Tuesday, August 18, 2020

नातं- भाग ५

🔸नातं -कोरोनामुळे जडलेलं🔸 
लेखन - सुषमा कौस्तुभ दातार

        १५ मार्चला साऱ्या जगाबरोबर आपल्या देशात ही कोरोनाने हाहाःकार माजवायला सुरुवात केली. माझा मुलगा धृव याच्या कार्यालयातील पुढील महिन्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आणि म्हणून तो18तारखेला पुण्याहून  इचलकरंजीला आला. धृव बरोबर दोन छोटे पाहुणे आमच्या घरी आले. दोनच दिवसापूर्वी धृवने त्यांना आमच्या पुण्यातील घरी आणले होते. अगदी छोटे दोन महीन्याचे.नुकतच बाहेरच दूध पिऊ लागलेले. तुमची उत्सुकता आता फार ताणून धरत नाही. तर ही छोटी बाळं म्हणजे जीन आणि टाँनिक-मांजरीची दोन पिल्लं. गाडीतून छोट्या बास्केट मधे गप्प पणे झोपून आलेली ही दोन बाळं पहिले दोन दिवस घरात जरा घाबरून होती. पण दोन दिवसांत अशी काही रुळली की त्यांचच घर आहे. आता त्यांना येऊन महीना होऊन गेला आहे. घरभर नाचत असतात,पळापळी खेळत असतात. आंब्याची खोकी,दोरी, कागद, बाँल याचा घरभर पसारा केलेला असतो. त्यांना बाहेरच जग दिसावं म्हणून त्यांना पहिल्यादा अंगणात घेऊन गेलो तेव्हा थोडा वेळ बावरली,घाबरली.आमच्या आसपास फिरत राहिली. पण आता बघता बघता चिकूच्या झाडावर चढायला लागली आहेत. एक दोनदा पडली, उतरता आलं नाही पण चढायचं काही सोडलं नाही.सगळं करुन बघण्याची बालसुलभ उत्सुकता त्यांच्या कडे आहे. त्यांच्या मुळे आम्हीही रोज सकाळी अंगणात बसून चहा पिऊ  लागलो.पक्ष्यांचा चिवचिवाट, कोकीळेचे कूजन आणि जीन टाँनिकचं मुक्त खेळणं बघण्यात तासभर कसा जातो कळतच नाही.
यातील जीन आहे ना ती मांजरी आहे. त्यामुळे तिच्या मध्ये स्त्री सुलभ प्रेमळ पणा ,ज्यात त्यात नाक खूपसून बघण्याची वृत्ती आहे. आमच्या तिघांपैकी कोणी ही काहीही करायला लागलं की जीनबघायला पुढे.मला तर काही वेळा लहानपणीची मैथिलीच आठवते.तिच्याशी बोलायला लागलं की लक्ष देऊन तोंडाकडे बघत राहते. सारखी आमच्या आजूबाजूला फिरत असते. टाँनिक आहे तो बोका आहे. तो आधी भित्रा होता. पण आता तो एकदम शूर झाला आहे. पण तो जरा लांबलांबच असतो.जीन एवढा तो लाघवी नाही. आम्ही बसलो की लगेच दोघं मांडीवर येऊन बसतात. आपण अंगावर हात फिरवावा म्हणून अंग घासत राहतात. रात्री आम्ही टी.व्ही.बघायला बसलो की त्यांच्या अगदी अंगात आल्यासारखं एकमेकांवर उड्या मारत खेळत असतात.मग तो टीव्ही राहतो बाजूला आणि त्यांच्या मार्जारलीला पाहण्यातच वेळ कसा जातो कळतही नाही. टेबल क्लाँथला लटक,माझ्या अँप्रनच्या नाडीला लटक असे उद्योग सुरु असतात. मागून वर चढत खांद्यावर बसायचं आणि पुढुन खाली उतरायचं ,लांबून धावत येऊन हलणाऱ्या वस्तूंवर उड्या मारायच्या ह्या त्यांच्या सगळ्या करामती बघण्यात लाँकडाऊन कसा गेला कळलच नाही. ह्या लाँकडाऊन मुळेच त्यांच एवढं निरीक्षण करता आलं. नाही तर रोजच्या व्यापात एवढे लक्षातही येत नाही. जीन आणि टाँनिक यांच आमच्या जिंजरशी म्हणजे कुत्र्याशी कसं जमेल असं सुरुवातीला वाटलं होतं पण आता तोही त्यांच्या वर ओरडत नाही आणि तीही त्याला घाबरत नाहीत.दोघे एकमेकांकडे बघत बसतात. जीन आणि टाँनिकची आता एवढी सवय झाली आहे की त्यांचा इतका लळा लागला आहे ना की ती पुण्याला परत गेली की चैन पडणार नाही.त्यांना आता पुण्याला पाठवायचं की नाही असं झालं आहे. कोरोना मुळे झालेलं हे सुंदर नवीन नातं!अतिशय प्रेमाचं !मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, ती आपल्यावर खूप प्रेम करतात ह्याची जाणीव करून देणारं!!
        
sushamakdatar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं-  माझंच माझ्याशी🔸
लेखन- तन्मयी कुलकर्णी

लॉक डाऊन वाढतच चालला आहे. सुरुवातीला मला खूप काळजी वाटली. नंतर आईबाबा, शेजारी पाजारी यांच्या बरोबर गप्पांचा फड जमू लागला. वाईटात चांगलं शोधता शोधता मज्जा येऊ लागली. खायचं, प्यायचं, झोपायचं, वाचन, टीव्ही.... मनात येईल तसं . नो रुटीन...   मी पुण्याला शिकायला गेल्यामुळं खूप दिवस घरी राहता यावं अशी मनोमन इच्छा होती; ती पूर्ण होऊ लागली, म्हणून मी खूष होत होते. पण नंतर नंतर कंटाळा येऊ लागला. काय करावं ? मिळालेला वेळ सत्कारणी घालवावा असं वाटू लागलं. किंडलवरची नवनवीन पुस्तक वाचणं, झुंबा, व्यायाम, खेळणं, नृत्याचा सराव, काही पदार्थ करून पहाणं ( पोटावर अत्याचार नाही हं केला !), आणि फोनवर  बोलणं ...असा दिनक्रम सुरू झाला. 
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सगळेजण आपापल्या नातेवाईकांना फोन करून चौकशी करत होते. अर्थात् माझ्या घरचेही त्याला अपवाद नाहीत. खूप वर्षांनी असा रिकामा वेळ मिळाल्यानं लांबचे नातेवाईक, शाळेतले मित्र-मैत्रिणी यांचे नंबर शोधून काढून त्यांना फोन केले जात आहेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. असे फोन करण्यामागचा उद्देश नात्यांना उजाळा देणं, नाती टिकवणं आणि तिची जोपासना. 
            
पण माझ्या मनात खूप दिवसापासून एकच प्रश्न पडत होता की, आपण नेहमीच दुसऱ्यांना  फोन करून विचारतो, "कसे आहात तुम्ही?" इ. इ. त्यांची प्रेमानं चौकशीही करतो. पण, आपणच आपल्याला कधी विचारतो का ???  " कशी आहेस गं तू ?" आणि म्हणूनच मी स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघितला तर....डोळ्यात पाणी तरळलं... माझं मन मला म्हणालं, "तनू , थोडा वेळ, थोडे दिवस रहा गं माझ्यासोबत!  बघ... बघ...माझ्यात किती बदल झाला आहे तो..!!! " आणि मग, त्या दिवशी मी अगदी एक वर्षाची असल्यापासूनचे फोटो काढून बघितले.  माझे हात-पाय, तो गोंडस चेहरा बघून गंमत वाटली. आईनं माझा एक लहानपणीचा फ्रॉक जपून ठेवला आहे. तो बघितला... आणि शहारलेच.. !! हातात धरला तर  तो हाताच्या कोपऱ्याला लागतो  इतका छोटा .. माझ्या घराच्या शेजारीच एक तीन / चार वर्षांचा मुलगा राहतो.  परवा माझ्या चपलेशेजारी त्यानं चप्पल ठेवली.  तेव्हा जाणवलं,  माझे पाय किती मोठे झालेत नं? हातापायाची उंची इतकी झपाट्यानं वाढत गेली की माझं मलाच जाणवलं नाही ... आपण इतके  मोठे कधी झालो ते!  मला माझे फोटो बघून वाटलं की, अरे, इतकी वर्षे आपल्या शरीराची मनाची झालेली वाढ कशी समजली नाही बुवा! 
       
 खरंच, अगदी शाळेत जाण्यापासून आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत असतो; तेव्हापासून "दुसरे कसे आहेत? ते कसे राहतात?" इथंपासून आपण तुलना करायला लागतो. ती छान दिसते नां म्हणून मीही छान दिसायला हवं.... त्यानं पेन घेतलं नं मग मलाही तस्संच हवं... इथंपासून ते तिनं ड्रेस  घेतला नां त्यापेक्षा भारी मला मिळेल का ?  इथंपर्यंत. 
आपण इतरांच्या दृष्टीला चांगलं दिसलं पाहिजे यासाठी केवढा खटाटोप करतो?? दुसऱ्यांचा आदर्श ठेवून तसं वागायचा प्रयत्न करतो....पण.... आपण स्वतःसाठी का करत नाही हा खटाटोप??? माझा हा आयडॉल आहे, यापेक्षा मला माझ्यासारखंच व्हायचंय!!! माझा आयडॉल मीच!!! असं म्हणायला हवं असं मला वाटलं. म्हणून परवापासूनच मी माईंडफुलनेसचा सराव सुरू केला. वर्तमानात जगता यावं हा त्यामागचा मुख्य हेतू .आणि तेव्हा मला स्वतःला वेळ देताना किती सुख मिळतं , मनापासून कसा आनंद घेता येतो याचं उत्तर मिळालं. स्वतःकडे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीनं बघावं तसं मी स्वतःकडे बघू लागले. स्वतःवर प्रेम करायला शिकले. मी जशी आहे तसा माझा मी स्वीकार केला आणि मला खरा खरा आनंद मिळाला. मी  स्वतःशीच भरपूर गप्पा मारल्या. त्याक्षणी जे हवं ते केलं. माझ्या इच्छा मी पूर्ण केल्या. प्रत्येक क्षण अनुभवला. आणि आता  माझ्याही नकळत स्वतःशी कधी  नातं जोडलं गेलं आणि *नात्याची वीण कधी घट्ट*विणली गेली* हे समजलंच नाही.
 
 tanmayeek8@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸हे बंध रेशमाचे🔸
लेखन- दीपा पुजारी
                
माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या मनाचा ठाव लागणं जरा अवघडच.शेवटी विधात्याने घडवलेली गोष्ट ती अगदी सहजपणे कशी उलगडणार .प्रत्येक जण  अंतरबाह्य पूर्णपणे निरनिराळा.परमेश्वराचा बगीचा आहे हा सुंदरच असणार .अगदी विलक्षण आणि विलोभनीय देखावा आहे हा.पण त्यातलं सौंदर्य पाहण्याची नजरच हवी प्रत्येककाकडे हे ही तितकेच खरे!

परमेश्वराने प्रत्येकालाच एक सुंदर आयुष्य दिलंय. प्रत्येकाचा चित्रपट अगदी वेगळा ,त्यात कोणतही साम्य नाही.अगदी प्रत्येकाचा वेगळाच.विधात्याने जन्माला घालून किती सुंदर सुंदर गोष्टी बहाल केल्या मानवाला पण खरचं  या सर्वांची जाणीव कधी आपण मनापासून ठेवतोच असे नाही होत.किती आभार मानावे त्याचे तेवढे थोडेच .पण हा विचार आपल्या मनात देखील येत नाही एवढे बिझी झालो आपण.जगात असे कितीतरी लोक आहेत त्यांना यापैकी काहीही मिळाले नाही ,पण हे कधी आपल्या ध्यानी मनी देखील येत नाही.
     
तसे आपण सगळ्याच बाजूनी धनवान .नात्याची संपत्ती देखील त्याचीच देण .ती देखील प्रत्येकाला मिळतेच असे नाही पण आपण सगळे जण या बाबतीतही अगदी सावकार च आहोत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.जीवन वेगवेगळ्या नात्यांनी कस बहारदार बनून जात .आयुष्यात अशी वेगवेगळी नाती म्हणजे पंचपक्वान्नच जणू .जेवणात जश्या वेगवेगळ्या चटण्या ,लोणची ,कोशिंबिरी जेवणाची लज्जत वाढवतात तशीच ही वेगवेगळी नाती जगण्याची गोडी वाढवून टाकतात ,फक्त साखरेसारखे त्यात विरघळून जाता आलं पाहिजे.कुटुंब म्हणलं की भांड्याला भांडे लागणं आलंच,व्यक्ती तितक्या प्रकृती ,प्रत्येकाचा स्वभाव वेगळा मत वेगळी असणारच.समोरचा माणूस चुकीचा नाही त्याची मतं आपल्या पेक्षा वेगळी आहेत हे मनाला समजावता आलं की नात स्वीकारून त्याची अवीट गोडी चाखता येणं सोपं होऊन जातं.आनंदा चे क्षण ,सण समारंभ  साजरे करताना आपली रक्ताची नाती बरोबर हवीतच ,मनातले हेवेदावे विसरून आयुष्यातील क्षण सुंदर कसे बनवायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात.हे बंध रेशमाचे घडवताना थोडं झुकून आणि थोडं माफ करून वागता आलं की नात्याचं वस्त्र कस जरतारी बनत.कुटुंब कस नात्यांनी फुललेलं असावं,प्रत्येक नात निस्वार्थ भावनांनी भरलेलं असावं सुख समृद्धी चा झरा खळखळता असावा त्यात.कुटूंबात राजकारण नसावच मुळी, लपवाछपवी,कारस्थान याला कुटुंबात स्थान नको,असावं ते निखळ प्रेम,मोकळी मन,प्रत्येक चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि आनंदी वातावरण.आपले आप्त हे परमेश्वराने दिलेली अनमोल ठेव आहे आणि तिला तितक्याच दिलदार मनाने जपुया अस प्रत्येकाला च वाटलं पाहिजे तेव्हा कुठे हा ठेवा जपला जाईल प्रत्येक पिढीकडून.तस अवघड काहीच नाही ,एकाच्या मनाच्या नादाचे झनकार दुसऱ्याच्या मनापर्यंत आपसूक पोहचले तरच ते नात चिरकाल टिकतं. सुइसोबत धागा आणि धाग्यासोबत सुई असली की नात्याचं वस्त्र भरजरी विनलं जातं यात शंकाच नाही.
            
माणसं तर सगळी रक्तामसाचीच त्यांना वेगवेगळी लेबल आपण लावतो अन्यथा परमेश्वराच्या दारी सगळे सारखेच.हातात माती जरी आली तरी त्यात सोनं शोधता आलं पाहिजे म्हणजे जीवन अगदी सुंदर बनून जाईल.तसच प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी परिपूर्ण नाही मिळत पण ज्या मिळतील त्यालाच थोडं वाकून थोडं समजावून घेऊन ,थोडं माफ करून कधीतरी माघार घेऊन ते नातं सुंदर बनवावं आणि जपावं.रुसवे फुगवे ,भांडणं, मतभेद प्रत्येकाच्या वाट्याला असतातच पण रात गई बात गई असच जगावं.नवीन दिवस उगवताना कालच्या घडलेल्या गोष्टींना तिलांजली दिली की आज किती स्वछ आणि सुंदर असेल .
         
नाती काचेसारखी पारदर्शक हवीत स्वच्छ ,सुंदर.काचेवर एक जरी ओरखडा आला तरी त्याची पारदर्शकता भग्न होते .असच नात्याचं देखील.घराघरातून निर्मळ हास्याचे झनकार कानांवर पडले की मनाला किती तृप्त वाटेल.जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात अशावेळी आपली हीच संपत्ती आहे जी खंबीर पणे पाठीशी उभी असते .आनंदाचे सोहळे ज्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांबरोबर साजरे करताना हे क्षण जसे मनाला उभारी देऊन जातात तसेच दुःखाच्या क्षणात देखील आपली हीच नातेवाईक मंडळी खंबीरपणे साथ देतात.म्हणूनच नाती जपा. इथून पुढचा काळ खूप धावपळीचा असणारे,प्रत्येकजण बिझी झालाय .धावपळीच्या या युगात आपण आपली नाती ,नातेवाईक याना कुठंतरी मागे टाकत चाललोय.पण कुटुंब मागे पडता कामा नये .नाती जपण्याची खरंच गरज आहे.परमेश्वराची ही अनमोल ठेव प्राणपणाने जपा,जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.आपल्या लोकांसाठी थोडा वेळ काढा,एखाद्या दिवशी एकत्र जमा,सहभोजनाचा आनंद घ्या .प्रेमाची देवाणघेवाण केल्यानं ते वाढतंच. आपली माणसं हीच  आपली सम्पत्ती आहे याची जाणीव वेळोवेळी आपल्या मनाला करून द्या.आपल्या माणसात मनमोकळेपणाने वावरा, बोला.एकमेकांच्या सुखात ,दुःखात आधार द्या.नाती जपणं ही आजच्या काळाची गरज आहे, ही गोष्ट कुठंतरी लोप पावत चाललीय हीच खंत वाटते.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं माणूसकीच🔸
लेखन- सविता कोकिळ

      आज सारं विश्व एका मोठ्या संकटातून जात असताना माणूस जेवढ्या विपत्ति ना तोंड देतोय आणि अशा परिस्थितीत ही प्रत्येकजण ज्या पद्धतीने पाय रोवून उभा आहे ते पाहता कौतुक करावे तेवढे कमीच आहे.संपूर्ण जगाला या महामारीन जरी वेढलं तरी ही महामारी माणसा माणसांतल एक अढळ नातं दाखवून देतेय ते म्हणजे "नातं माणूसकीच". आज संपूर्ण जगातील घटना काही प्रसंग या नात्याला वृद्धिंगत करताना मनोमन जाणवतंय.आपण नात्यांचे विविध रंग पाहिले . माणूसकीच नात एक वेगळ्याच रंगात रंगलेल. जिकडे पहावं तिकडं सर्वसामान्य माणूस म्हणा ,पोलीस कर्मचारी म्हणा किंवा डॉक्टर ,नर्सेस सगळीकडे आज या नात्याची  इंद्रधनुशी रंगाची उधळण होताना दिसतेय.माणूसकीच हे नातच वेगळं अगदी परक्याना पण आपलंसं करणार .आज बघावं तिकडं हा माणुसकीचा झरा खळखळून वाहताना दिसतोय.अगदी गरीबातला गरीब व्यक्ती पण आपल्या परीने होईल ती मदत करायला पुढे येताना दिसतोय.ठिकठिकाणी अन्नछत्रा सारख्या सेवा चालू झालेल्या दिसू लागल्या.अगदी रस्त्यावरच्या मुक्या प्राण्याना देखील काळजी लोकं घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले.पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी दुधाच्या पिशव्या छोट्या छोट्या पिलांना फोडून दिल्या ,आपल्या शेतकरी मित्रांनी पण आपली शेतीची उत्पन्न लोकांना दान केली.लोक घरं बंद करून आपापल्या गावी गेली अशा परिस्थितीत शेजाऱ्यांना पाजार्यांनी त्यांच्या बाल्कनीतील झाडांना पाणी देऊन एक वेगळाच माणुसकीचा धडा सर्वांना दिला. मोठी श्रीमंत लोक तर मदत करतातच पण या महामारीन कानाकोपऱ्यातल्या लोकात माणूसकीच दर्शन घडवलं.माणुसकीचा किती अगाध महिमा दृष्टीस आणून दिला या महामारीने. रक्ताच्या नात्यासाठी सगळेच सरसावतात मदतीला पण माणुसकीच्या या अलौकिक नात्याने जगाला एक वेगळ्याच रूपाच दर्शन घडवलं.
          
आज ना उद्या या संकटातून आपण सगळेच सुखरूप बाहेर पडू पण उद्याच जग या महामरीतून ताऊन सुलाखून निघालेलं असेल.एक सोन्याची झळाळी घेऊन माणूसकीच वेगळं नात समभाळून  विश्व बंधुत्ववा ची भावना बरोबर घेऊन एक नवीन सतयुग जन्म घेईल यात शंकाच नाही.

savitakokil@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺


🔸नाते आपुले जन्माचे............विश्वासाचे🔸
लेखन- सौ.शुभांगी लेले

ही बहुतेक पु.ना.गाडगीळांची जाहीरात टी.व्ही.वर लागायची.तेव्हा झोपाळ्यावर बसलेल्या पाच पिढ्या बघताना गंमत वाटायची.
मूल जन्माला आलं कीं, त्याला लगेच नाती चिकटतात.आणि आई बाबांबरोबर या सगळ्या नात्यांची माणसाला गरज असते.एकटा माणूस जीवन जगू शकत नाही.नात्यांचीपण मोठी गंमत असते.काही नाती सतत कुरकुरणारी,तटस्थ,प्रेमाची,आपुलकीची,आंबट,गोड असतात.पण ती हवीत.त्या शिवाय गंमत नाही.या सर्व नात्यांची गुंफण रेशमाच्या कशिद्यासारखी असते."अवघा रंग एक झाला"प्रमाणे आपलही नातं मिसळून जायला हवं.नुसतं मिसळूनच नाही,तर रंगसंगतीही खुलुन दिसायला हवी.आईबाबांच नातं प्रेम,त्याग शिकवतं तर बहीणभावाचं नातं मनाला मुरड घालून दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं शिकवतं.
सगळ्यात गुरुंच नातं महत्वाचं.आपण चालत असतोच.पण कुठल्या वाटेवरुन चाललं की ध्येय गाठता येईल हे गुरु शिकवतात.जगात राम,वशिष्ठ,क्रुष्ण सांदिपनी इतकीच शिवराय दादोजी कोंडदेव,स्वामी विवेकानंद,रामक्रुष्ण परमहंसाचं नातं अनुसरणीय आहे.सावरकरांचं देशप्रेमाचं नातं जाज्ज्वल्य होतं.सर्वात जवळचं नातं मैत्रीचं.ते जपायला हवं.ही सर्व नातीतर आहेतच.पण माणसाचे निसर्गाशी असलेलं नातं महान आहे.सत्य आहे. कवयत्री इंदिरा संत म्हणतात,"मातीतून मी आले वरती,मातीचे मम अवघे जीवन."
शेवटी सर्वांचच नातं ,मातीशी आहे. म्हणून नाती जपायला हवीत कशीही असली तरीही!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
                  
नातं
लेखन- डॉ. सौ. गीतांजली आशिष दरुरे

 वाचन कट्ट्याचा लेखाचा विषय चित्कला ताईंनी सांगितला- नातं. विचार शृंखला सुरू झाली आणि कागदावर उतरवू म्हटलं तर माझा नेहमीचा पेनच  सापडेना. खूप शोधाशोध सुरू असलेली पाहून माझा मुलगा- अमेय म्हणाला, आई इतकंच ना?  माझा पेन घे,  त्यात काय?  म्हटलं, त्यात काय?  अरे, त्यात काय नाही विचार !, माझा खूप वर्षांचा सोबती आहे तो,  लाडका आहे अगदी! खास जागा आहे त्याला माझ्या मनात आणि माझ्या पर्समध्ये सुद्धा!.. हे ऐकून तो हसला. पण खरंच तो पेन माझ्यासाठी खास होता. वेगळं नातं होतं माझं त्याच्याशी आणि आज तो सापडत नसल्याने मी पुरती बेचैन होते. अखेर पेन  सापडला आणि शोध मोहीम थांबली. खुप दिवसानंतर आवडीचा एखादा नातलग भेटल्या प्रमाणे आनंद झाला. नातलग... एक निर्जीव नातलग !! वाटलं, अरे ! आपलं काय मग? असंख्य नाती जगतो आपण आयुष्यभर. काय असतं बरं हे नातं नक्की? 
      
थोर भारतीय तत्त्वज्ञानी जे., कृष्णमूर्ती म्हणतात, One  only  exsists  in Relationships !किती खरं आहे हे. नात्यांमध्येच  नात्यांसाठी आणि नात्यामुळेच अस्तित्व असतं आपलं. रक्ताच्या,  कायद्याच्या, ओळखीच्या नात्यात नसतानाही आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. काही हलवून टाकतात आपलं जग, खळबळ माजवतात, आयुष्याला गतिमान करतात, निरसपणा दूर करतात, काही हसवतात,  काही रडवतात, न पुसता येणारी अगदी पक्की छाप मनावर उठून आठवणींचा खजिना बहाल करून निघूनही जातात.... अगदी दूर... कधी आपण काही गोष्टींनी त्यांच्यापासून दुरावतो.. कधी काही तशीच राहतात साथ देत.. अगदी अखेरपर्यंत !!
      
किती विविध रूपांमधील उदाहरण तरी त्यांची.. आई-वडील मुलं, पती-पत्नी,  भाऊ-बहीण, गुरु शिष्य,  मित्र-मैत्रिणी, मामा -मावशी- आत्या आणि भाचे कंपनी, आजी आजोबा नातवंड, प्रियकर-प्रेयसी, सख्खे शेजारी,व्यवसायानिमित्ताने जुळलेले नाते. नाते जन्मभूमीशी,  कर्मभूमीशी, निसर्गाशी,  पाळीव प्राण्यांशी, नाते माणुसकीशी,  नाते भक्ताचे ईश्वराशी आणि सध्या इन्स्टंटच्या जमान्यात इंटरनेटमुळे जुळणारे अगदी आधुनिक ऑनलाइन आभासी नाते... एक ना दोन.. किती हे प्रकार!
      
असे म्हणतात की, प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा एक ऑरा असतो. काही खास लहरी, व्हायब्रेशन्स असतात. या जिथे ज्याच्यापाशी जुळतात तिथे नात्याची सुरुवात होते.
 मला तर वाटतं हा नियम इतर वस्तूंना, अगदी खाद्यपदार्थांना ही लागू होत असेल. असेल का? बघा ना- पाटी म्हटलं की पेन्सिल, बॅट म्हणलं की बॉल, पोळपाट म्हटलं की लाटणं, छोले म्हटलं की भटुरे, झुणका म्हटलं की भाकरी! एकाचं नाव घेतलं की दुसरी वस्तू डोळ्यासमोर अवचीत आलीच म्हणून समजा. 
        
माझ्यामते नातं कोणताही असो- प्रेम, समाधान, आनंद, भावनिक मानसिक सुरक्षितता, पाठबळ, त्रास, मनस्ताप, हुरहुर, खेद, काळजी, कधी अभिमान यातील काही तरी नक्कीच देते. मनस्ताप मिळाला तर मागे टाकून पुढे जायचं. समाधान, आनंद देणार्‍यां नात्यांना मनापासुन जपायच. पूर्वग्रह न ठेवता मनाची दालन सर्वांसाठी मुक्त ठेवून नात्यांच स्वागत करायचं. विनातक्रार, डोळसपणे नातं स्वीकारायचं योग्य प्रतिसाद देत, अतिक्रमण न होऊ देता, स्पेस जपत, नात्यात दरी पडू न देता ते अधिकाधिक फुलवण  शेवटी आपल्याच हाती आहे. हो ना? आणि अशा या नात्यावर सुचलेली एक कविता...
                 
नातं- कधी नकळत, कधी उमजून जुळलेलं.
कधी व्यक्त कधी अव्यक्त शब्दाविण जाणलेलं.
नातं- कधी अल्लड, कधी हळव अन् शहाणही 
कधी पोक्त, निखळ, प्रेमळ जपलेलं मनी...
नातं- कधी बोलकी तर कधी अबोल
कधी हसरं, तर कधी उदास,  निरस, रुसव
नातं- कधी बिलगणार कधी दुरावणार
कधी लाडिक, लडिवाळ
कधी उथळ, कधी खोल मुरलेलं उरी 
नातं- एक सुरेख, रेशमी बंधन ज्याला विश्वास अन् जिव्हाळ्याचे कोंदण. 
हा अंतरीचा जिव्हाळा विश्वास नातं गुंफणारे धागेच. 
पण आजच्या मोहमयी मायाजालात आभास नात्यांचे. 
फोलपणा आभासी विश्वातील मृगजळी नात्यांचा वेळीच आहे ओळखायचा..
आभासी जगातून परत जाणिवांकडं फिरूया
गर्द हिरव्या नात्यांनी पुन्हा नव्याने जगूया.
कधी अलिप्त राहून स्वतःशी  ही नातं जोडूया. 
कधी अलिप्त राहून स्वतःशी ही नातं जोडूया. 
    
 geetadarure@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

नातं- भाग ४

🔸नाते जन्माचे🔸 
लेखन- सौ.हर्षदा मराठे

' Dr.Gauri Weds Dr.Sohan ' अशा मथळ्याची पत्रिका घेऊन सौ. सुहास ताई वझे आणि त्यांची मुलगी गौरी  डॉ.सुखदा खरे यांच्या ओपीडी मध्ये आल्या."डॉक्टर मला ओळखलंत?" सुहास ताईंनी डॉ.सुखदाना विचारलं.क्षणभर डॉक्टर बुचकळ्यात पडल्या.गेली ३५ वर्ष त्या अतिशय निष्णात आणि हुशार gynaecologist म्हणून प्रसिद्ध होत्या.आज अचानक सुहास ताईंना बघून त्या भूतकाळात गेल्या...

 "तुम्ही...सुहास...डॉ.अनंत वझेंच्या पत्नी ना.."
"हो! डॉक्टर ही बघा गौरी! माझी मुलगी!तुमच्यामुळे आज... आम्ही हे सुख अनुभवतोय डॉक्टर!
गौरी च स्वप्नं होतं डॉक्टर होण्याचं..ती तुमच्यासारखी MD Gynac karte ahe तिचा होणारा नवरा MD Radiology करतो आहे. डॉक्टर तुम्ही दोघांनीही तिच्या लग्नाला मुंबईला यायचं आहे."
"अरे वा!अभिनंदन तुमचं सगळ्यांचं!"
"डॉक्टर माझ्या पदरात हे सुख घालणाऱ्या ' गॉड मदर' कोण आहेत हे गौरीला जाणून घ्यायची खूप इच्छा होती. म्हणूनच मी तिला तुम्हाला भेटायला घेऊन आलीय"
गौरीने डॉक्टरांना वाकून नमस्कार केला. डॉक्टरांनी  तिला भरभरून आशीर्वाद देत तिच्या लग्नाला यायचं कबुल केलं.सुरेख, सुडौल बांधा असलेल्या अतिशय स्मार्ट देखण्या अश्या गौरीला बघून डॉ. सुखदांच्या डोळ्यासमोर तिची जन्मकहाणी उभी राहिली......

"अहो डॉक्टर! काहीतरीच काय सांगताय? माझी पाळी जाऊन एक वर्ष तरी नक्कीच झालंय... असं कसं...शक्यच नाही हो हे.."कमलताई सबनीस डॉक्टरांना म्हणाल्या. त्यांना रडू आवरेना.त्याला कारणही सबळ होतं. कमलताई साधारण ४७ वर्षांच्या होत्या. पोट वाढतंय, जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय, अशक्तपणा वाटतोय म्हणून त्या डॉक्टर सुखदा यांच्याकडे तपासणी करायला आल्या होत्या. डॉक्टरांना कमलताई ना फायब्रॉइड किंवा ट्यूमर असावा अशी शंका येऊन त्यांनी त्यांची सोनोग्राफी करायला लावली.
पण रिपोर्ट नुसार त्यांना चक्क दिवस गेले होते.छान सात महिन्याच बाळ त्यांच्या कुशीत वाढत होतं. मॉनिटरवर बाळाचे ठक ठक असे ठोके ऐकल्यावर कमलताई ना अश्रू अवरेनात. डॉ.सुखदा नी त्यांना शांत केलं आणि त्यांची खरी कहाणी सांगायला सांगितली.

"डॉक्टर ,काय सांगू तुम्हाला माझे पती रेल्वे मध्ये नोकरी करत होते. गेल्यावर्षी त्यांनी voluntary retirement घेतली.कारण त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. गेले ४ महिने ते खूप आजारी आहेत. माझी मुलगी इंजिनिअर होऊन सर्व्हिस करतीये. मुलगा बारावी ची परीक्षा देतोय. माझी दोन्ही मुलं खूप हुशार आणि गुणी आहेत हो. डॉक्टर ...मुलीच्या पगारावर कसंबस आमचं घर चाललंय.ह्या बाळाला जन्म देऊन मी त्याचं पालनपोषण तरी कसं करू?शक्यच नाही..शिवाय लोक काय म्हणतील...माझी मुलगी लग्नाची आहे हो..." कमलताई जीव तोडून डॉक्टरांना सांगत होत्या.बडॉक्टरांनाही काही सुचेना.अशी अगदी लाखात एक असलेली पुस्तकात वाचलेली केस पहिल्यांदाच त्या प्रत्यक्ष  बघत होत्या.डॉ.सुखदा यांनी आपल्या दवाखान्यात मी कधीच मुद्दाम गर्भपात करणार नाही असं वचन आपल्या आईला दिलं होतं...आणि ते पाळल ही होतं.अशावेळी ह्या अगतिक कमलताई डॉक्टरांना " माझा गर्भपात करा डॉक्टर!" अशी गळ घालत होत्या. एक आई असूनही कमलताईबखूप हतबल झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला आणि "उद्या तुमच्या मुलीला घेऊन या... मी तिच्याशी बोलते" असं म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी कमलताई आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरांच्याकडे आल्या. डॉक्टरांनी मुलीला कमलताईच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची कल्पना दिली.तिलाही हा खूप धक्का होता.पण डॉक्टर म्हणाल्या,"हे बघ सुमन, तुझ्या आईच्या पोटात नकळत हे बाळ वाढलंय. अशी केस लाखात एक असते.तुम्हाला खरंच हे बाळ नको असेल तर हे बाळ ज्यांना मूल दत्तक घ्यायचाय अशा माझ्या ओळखीच्या पेशन्ट ना देण्याची मी व्यवस्था करीन. पण तुम्ही गर्भपाताचं पातक करू नका...तो गुन्हा आहे.ह्या बाळाला कोणी दत्तक घेतलं नाही तर मी वाढविन तुमच्या बाळाला...पण त्याला जन्म द्या " खूप विचारविनिमय केल्यावर कमलताई आणि सुमननी होकार दिला. कमलताई च्या पतींची संमती घेतली.डॉ.सुखदा यांनी त्यांना आश्वासन दिलं," सगळंव्यवस्थित होईल. असं होतं कधीकधी. तुमची rare case ahe . कोणालाही सांगू नका की तुम्ही गर्भार आहात.दोन महिन्यांनी ऑपरेशन आहे असं सांगा.काळजी करू नका, ईश्र्वर आपल्या पाठीशी आहे"

कमलताई आणि सुमन यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. ठरल्याप्रमाणे कमलताईनी एका गोड गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी अगदी सुदृढ गोबऱ्या गालावर सुरेख खळया असलेली होती.कमलताई नी ती जन्माला आल्याबरोबर "डॉक्टर फक्त एकदा मला तिला बघू द्या! नंतर अजिबात तिला माझ्यासमोर आणू नका...नाहीतर माझ्यातली आई  जागी होईल.. मी तिला दुसऱ्याला देऊ शकणार नाही"असं सांगितलं. ते बाळ इतकं गोंडस  होतं की नर्सेस, आया म्हणायला लागल्या,"अगर कोई इसे नही ले जायेगा तो मै इसे पालुंगी !"
डॉ. सुखदानी तोपर्यंत आपल्या ओळखीच्या अपत्य नसलेल्या पेशंटना कळवले होते. चौथ्या दिवशी डॉक्टरांना मुंबईचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनंत वझे यांचा फोन आला. त्यांच्या पत्नी सुहास १२ वर्षांपूर्वी डॉ.सुखदा यांच्याकडे येऊन गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना "तुम्हाला स्वतःचे मूल होणं शक्य नाहीये तेव्हा तुम्ही एखाद बाळ दत्तक घ्यावं" असा सल्ला त्यांना पूर्वीच दिला होता. डॉ.वझे नी बाळाला पूर्ण तपासल आणि  डॉ. सुखदा ना म्हणाले" डॉक्टर तुमच्या हातच बाळ घेण्यात आम्हाला धन्यता आहे! फक्त एक दिवस हे बाळ कोणाला देऊ नका. मी उद्याच आमचा निर्णय तुम्हाला कळवतो."

डॉक्टर सुखदा यांच्या चेहेऱ्यावर आनंद झळकू लागला. लक्ष्मी सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेल्या डॉ.अनंत व सौ.सुहास वझे यांचं जीवन अपत्याविना नीरस आणि निरर्थक होतं.सौ.सुहास यांनी त्या बाळाची पत्रिका त्यांच्या ओळखीच्या ज्योतिषाला देखील दाखवली ."ह्या मुलीची तिच्या जन्मदात्या आईवडिलांशी ताटातूट होईल ...पण ज्या घराण्यात ही मुलगी जाईल त्या घराण्याचं ही नाव काढेल... खूप निष्णात डॉक्टर होईल ही!" असं भविष्य वर्तवल.

दुसऱ्या दिवशी वझे  पतीपत्नी हजर झाले." आम्हाला बाळाला घ्यायचं आहे!"असं त्यांनी डॉ.सुखदा यांना सांगितलं.डॉ.सुखदा म्हणाल्या," तुमचा विचार पक्का झालाय वाटतं. तुमच्यासारखे आई वडील त्या बाळाला लाभणार हे तिचं भाग्यच!"
इकडे कमलताई ना एकीकडे आपलं बाळ चांगल्या सुखवस्तू घरात जाणार म्हणून आनंदही होत होता ...पण त्यांचं आईचं मनही आक्रंदत होतं.हृदयावर दगड ठेऊन त्यांनी हा निर्णय असहायपणे घेतला होता. डॉ.अनंत आणि सौ.सुहास यांना तर बाळाला बघून स्वर्ग दोन बोटे उरला होता. कमलताई शी त्यांचे काय ऋणानुबंध होते कुणास ठाऊक पण ह्या दोघांसाठी बाळाने जन्म घेतला होता. " डॉक्टर आयुष्यात कधीही आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही.तुम्ही Godmother आहात..आमच्या जीवनाला तुम्ही नव्याने अर्थपूर्ण केलंय. "डॉ.वझे म्हणाले..." मी काहीच केलं नाहीये... कर्ता करविता तो परमेश्वर आहे! त्यानेच तुमच्यासाठी हे बाळ पाठवलं. मी फक्त एक निमित्त.पण हे सगळं चांगलं घडलं याचा मला मनापासून आनंद होतोय.तुमच्या घराण्यात ही मुलगी अगदी सुखात वाढेल याचं मला खूप समाधान आहे."डॉक्टर म्हणाल्या. नंतर रीतसर कायदेशीर दत्तक विधान  होऊन ते कमलताई च बाळ वझेंच झालं.त्यानंतर कमलताई मात्र आजतागायत डॉक्टरांना कधीच भेटल्या नाहीत.आज इतक्या वर्षांनी देखील डॉक्टरांना तो प्रसंग नुकताच घडला असल्या सारखा डोळ्यापुढे उभा राहिला. डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले...

 धन्य ती माऊली कमलताई!आणि धन्य ते डॉ.वझे पती पत्नी !

 कसं जन्मांतरीच नातं असतं ना...माणसाच्या हाती कुठे जन्माला यावं हे नाही... लग्नानंतर कोणाशी *नवीन नातं* जुळेल माहीत नसतं...आई झाल्यावर कसं मूल जन्माला येईल माहीत नसतं...पुढे सून, जावई आणि नातवंडे ... वाढतच जातात ही  रक्ताची नाती...याशिवाय बालपणापासून अनेक आप्त,मित्र मैत्रिणी हितचिंतक ही नाती वेगळीच...पण *सहवासान ही नाती अधिकाधिक घट्ट होतात एवढं मात्र खरं!
               
harshadamarathe6665@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸एका आईची गोष्ट🔸
लेखन- सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर. 

खरच ही एका आई ची गोष्ट आहे. ही।आई आहे एक बुलबुल पक्षी. हो, बहुतेक तिला माझ्या सासूबाई लाल बुड्या म्हणत. माझ्या गच्चीत जायचा रस्ता माझ्या स्वयंपाक घरातून जातो. गच्ची ला जायच्या दारात एक मनिप्लॅन्ट चा वेळ आहे. दर एप्रिल मध्ये, तिथे जोडीने बुलबुल येतात व वेलाची पहाणी करतात. शांतपणे त्या फांद्यांवर बसून भरपूर चिवचिवाट करतात, जसे की जणू एकमेकांना सांगतायत की 'हेच ते आपलं स्वप्नातलं घर'. 
मी दाराआडून त्यांना पहात असते. मग पुढचे ६-७ दिवस, त्यांची लगबग सुरू असते. दोघेही चोचीतुन काडी, कापूस जे मिळेल ते आणत असतात व त्यांच घरटं आकार घेत असतं. आणि मी मनोमन त्यांना माझं घर व वेल त्यांच्या घरट्यासाठी आवडलं, म्हणून खुश होते. 
खरंतर हा छंद मला पहिल्यांदा, माझी लेक (सोनू) डिलिव्हरी साठी आली, त्या वेळी लागला. संध्याकाळी ऊन उतरले की आम्ही दोघी गच्चीत जात असू व रात्रीचे जेवण आटपुनच परत घरात येत असू. थोडा अंधार पडला की मी गच्चीतला लाईट लावायची. 
पण एके दिवशी एक मजेशीर गोष्ट घडली. लाईट लावल्यावर त्या वेलितून एक बुलबुल बाहेर आली आणि त्या लाईट बल्ब वर जोरजोरात चोचीने मारू लागली. ती खूप रागात दिसत होती. तिच्या डोक्यावरील केस (फर) पण पूर्ण उभे होते. तिचा राग तिच्या कृतीतून स्पष्ट दिसत होता. मी लाईट ऑफ केला आणि ती परत घरट्यात गेली. 
२-३ दिवस हेच चालू होते. चवथ्या दिवशी घरट्यातून बारीक आवाज यायला लागले. तिचा व तिच्या जोडीदाराचा मोठं-मोठ्याने चिवचिवाट सुरु झाला. तेंव्हा मला कळले, की अंड्यातल्या तिच्या पिल्लांना बल्ब ची उष्णता सहन होत नव्हती, म्हणून ती चिडली होती. 
ती आई होती. तिची ती तगमग, त्या पिल्लांसाठी होती. त्यावेळी मी एक आई आणि आई होऊ घातलेली माझी लेक, आम्ही दोघीही अचंबित झालो. 

खरच, आई ही फक्त आई च असते. मग तो मनुष्य, प्राणी, पक्षी, कोणत्याही रुपात असो. 
खरंच, "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी". पुढे तिची आणि तिच्या जोडीदाराची, पिल्लांसाठीं सर्व धडपड सुरू झाली. थोडा वेळ ती व थोडा वेळ तो, आळीपाळीने पिल्लांची ड्युटी करत होते.  चोचीतून काही-बाही खायला घेऊन येत होते. पिल्लानाही अन्नाचा वास येत असावा. त्यांच्यात लगेच आ करून घास घ्यायची चढाओढ सुरू व्हायची. 
हे सर्व पहात सोनू आणि मी, अगदी त्यांच्यात रमून गेलो होतो. जसं काही आपलंच बाळ आपण मोठं करतोय. मग एक दिवस विचार केला, की हा क्षण आपण व्हिडिओ शूट करून ठेवावा. मी माझ्या नवऱ्याला व्हिडिओ शूटिंग करायला सांगितले. 
तो ही कॅमेरा घेऊन सज्ज झाला. प्रथम किचन च्या दारातून शूट केलं व हळूहळू थोडे पुढे सरकत गच्चीत प्रवेश केला. लगेच तिने मोठ्याने चिवचिवाट सुरू केला. हे माघारी आले. छान शॉट मिळाला म्हणून आम्ही खुश होतो. 
दुसऱ्यादिवशी सकाळी नेहेमी प्रमाणे माझी नजर वेलीवर गेली, पाहते तर काय, घरटे रिकामे - - - - - .
मला चुटपुट लागली, बिचारी घाबरली आमच्या कृतीला.
मला फार वाईट वाटले व रागही आला स्वतःचा. 
वाटले, आता परत ती येईल ना इथे अंडी घालायला? 
मन अगदी बेचैन होतं. 
पुढं सोनूची डिलिव्हरी झाली, आणि आमचं पिल्लू पण मोठं होऊ लागले.  
आणि पुढचा एप्रिल उजाडला. माझं लक्ष वेलीकडे गेलं. 
आणि पाहते तो काय, ती परत आली होती. 
छान अंडी उबवत बसली होती. 
यावेळी तिला नजरेनेच म्हंटले, बाई तुला आणि तुझ्या पिल्लांना कोणताही त्रास होईल, असं आम्ही काहीही करणार नाही. 
पण दरवेळी इथंच ये अंडी घालायला, माहेरवाशिणी सारखी. 
बहुधा तिला माझी नजर कळली. 
शेवटी, एक आई दुसऱ्या आईशी बोलत होती ना. 

vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नात🔸
लेखन- सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर

आजकाल सर्वत्र हे गाणं सतत ऐकू येत असतं. 
" ऐ मेरी जमी, अफसोस नही, 
   तेरे लिये जो सौ दर्द सहे, 
   मेहेफुझ रहे तेरी आन सदा, 
   चाहे जान मेरी ये रहे ना रहे। "
आणि या ओळी मला आतून हलवून जातात. 

आज एक व्हिडिओ पहिला. पुण्यातील एक स्टाफ नर्स २० दिवसांच्या ड्युटी नंतर घरी परत आली. सर्वांनी तिचे फुले उधळून स्वागत केले. पण घाबरून, कोणीही तिच्याजवळ गेले नाही. शेवटी तिच्या एक मैत्रिणीने तिला प्रेमाने मिठी मारली. हे पाहून  डोळे भरून आले. 
खरंच, आपण नाती फक्त आपल्या रक्ताची व जवळच्या मित्र-मैत्रिणी यांच्यात हुडकतो. 
पण काही नाती किती निस्वार्थ असतात, हे आज कळलं. आणि त्या नात्याशी आपण कुठल्याच नात्याची तुलना करू शकत नाही. आज जगात सर्वत्र Covid19 ने हाहाःकार माजवलाय. सगळं जग भयभीत झालंय.  
 
"पण त्याच वेळी काही लोक, आपल्या जिवाची पर्वा न करता, आपल्या रक्ताच्या नात्यांना बाजूला ठेवून, जिवाची बाजी लावून रुग्णांना जिवदान देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत". 
माझं हे वाक्य खूप मोठं आहे, पण मला ते याहीपेक्षा मोठं लिहायचं होतं. वाटत होतं की त्यात अजून खूप काहीतरी लिहिलं पाहिजे. पण मग जाणवलं, की त्यांच्या विषयी लिहायला माझ्याकडे शब्दच नाहीत. प्रत्येक देशातील डॉक्टर्स, नर्सेस, इतर पॅरामेडिकल स्टाफ, हेल्थ वर्कर्स, पोलिस, सफाई कामगार हे अहोरात्र झटतायत आपला देश वाचवण्यासाठी. 
खरंच हे सगळे लोक *आपले*  कोण लागतात? तरीदेखील देशासाठी त्यांनी 'त्यांच्या आपल्याना' बाजूला ठेवलंय. त्यांनी त्यांची पत्नी, मुलं-बाळं, आई-वडील, बहीण-भाऊ अशी सर्व नाती पणाला लावलीयत.  फक्त देशाबरोबर असलेलं त्यांचं नातं टिकवण्यासाठी. 
आणि 'ते' अहोरात्र झटत आहेत, म्हणूनच आपण उद्या ह्या संकटातून बाहेर येऊ अशी खात्री  आहे. काही डॉक्टर्स घरी न जाता गाडीत रहात आहेत. तर काही घराच्या गेट च्या बाहेरून घरच्यांशी संवाद साधत आहेत. 

सगळं सोडून दिवस-रात्र हॉस्पिटल ड्युटी करत आहेत. हेही शेवटी डॉक्टर व पेशंट यांच्यातलं अतूट नातंच आहे. ते निभावताना ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत. 
हेल्थ वर्कर्स आज घरोघरी जाऊन  सामुपदेशन करत आहेत, लोकांना मानसिक आधार देत आहेत. ही सर्व नाती अनामिक आहेत, जी सर्व नात्यांच्या वरची आहेत. जशी *'देव व भक्त'* ही नाती निःशब्द आहेत तशी. यांची तुलना कोणत्याच नात्यांशी होऊ शकत नाही. 
आपले लाडके पंतप्रधान 'श्री नरेंद्र मोदीजी' देशाला या संकटातून सावरण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत.  त्यांचे तर १३० कोटी देशवासींयां बरोबर रक्तपेक्षाही जवळचे नाते आहे. 
म्हणूनच देशातील प्रत्येकाला वाचवण्या साठी ते काळजी पोटी हात जोडून घरात राहण्याची  विनंती करत आहेत. आम जनतेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी, आपले लाडके श्री रतन टाटा यांनी आपल्या सर्व पंचतारांकित हॉटेल्स ची दारे उघडली. 
खरंतर या लोकांचे कार्य शब्दात वर्णन करण्यापालिकडचे आहे. 

नातं या विषयावर जेंव्हा विचार केला, तेंव्हा मला as a Human Being, इतर सर्व नात्यांपेक्षा ही नाती जास्त भावली, जी शब्दातीत आहेत. आणि या सर्व नात्यांचा उल्लेख झालाच पाहिजे.  हिच आपल्या सर्वांकडून या निःस्वार्थ सेवा करणार्यांना आदरांजली.  

vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं🔸
लेखन- पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर 

साधारण ३०-३५ वर्षां पूर्वीची घटना आहे. अजून जशीच्या तशीच डोळ्यासमोर उभी आहे. 
दुपारी २.३० - ३.०० ची वेळ होती. डॉक्टर ओपीडी, थिएटर वगैरे सर्व आटपून घरी जाण्याच्या तयारीत होते. मी ही माझी कामं आटपून कंसलटिंग मध्ये बसले होते. 
तेवढ्यात सिस्टर सांगत आली, 'सर खेडे गावातून एक पेशंट आली आहे.त्यांच्या बरोबर १५-१६ वर्षाची मुलगी आहे. थोडं अर्जंट आहे असं तिची आई म्हणतीय.' डॉक्टरनी पेशन्ट ला आत बोलावले. ती मुलगी, आई व बाबा असे आत आले.
आई -मुलीचे डोळे रडून सुजलेले होते.मध्येच आई मुलीला रागावत होती. 
मी म्हणाले 'मावशी थोडया शांत व्हा, काय घडलंय ते आधी सांगा.'
आईला कुठून सुरू करावे काही कळेना. थोडा आवंढा गिळून ती बोलू लागली.
'सायेब पाया पडते, माझ्या मुलीला एवढं मोकळं करा. कूटं श्याण खाऊन आलीय कोण जाने? हे व मी एकदम चमकून त्या मुली कडे पाहू लागलो. मी म्हणाले 'मावशी काळजी करू नका, शांत पणे काय झालय ते सांगा.' 'सायेब ७-८ महिन्या पूर्वी लेक मोठी झाली. म्हटलं चला, थोडया दिवसात तीच लगीन लावून द्यायचं, म्हंजी मी मोकळी, अशा विचारात होती. दोन म्हैनं झालं पोरीचं चित्तच थाऱ्यावर नाही. जेवन बी नीट जेवत नाहीं. लई मलमळतय म्हणतीय, म्हनून-शान दागदर कडं घेउन गेले. दागदर म्हंटला, पोरीला दिस गेलेत.' 'काय सांगायचं सायेब, दिसभर म्या शेतात राबती,पोरीला कशाची झळ लागु दिली न्हाय. तर पोरींन ह्ये गुण उधळले.' आईच्या डोळ्यात राग भरला होता. आई म्हणाली 'ह्यो माझा भाव हाय, त्यो बी मदत करतो. ह्याच्याकडच म्या राहते.' 

सगळं ऐकून मला ही खूप वाईट वाटलं. 
डॉक्टरांनी मुलीला तपासले. मुलगी गरोदर होती. आता प्रथम आईला शांत करणे गरजेचे होते. मी त्या आईशी बोलू लागले. त्यांची समजूत घातली. 'तरुणपणी मुलं चुकतात, आपण त्याना संभाळून घेतलं पाहिजे. तुम्ही शांत व्हा, यापुढं ती असं वागणार नाही. आपण तिला समजावून सांगू.'  तिकडं डॉक्टर त्या मुलीला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. पण ती काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. शेवटी डॉक्टर तिला म्हणाले, एक छोटीशी प्रोसिजर आहे. ती केली की झालं, तू बरी होशील. मुलीनं ही कळल्यासारखी मान हलवली. बिचारी घाबरली होती. रीतसर जी प्रोसिजर होती ती करून, मुलीला वॉर्ड मध्ये हलवले. 
आई अजून रडतच होती. दुसऱ्या दिवशी, मुलीला डिस्चार्ज दिला. आई व मुलीच्या डोळ्यात कृतज्ञतेची भाव होते.डॉक्टर नी मुलीला पुढील सूचना दिल्या. मुलीने ही निरागसपणे मान हलवली. आता तिची भीड चेपली होती. दोघीही डॉक्टरांच्या पाया पडून शांत मनाने घरी गेल्या. पुढे आम्ही ही घटना विसरून पण गेलो. असेच ६-७ महिने गेले. 
एक दिवस सिस्टर ने येऊन सांगितले, 'Mam ती मुलगी परत आली आहे.' 
आम्ही दोघांनी चमकून तिच्या कडे पाहिलं. ती परत म्हणाली, 'हो Mam मायलेकी परत आल्यात.'  तिचा नंबरआल्यावर दोघी आत आल्या. आता मुलगी शांत होती, पण आई बेचैन होती. 'सायेब पोरीला परत दिस गेलेत, कायबी करूनशान मोकळं करा.' 
 डॉक्टर म्हणाले, 'अहो मावशी, तुम्हाला हे ऑपरेशन म्हणजे काय गम्मत वाटते का? मुलगी किती लहान आहे याचा विचार करा.' तशी आई सरसावून बसली व शांतपणे बोलू लागली.
'काय सांगू सायेब, गरिबी लई वाईट. लेक धा वरसाची झाली, तवा तिचा बा गेला.' तिने वर हात करुन सांगितले.  'सासरच्या लोकांनी घरा भाईर काढलं. भाऊ म्हनला आक्का, माझ्या कडं ये राहायला आणि माझ्या शेतात काम कर. 
मला बी आधार मिळाला सायेब. मागच्या वेळी दिस गेलं त्या वेळी घरी गेल्या वर पोरीला लई खिदडल, तेंव्हा पोरींनं नांव सांगितलं आणि पाया-खायची जिमिन सरकली.' 
तिच्या चेहऱ्यावर चे भाव सर्रकन बदलले, डोळ्यात राग भरला. म्हणाली 'सायेब कुंपनच श्यात खातय!'  'ह्यो माझा भाव च हाय ह्या सगळ्या माग. विचारलं तर म्हंतोय, माझ्या घरात रहायचं तर हे असंच चालणार, नाई तर तुमची तुमची सोय बगा.' 
सायेब तरनी पोर घेऊन कूटं जावू?  म्हंटल 'आर मग लगीन कर तिच्याशी'. तर म्हनतोय 'हिच्याशी कोन लगीन करनार.' 
'गरिबी लै बेकार असती, सायेब. . बघून न बघितल्या सारकं करावं लागतं.'
आईचा चेहेरा बघवत न्हवता. तिची हतबलता तिच्या नजरेत दिसत होती. 
डॉक्टर तिला म्हणाले , 'असं वारंवार होणं चांगलं नाही मावशी. मुलगी लहान आहे, तिची काळजी घेतली पाहिजे.'  त्यावर ती म्हणाली, 'सायेब दुसरा काही उपाय असल तर सांगा.' 
आम्ही ही हताश पणे तिच्याकडे पाहिले. 
झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी--- मामाच्या गावाला जाऊया

खरं तर मामाभाच्यांचं नातं दुधात विरघळलेल्या साखरे सारखं असतं. 
मुलांना त्यांचा मामा सुपर हिरो वाटत असतो.
पण ज्या मुलांचं बालपण त्यांच्या जवळच्यांच्या कडून च हिरावून घेतलं जातं, त्यावेळी आपण किती हतबल आहोत हे जाणवतं.  आणि मन सुन्न होतं, विचार करण्याची क्षमता संपते. 
vijaybenadikar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸सुखद नाती🔸
उमेश कुलकर्णी

चैत्र पालवीसारखी नवनवी मंडळी नवोन्मेषी उत्सुकतेनं, कुतूहलानं डोकावताहेत आणि हळूच स्थिरावताहेत.. खूपच छान ...चैत्र महिना आहेच मुळी पालवण्याचा उमलण्याचा आणि फुलण्याचा...कट्टा असाच बहरत राहो...! या वेळेचा विषय ' *नातं* ' असा आहे. खरंतर खूप मोठा आवाका यात सामावलेला आहे. प्रत्येकाची कित्तेकांशी, कितीतरी नाती असणार... असायलाच हवीत... आईच्या उदरातून या जगात येताना  आईच्या नाळेशी असलेलं शरिरी नातं तुटतं पण त्यानंतर कुणाकुणाशी किती नाती निर्माण होतात हे बघितलं की मन थक्क व्हायला होतं. माणसाशी असलेली नाती सोडाच पण पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, सजीव, निर्जीव अशा कोणाशीही तो  नातं जोडू शकतो. पंचमहाभूतातील कोणताही पदार्थ (ऑब्जेक्ट) त्याला वर्ज्य नाही. इतकंच काय, अदृश्याशीही तो नातं जोडू शकतो. अगदी निश्चिंत आणि निश्चितपणे.... बुद्धीला थोडं ताणलं तर सगळं लक्षात येईलच. पहाटेच्या मंद झुळकीच्या ज्ञातापासून स्वप्नात भेटणार्‍या अज्ञातापर्यंत कशाशीही नातं जोडता येतं. नातं हे  कुणाला तरी अडकवण्यासाठी केलेलं कोळ्याचं जाळं नसतं तर तो आपलेपणाचा जिव्हाळ्याचा एक बंध असतो... आणि तसं असलं तरच हे नातं टिकतं....माझं तलतच्या मखमली हळव्या आवाजाशी असणारं नातं.. पंडित हृदयनाथांच्या कल्पकतेची असणारं नातं... ज्ञानेश्वरांच्या उत्तुंग प्रतिभेशी... लतादीदींच्या अलौकिक स्वरांशी.. साहिरच्या काव्याशी... वहिदाच्या घरंदाज सौंदर्याशी.. मधुबालाच्या घायाळ हास्याशी... पंडित भीमसेन जोशींच्या स्वरधारांशी... चार्ली चँप्लीनच्या करूण हास्याशी... (व्यक्तिपरत्वे ही यादी खूपच मोठी आहे.) तर, या सर्व नात्यांमुळे मला मिळणाऱ्या जादुई आनंदानुभूतीशी पक्का जोडला गेलोय. माझं त्यांच्याशी वर्णनातीत, अम्लान, अशरीरी असं नातं आहे. असो ...एक शेवटचं नातं... 'माझं माझ्याशी'.. खरंच, माझ्यातल्या 'मी'शी माझं नातं कसं आहे हे कधी आपण बघतो काय ? बघितलं पाहिजे. मी कसा आहे हे बाहेरचे लोक सांगतातच पण माझ्यातल्या 'मी'च काय ?... त्याच्याशी आपलं नातं कसं आहे ? किती खरं... तकलादू... नाटकी....फसवं.. किती प्रामाणिक...
  बाहेर असलेली नाती जपताना, टिकवताना, वाढवताना आपलं आपल्याशी असलेलं... जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत असलेलं स्वतः शी असलेलं नातं तुटू न देता माझ्यातल्या 'मी' ला सांभाळायला हवं ..माझ्यातल्या 'मी' ला बहकू न देता बहरू द्यायला हवं .. विस्तारभयास्तव.... विराम.....
   
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी