनाथांच्या कल्पकतेची असणारं नातं... ज्ञानेश्वरांच्या उत्तुंग प्रतिभेशी... लतादीदींच्या अलौकिक स्वरांशी.. साहिरच्या काव्याशी... वहिदाच्या घरंदाज सौंदर्याशी.. मधुबालाच्या घायाळ हास्याशी... पंडित भीमसेन जोशींच्या स्वरधारांशी... चार्ली चँप्लीनच्या करूण हास्याशी... (व्यक्तिपरत्वे ही यादी खूपच मोठी आहे.) तर, या सर्व नात्यांमुळे मला मिळणाऱ्या जादुई आनंदानुभूतीशी पक्का जोडला गेलोय. माझं त्यांच्याशी वर्णनातीत, अम्लान, अशरीरी असं नातं आहे. असो ...एक शेवटचं नातं... 'माझं माझ्याशी'.. खरंच, माझ्यातल्या 'मी'शी माझं नातं कसं आहे हे कधी आपण बघतो काय ? बघितलं पाहिजे. मी कसा आहे हे बाहेरचे लोक सांगतातच पण माझ्यातल्या 'मी'च काय ?... त्याच्याशी आपलं नातं कसं आहे ? किती खरं... तकलादू... नाटकी....फसवं.. किती प्रामाणिक...
  बाहेर असलेली नाती जपताना, टिकवताना, वाढवताना आपलं आपल्याशी असलेलं... जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत असलेलं स्वतः शी असलेलं नातं तुटू न देता माझ्यातल्या 'मी' ला सांभाळायला हवं ..माझ्यातल्या 'मी' ला बहकू न देता बहरू द्यायला हवं .. विस्तारभयास्तव.... विराम.....
   
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी