Monday, October 26, 2020

साद प्रतिसाद भाग ३

 साद प्रतिसाद

लेखिका --सौ.वैजू फडके. 

       अनेकवेळा ऐकलेली ही शब्दांची जोडी आज एक लिखाणाचा विषय होऊन आली आहे. विषय कळल्यावर दोन दिवस विचार केला व बुद्धीला साद घातली आणि त्याचा प्रतिसाद म्हणजेच माझे हे लिखाण होय. 

             व्यावहारिक अर्थाने साद म्हणजे घातलेली हाक आणि त्याला मिळणारे उत्तर म्हणजे प्रतिसाद. रोज अनेकवेळा व्यवहारात हे चालू असते. उदा. मुले शाळेच्या वेळेत शाळेला जाणे, गृहिणीने बोलावल्यावर जेवणासाठी टेबलाभोवती घरातील सर्व सदस्य एकत्र येणे वगैरे. या साद प्रतिसादात फक्त व्यवहार असतो. 

                साद प्रतिसादाचा खरा अर्थ कळतो  तो भावनिक सादातून आणि त्याला आलेल्या प्रतिसादातून. उदा. लहान बाळाशी आई लाडे लाडे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव आणि त्याचे हुंकार हा त्याचा सुंदर प्रतिसाद असतो. प्रेमाची साद पण यातच मोडते. सिनेमात नायक नायिका अनेक वेळा प्रेमाने साद देतात. 'तुमने पुकारा और हम चले आये.. 'इथे नायक नायिकेच्या सादाला गाण्यातून प्रतिसाद देतो. डोळयातून पाणी येणे हेही एक प्रतिसादाचे उदाहरण आहे. मग ते आनंदाश्रू असोत वा दुःखाश्रू. साद प्रतिसाद हा सकारात्मक किंवा नकारात्मक या दोन्ही स्वरूपात असू शकतो. मात्र नकारात्मक प्रतिसाद हा मानसिक दुःख देणारा असतो. 

            तिसरा साद हा आभासी असतो. लेखकाला किंवा कवीला एखादी गोष्ट साद घालते असे वाटणे. उदा. साद देती हिमशिखरे...या सादाला मात्र प्रतिसाद नसतो. याशिवाय राजकीय तसेच सामाजिक अशी उदा. देता येतात. समाजाला संतांनी जनजागृतीसाठी केलेले आवाहन . यातूनच आषाढी वारी निर्माण झाली. हा एक समाजाचा संतांच्या सादेला दिलेला प्रतिसादच आहे. राजकीय नेते संपाची साद ही विशिष्ठ हेतूने देतात. अनेक लोक एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देतात. हा एक प्रतिसादच आहे. कोरोनाच्या या संकटात लोकांनी मोदींच्या हाकेला भरभरून प्रतिसाद दिला. कोरोना योद्धे म्हणजेच पोलीस, परिचारिका यांना सलामी देताना त्यांच्या सन्मानार्थ विशिष्ट दिवशी लोकांनी टाळ्या वाजवून मोदींच्या सादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

           निसर्गाने साद घालण्याची ही कला पक्षी, प्राणी यांनाही दिली आहे. त्यांनाही वेळोवेळी प्रतिसाद मिळतो. निसर्गातील बदलानुसार काही पक्षी म्हणजे कोकिळा, मोर वेगवेगळे आवाज काढतात. तर काही नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी म्हणजेच तिच्याकडून प्रतिसाद मिळवताना विशिष्ट आवाजात शीळ घालतात. प्रत्येक प्राणिमात्राच्या जन्मदात्रीने विशिष्ट आवाज काढल्यावर पिल्ले तिच्याभोवती जमा होऊन प्रतिसाद देतात. झाडेसुद्धा याला अपवाद नाहीत. लाजळूच्या पानांना स्पर्श केल्यास ती एकदम मिटतात. हा त्यांचा प्रतिसादच आहे. 

         अशाप्रकारे साद प्रतिसाद हा माणूस तसेच प्राणीपक्षी , झाडे यांच्यात आढळतो. माणसाने मात्र त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत. असा हा साद प्रतिसाद असेल तरच ही वेगवेगळी नाती बहरुन येतात आणि फुलतात.

vaijuphadake23@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

साद-प्रतिसाद

लेखिका-सौ.सीमा उरूणकर

 "वाचवा ,वाचवा मला कुणीतरी "पूजा सैरावैरा या खोलीतून त्या खोलीत जिवाच्या आकांताने धावत होती. आणि तो धारदार शस्त्राने वार करीत तिच्या मागे धावत होता. ती मदतीसाठी बाल्कनीतून साद घालू लागली .पाचव्या मजल्यावरचा हा प्रकार खाली वॉचमनने पहिला .प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीत, ओरडत, बाकीच्यांना साद घालत तो वर धावला .अपार्टमेंट मधील सर्वांनी पूजा ला तातडीने मदत केली. समोरच असलेल्या' ॲस्टर आधार' हॉस्पिटल मध्ये मध्ये तिला नेले .पण डॉक्टरांपर्यंत पोहोचल्यावरच तुटक- तुटक त्याचे नाव सांगत अखेरचा श्वास घेतला. सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे हा सर्व प्रकार पूजाच्या चार वर्षांच्या स्वरा समोर घडत होता. ती रडत रडत त्या दादाला म्हणत होती "दादा नको मारुस माझ्या आईला, दादा, दादा" आणि त्याच वेळी पूजा तील एक 'आई' स्वराला पळून जाण्यासाठी सांगत होती. ही होती स्वतःच्या जिवाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी ची तीव्र प्रतिक्रिया!! गेले सहा महिने त्याच दादाच्या फॅमिलीला त्याच्या आईचा अपघात होऊन पायाला दुखापत झाल्याने हीच पूजा जेवण देत होती. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते .त्यानंतर लहानग्या स्वराची कोर्टासमोर चार वेळेला साक्ष झाली. एवढी किती पोर प्रत्येक वेळी जशीच्या तशी घटना सांगत होती. त्याची ही जबानी झाली पण पोलिसांच्या ताब्यात असलेला तो एक बाल गुन्हेगार होता सज्ञान होण्यासाठी म्हणजे सोळा वर्ष पूर्ण होण्यासाठी चार महिने बाकी होते .स्वराचे बाबा, देवगडला असणारे काका मोठ्या आशेने न्यायासाठी व असे त्याने का केले, यासाठी पोलिसांकडे येत होते. पण... प्रतिसाद शून्य! याचे उत्तर कदाचित माहिती असूनही प्रतिसाद शून्य !!कोल्हापूर मध्ये ठळक अक्षरात मोठी बातमी झळकली. महिलांनी, दक्षता समितीने मोर्चे काढले, न्यायासाठी साद घातली.. पण..... प्रतिसाद शून्य! थोड्या दिवसांसाठी त्याला बालसुधारगृहात पाठवले .काही दिवसांनी बाहेर येऊन तो आता मस्तपैकी फिरतोय पण स्वराचे काय तिचा बाबां पुढे अगणित प्रश्न...  त्या घटनेने अतिशय रडकी, त्रास देणारी स्वरा एकदम शांत झाली ,अबोल झाली .सतत आई लागणारी ती देवगडला काकू सोबत राहू लागली. मग तिच्या कडे बघून नातेवाईकांचे काळीज आक्रंदन करू लागले आणि स्वराच्या बाबांचा पुनर्विवाह करण्याचे नियोजन झाले. खरच, कोणाच्याही जीवनात केव्हा, कसा, किती आणि कोणता पालट करायचा याचं गणित केवळ आणि केवळ ईश्वराच्या हातात असतं याची प्रचिती आली. स्वराला नवीन आई येताना एक छानशी मोठी बहिण  घेऊन आली. नवी आई म्हणजे साक्षात पूजाच! अत्यंत सुसंस्कारित, कुशल, अध्यात्मिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत प्रेमळ, नावाप्रमाणेच सतत खळखळून हसणारी स्मिता!!!! पुनर्विवाह पुनर्जन्मा सारखाच ठरला!!!!! दैवी साक्षात्कार झाला .!! त्यांचे आयुष्य आता कुठे पुन्हा सुरळीत होऊ पाहत आहे पण या घटनेमुळे मनात अनेक प्रश्न साद घालीत राहू लागले ....16 वर्षांच्या मुलाने इतके क्रूरपणे अघोरी कृत्य का बरे केले असावे? "काकू काकू" म्हणून नेहमी बोलावणारा भर दुपारी तीन वाजता घरात येऊन  धारदार शस्त्र काढून सपासप वार करतो म्हणजे या गुन्हेगारी प्रवृत्ती मागे विकृती होती का की ब्लू व्हेल सारखा हा ही एक भयानक खेळ आहे ?नंतर तर ऐकिवात आले, की सध्या कमी वयाच्या मुलांचा गुन्ह्यात असा वापर करण्याचे टेक्निक आलेले आहे. असे आता कित्येक गुन्हे घडू लागले आहे. या प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांमध्ये 'अळीमिळी गुपचिळी' सारखा प्रकार कधी थांबणार ?अशा प्रकारच्या पोलिसांची संख्या आपल्याकडे जास्त आहे, की कर्तव्य निष्ठेने सेवा बजावताना वीरगती प्राप्त होणाऱ्यांची? यांना बालगुन्हेगार म्हणत असताना यांचे हे गुन्हे खरंच बालां सारखे असतात का? केवळ ते बालगुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्यांना सोडून देऊन चालेल का? हल्ली समाजात असे बालगुन्हेगार, त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे याला सोशल मीडिया ही जबाबदार आहे का? यासाठी आपली आणि समाजाची डोळस, वैचारिक कृतिशील जबाबदारी कोणती ?या अशा विचारांच्या सूक्ष्म- सूक्ष्म जाळ्यात प्रतिसादात्मक उत्तरे अंधुक अंधुक दिसू लागली आणि पानावरच्या दवबिंदू परी मनातच विरून जाऊ लागली ,मनातच विरून जाऊ लागली....

seemaurunkar@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

                 साद-प्रतिसाद

लेखक-   सौ सुषमा कौस्तुभ दातार

        गेले दोन तीन दिवस सोशल मीडियावर आणि सर्व न्यूज टीव्ही न्यूज चॅनेलवर एकाच विषयाची चर्चा सुरू आहे ते म्हणजे अभिनेता सुशांत सिंग रजपूत ने केलेली आत्महत्या. त्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एवढी प्रसिद्धी, पैसा सर्वकाही असताना तो डिप्रेशनमध्ये का गेला असावा? आत्महत्या करण्यासारखे काय घडलं असावं त्याच्या आयुष्यात?  त्याने कोणाला साद घातली नाही की  त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही?  साद घालण्यासारखं कोणी नव्हतं का त्याच्या आयुष्यात? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

        मला वाटतं या क्षेत्रातील माणसांना अपयशाची भीती वाटत असावी. त्यांना मिळणारी प्रसिद्धी, लोकांना त्यांचं असलेलं आकर्षण याचीही एक झिंग असते. ती प्रसिद्धी कायम राहील की नाही,  पुढे काम मिळेल की नाही याची भीती असते त्यांच्या मनात. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात असे चढ-उतार up and downs हे असतातच, अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या उद्योगपती, सेलिब्रिटीज पर्यंत सर्वांच्याच. अमिताभ बच्चन हे याचे ज्वलंत उदाहरण.

        आपल्या मनातील प्रश्न,  कोलाहल, भीती बोलण्यासाठी आपल्याजवळ आपल्या आयुष्यात एक तरी माणूस पाहिजे. मग ते मित्र-मैत्रीण असो, बहीण असो अथवा अन्य कोणीही की जे आपलं म्हणणं ऐकून घेतील,  त्यांची चेष्टा करणार नाहीत, चारचौघात त्याची चर्चा करून खिल्ली उडवणार नाही. आपण साद घातली तर त्याला योग्य प्रतिसाद  देणार कोणीतरी असलं पाहिजे.

        पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेक माणसं घरात असायची. सर्वांचे आयुष्य साधं, सरळ, सोपं होतं,  गरजा कमी होत्या,  राग, लोभ, प्रेम सर्व मोकळेपणानं व्यक्त व्हायचं. पण आता घरात इन मीन तीन माणसं,  हम दो हमारा एकच !प्रत्येकाला स्वतंत्र खोली. प्रत्येक जण आपापल्या खोलीत बसून लांब जगाच्या कोपर्‍यात असलेल्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे बोलतील पण समोरासमोर बसून एकमेकांशी शब्दांनी बोलून संवाद साधणार नाहीत. ' संवादशैली 'लोप पावेल की काय अशी काही वेळा भीती वाटते.

        आम्ही लहान असताना सर्व भावंड एकत्र खाली गाद्या घालून झोपायचो. झोपताना सख्ख्या,  चुलत बहिणींना,  भावांना खुसूखुसू गुपित सांगितलं जायचं, मन मोकळं व्हायचं. पण आज मात्र माणसं समोरच्याशी बोलतच नाहीत. भांडणासाठी, ओरडण्यासाठी का होईना पण त्यांनी बोलावं असं काही वेळेला वाटतं. प्रवीण दवणे म्हणतात त्याप्रमाणे भावनांनी ठासून भरलेली कोठारच ही. 

        प्रत्येक वेळी आपण साद  घातली की शब्दांनी प्रतिसाद मिळावा असं नाही. नुसतं आपलं म्हणणं ऐकून घेणं हा सुद्धा मोठा प्रतिसाद असतो. हल्ली मुलांना काही शेअर करायची सवय राहिलेली नाही, नकार पचवता येत नाही.  घरात एखाद दुसरच मुलं असतं. मुलांनी साद घालावी की प्रतिसाद द्यायला आई-वडील तत्परतेने तयार असतात, मुलाचा प्रत्येक शब्द झेलला  जातो. मग एखाद्या सादाला नकारात्मक प्रतिसाद आई-वडिलांकडून मिळाला की झालं, एखादी वस्तू देणार नाही,मोबाईल देणार नाही की लगेच आत्महत्या. अरे,  इतकं स्वस्त आहे का आपलं  आयुष्य !यापेक्षा कितीतरी मनाविरुद्ध प्रतिसाद पुढच्या आयुष्यात पचवायचे असतात. हे बिंबवण्यात पालक कमी पडतात की काय? मुलांवर प्रेम जरूर करावं पण त्यांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या दुर्बल करू नये. सोशल मीडियावर आपण केलेल्या पोस्टवर लाईक्स आले नाहीत,योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर अस्वस्थ होणारी माणसं आहेत.

        समाजात वावरताना दहापैकी सात लोक हे  आपल्याला योग्य प्रतिसाद  देणारे असतातच असं नाही हे स्वीकारायला हवं म्हणजे समोरच्याने प्रतिसाद दिला नाही तरी आपण अस्वस्थ होणार नाही. यासाठी मुलांची जडणघडण तशी व्हावयास हवी. घरात आजी आजोबा हवेत,  नात्याची माणसं हवीत, फॅमिली फ्रेंडस हवेत. मुलांना आपला धाक नसावा तर वातावरण मैत्रीचं असावं.

        तसेच आपणही एखाद्या गोष्टीला,  प्रसंगाला प्रतिसाद देताना,  प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक द्यायला हवी. आपल्याला सर्वच गोष्टी नीट माहीत नसतात. काही वेळा अर्धवट, चुकीची माहिती असू शकते. आपल्या प्रतिसादाने समोरच्यावर काही नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना याचा विचारही आपण कमेंट्स करताना करावयास हवा. आपल्या वागण्या बोलण्याचा नकळत परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. त्या माणसाच्या भूमिकेतून विचार करावयास हवा अर्थात हे वाटते तितके सोपे नाही.

       "मोडून पडलं घर पण मोडला नाही कणा

        पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा"

                  कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या कवितेप्रमाणे नुसतं 'लढ 'म्हणणार कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हा दिलासा,  हा प्रतिसाद खूप मोठा असतो.

sushamakdatar@gmail.com

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

             साद - प्रतिसाद

लेखिका-- डॉ अनुराधा कुलकर्णी.

८-९वर्षांपूर्वची गोष्ट आहे ही! मी व माझा भाऊ-- दादा, श्रेष्ठा ट्रॅव्हल्सतर्फे कैलास  मानसरोवर यात्रेला गेलो होतो.'श्रेष्ठा'ची अवस्था 'नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा 'अशी होती. श्रेष्ठाची लोकं सर्वात शेवटी सोडली जात. त्यातच आमचा लीडर, अमित कुलकर्णी आजारी पडला. त्याला परतावं लागलं. सर्व सूत्रे शेर्पा शांगे याच्या हातात आली.

     उंचावर जाऊ लागल्यावर काहीतरी विचित्रच  होत होतं. Mountain sickness म्हणतात त्याला. खाऊ नये असं वाटतं ,दमायला होतं. सूप व  चहा, कॉफी, गरम पाणी बरं वाटतं आणि  सारखं घ्यावच लागत! रोज सकाळी lasix ची  गोळी देतात. मानसरोवर दर्शन व स्नान केलं! अतिशय थंड पाणी! चार तांबे घेतले तरी हुडहुडी भरली! पण स्फटीकासारखं स्वच्छ पाणी होतं, नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा होता.  तिथल्या टेकडीवरील बुद्धाचं दर्शन घेऊन  कैलास 

परिक्रमेला निघालो.

    दारचेनहून सुरू होते परिक्रमा. कैलास हर ठिकाणाहून वेगळाच भासतो.... भव्य,आदरणीय! निःशब्द होतो आपण!  एक वेगळीच शांतता जाणवते.यमद्वारातून  पुढे चालणं सुरू झालं.देरापुक येथे आलो.  संध्याकाळ झाली होती.तेथून कैलासाचे दर्शन  होत होतं--भव्य, स्पष्ट, अद्भूत!चरणस्पर्श करून आलो.   अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं! मनं तृप्त झालं. 'याचसाठी केला होता अट्टाहास!' रात्री तिथे मुक्काम होता.  

     दुसऱ्या दिवशी खरं तर मोसम खूप आल्हाददायक होता, favourable   होता.भारतसरकाचं पथक आमच्यासमोरच दोलमापास व गौरीकुंडसाठी गेले. शांगेच्या खूप विनवण्या करून सुध्दा काही उपयोग झाला नाही.  कैलाशला मनात साठवतच दारचेनला परत आलो. मन  खूप खट्टू झालं.

दुसऱ्या दिवशी नंदीपर्वत व जैनांचे 

ऋषभदेव यांची अष्टपद परिक्रमा होती. सकाळी लवकरच निघालो.  मनात पक्कं ठरवलं होतं, नंदीपर्वत व अष्टपद करायचचं! गाडीतून उतरल्यावर शांगे  देवाची प्रार्थना करीत असताना त्याला सांगून आम्ही ६-७जण निघालो. सोबत कृष्णा म्हणून दिल्लीचा एकजण professional trakerहोता.  त्याच्या भरवशावर आम्ही निघालो. तो तिथूनच Everest  basecampला जाणार होता.  हवामान खूप चांगलं होतं. अष्टपद समोरच दिसत होता. भव्यता डोळे दिपवून टाकत होती. कैलासचा वेगळाच नजारा दिसत होता! अष्टपद जवळच भासला तरी लांब होता तो!  पुढे निघालो नंदीपर्वताकडे. बाकी  सर्वजण तिथेच थांबले ,दादासुद्धा थांबला. कृष्णा व मी पुढे निघालो. थोडं पुढे गेलो आणि हवामान एकदमच बदललं. वारा सुटला, पावसाचे थेंब पडू लागले. 

मुंगुसासारखे दिसणारे प्राणी ओरडू लागले. त्यांना आपल्याआधी चाहूल लागते म्हणे! हिमालयात आपलाच हेका चालवायचा नाही ,असं सगळ्यांनी बजावलं होतं.

 नंदीपर्वताला  नमस्कार करून परत फिरलो.

    समोरून एक तरुणी व एक शेर्पा उतरताना दिसले. ती रशियन होती. इकडेतिकडे हरवायला नको म्हणून त्यांच्यामागे उतरू लागलो. जिथून चढायला लागलो होतो तिथे आलो. पण दुसऱ्या मार्गाने!

     आता पंचाईत झाली, बरोबरचे दुसऱ्या बाजूला होते टेकडीच्या. कृष्णा म्हणाला, ते गेले असतील. पण मला दृढ विश्वास होता,दादा मला सोडून जाणारच नाही! परत फिरलो त्याला शोधायला. मोसम खराबच होता! आम्ही दोघंही 'दादा,दादा 'अशा हाका  जोरजोरात मारताच होतो खूप अस्वस्थ वाटू लागलं.  पाचच मिनिटात डोळ्यासमोर नाही नाही ते तरळून गेलं.  मन चिंती ते वैरी न चिंती! आणखी पुढे गेलो.हाक मारीतच होतो.खरोखर प्राण कंठाशी आल्यासारखं झालं. रडू यायला लागलं...... आणि, आणि दादानी   'ओ ' म्हटलं!  सादाला प्रतिसाद दिला! काय सांगू तुम्हाला! डोळे आपोआप झरू लागले.  आवाजाच्या दिशेने तो उतरून आला. २ मिनिटे बोलूच शकलो नाही. घालमेल थांबली. त्याला कळेना मी का रडतोय ते. पाऊस सुरू झाल्यावर बाकीचे परतले,हा तेवढा थांबला होता आमची वाट पहात!

    वेळ न दवडता परत फिरलो. गाडीजवळ आल्यावर सर्वांनी घेरलं व भडिमार केला. किती उशीर, बाकीच्यांची पर्वा नाही,वगैरे वगैरे.  त्यांना सर्व सांगितले. हवामान आता एकदम निवळले होते व आमच्या मनावरचे मळभही! यात्रेचा शेवटचा दिवस होता तो!

     पण तो साद व त्याला मिळालेला प्रतिसाद, मनाची घालमेल----न  विसारण्याजोगे!

   जय कैलाशनाथ!

  बम बम भोले!

anuradhakul1961@gmail.com

🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻

                  "साद-पडसाद"  

          लेखक--पल्लवी गोलंगडे                                                हा विषय मांडत असताना माझं मन व बुद्धी एकमेकांशी द्वंद्व करायला लागले.माझ्या बुद्धीवर मनानं विजय मिळवला.माझ्या आंतरिक मनाच्या प्रतिसादामुळे मी हे विचार मांडू शकले.

तान्हुलं रडत रडत जन्माला येतं पण तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं.तुम्ही त्याला छातीशी घेता तेव्हा त्याला तुमच्या हृदयाची भाषा कळते. तुम्ही त्याच्याशी बोलतात तेव्हा ते टुकुर टुकुर बघत असतं. तुमचा स्पर्श,आवाजाला ते प्रतिसाद देतं. त्याच्याशी बोलू लागला की कधी हुंकार देतं तर कधी खळखळून हसतं. मोठं होऊ लागताच त्याची नजर तुम्हालाच शोधू लागते. अंगाईगीत गाता तेव्हा शांत झोपून जातं. एखादा शब्द बोलणारं हे बाळ आपण त्याच्यात इतके गुंगून जातो की ते कधी मोठं होतं कळतच नाही. हे मुल उद्या शिकून मोठं होतं तेव्हा आई-वडिलांचे डोळे आत्मिक समाधानाने पाणावतात.

आईचं वात्सल्य व बाळाची ममता असणारी अनेक उदाहरणे आहेत.वाघाच्या  हल्ल्यातून हरिणाचे पाडस बचावतं त्यावेळी आईच काय इतर सहकाऱ्यांच्या डोळ्यातील भाव बघून त्यांच्याबरोबर आपल्यालाही गलबलून येतं.नजरेआड होणाऱ्या वासराच्या शोधासाठी हंबरून गाईने घातलेली आर्त साद , सैरभैर झालेली ती आणि अचानक तिच्या नजरेसमोर आलेले वासरू एकमेकांकडे धावत सुटतात.ती त्याला चाटून जवळ घेते.तेही तिला बिलगते.

निसर्गाने मानवाला घातलेली साद ,पावसाचे थैमान ,महापूर ,अस्वच्छ पाण्यामुळे होणारी रोगराई वादळ, त्सुनामी यासारख्या घटना. दुष्काळ ,भूकंप , उष्ण वाऱ्याच्या लहरी ,पेट घेतलेले ॲमेझॉन जंगल या सर्वांमुळे होणारे नुकसान म्हणजे मानवाने स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाडच आहे .मानवाने इंधन ज्वलनातून ,जंगलतोडीतून आपल्या प्रगतीसाठी निसर्गाचा केलेला गैरवापर त्यातून उमटणारे हे पडसाद आहेत. निसर्ग तुमचा मायबाप आहे हे ओळखून किरण राव ,मेघा पाटकर यांनी पाणी फाउंडेशन, नर्मदा बचाव यासारखे मोठे प्रकल्प राबवले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ ,बाबा आमटे अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्याचे सुंदर रूप आपल्या नजरेसमोर आहे.

आदिम काळात भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा आदिवासी आपल्या लोकांना संकटाच्या वेळी, आनंदाच्या वेळी, दुःखाच्या वेळी विशिष्ट प्रकारचा आवाज करून साद घालीत असत त्यातून सर्व समूह एकत्रित होत असे.

महात्मा गांधींनी दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह या कामासाठी  अहिंसेच्या मार्गाने जाऊन जनतेला साद घातली व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणात सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ध्येयाला गवसणी घालण्याचे ठरवले होते .कोंढाणा ,रायगड, जावळी काबीज करत त्यांनी अनेक किल्ले जिंकले.भारत वर्षातील श्रेष्ठ आचार्य गुरु द्रोणाचार्य यांनी आपल्या सर्व शिष्यांना श्रेष्ठ विद्या दिली पण शिष्याकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादातून अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर निर्माण झाला. डॉक्टरने पेशंटला घातलेली साद व डॉक्टरांच्या स्पर्शाने पेशंटला धीर मिळतो आणि त्याच्याकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादामुळे तो लवकर बरा होतो. त्याचप्रमाणे पशू-पक्षीही जोडीदाराला मोहित करण्यासाठी साद घालीत असतात.

सखी ही तर कितीही दूर असली तरी टेलिपॅथी सारखी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिची साथ असते. मनाच्या कोपऱ्यात तिची जागा असते.आपल जीवन तिने किती खोलवर व्यापले आहे तेवढ्याच खोलवर आपणास प्रतिसाद मिळतो.

"पांडुरंग कवा भेटल , अंवदा वारीला जायला भेटल की नाय ?ज्ञानबा तुक्याच्या पालखीचे दर्शन होणार का नाय? चार घास सुखानं खायला मिळायचं देवा तवा तुम्ही रुसलात तर या पामराने बघायचं तरी कुणाकडं" अशी भक्तांची आर्त साद विठूमाऊली पर्यंत पोहोचतेच. देव कुठल्या न कुठल्या रूपात त्यांना भेटत असतो. "आपल्या लेकरा- बाळावर त्यांचा अशिर्वाद हाय" या मिळणाऱ्या अनुभूतीमुळे देवाचे नामस्मरण सतत त्यांच्या मुखी असते.

श्री ज्ञानदेवांच्या हाकेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही .लोकांनी त्यांना वाळीत टाकले तेव्हा त्यांना संतत्व ,श्रेष्ठत्व सिद्ध करायला लागलं यासारख्या घटनांतून वाल्याचा वाल्मिकी झाला हा प्रतिसाद योग्य वेळेला मिळाला तर चांगलं कार्य निर्माण होऊ शकते.

थोड खट्ट झाले तरी माझ्या लायकाचे केस उभारतात डोळ्यात जरब धाक असते पण माझ्या स्पर्शाने त्याच्यात लीनता येते व शेपटी हलवून व्यक्त केलेल्या प्रेमाला त्याचा तो प्रतिसाद असतो मला एकदा छोटा एक्सीडेंट झाला.मी छोट्या खड्ड्यात पडले तर एखाद्या बॉडीगार्ड सारखा उभा होता . दोन पाय छातीच्या दोन्ही बाजूला होते व त्याच्या डोळ्यातील भाव असे होते की तुला काय झाले ?उठत का नाही आहेस !तुम्ही दिलेल्या प्रेमाची परतफेडच असते हे मी अनुभवलेलं आहे. तुम्हाला पुस्तके, निसर्ग साद घालतो.तुमचे मित्र बनायला सगळे तयार असतात पण मला वाटते तुम्ही किती जणांना योग्य प्रतिसाद देऊ शकता......?

Gulmohar. builders @ gmail.com


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मायबोली_इचलकरंजी

No comments:

Post a Comment