*साद-प्रतिसाद*
© डाॅ.श्रुती
अशी किती तरी उदाहरणं आहेत की त्यात आपल्याला प्रत्यक्षात कोणीही साद घातलेली नसते अन् प्रतिसादाची अपेक्षाही कोण करत नसतं.पण तरीही या साद- प्रतिसादाच्या क्रिया नकळत एकमेकांकडून घडतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत होईल असंही नाही हं! ज्याला त्याची साद जाणवली तोच त्याला प्रतिसादही देतो.
तुझ्या स्पर्शाने जागी होते सृष्टी सारी,
दारी सडा-रांगोळी ही तुझ्याच आगमनाची तयारी.
सुर्य नेहमीच उगवतो पण आपल्यातले ठराविकजणच सकाळी लवकर उठून सडा-रांगोळी करून त्याला प्रतिसाद देतात.नाहीतर ८-९ पर्यंत झोपणारेही आहेतच की.खरंच किती सुख मिळत ना सकाळी-सकाळी अंगणात वावरताना.दूर कुठुन कोकीळेचा आवाज साद घालत असतो.तर कधी पारिजातकाच्या फुलांचा सडा आपल्याला साद घालुन जवळ बोलवत असतो.
कोपऱ्यात बसूनही,सिमेंटच्या चौकटीत राहूनही,
आमचा पारिजातक सगळ्यांनाच खुणवायचा,
रोज सकाळी फुलांचा सडा पाडायचा.
वेगवेगळी फुलं,पानं,पक्षी किती जण साद घालत असतात आपल्याला.
*अचानक तो जवळ आला,*
*काही वेळातच त्यांना मोहून टाकलं,*
*दोघांचं काहीच नातं नसलं तरी;*
*डोळे त्याच्या शोधात निघाले*
*तो होता-"सुगंध".*
या अंगणातील सुगंध हवेत दरवळताच आपण आपल्या आवडीच्या सुगंधाकडे नकळत आकर्षिले जातो.त्याच्या शोधात निघतो.त्या सुगंधाला आणि त्याच्या रूपाला प्रतिसाद देणारे आपण एकटेच नसतो बरं का! फुलपाखरं आधीच पोहचलेली असतात.मग ही फुलपाखरं आपल्याला साद घालतात आणि आपण त्यांना पकडण्यासाठी धडपडू लागतो.आनंदाने बागडु लागतो.
*तुला शोधण्यासाठी नजर जाते माझी दूरवर,*
तू कधी या फुलावर, तर कधी त्या फुलावर.*
पिवळा, जांभळा, निळा, तपकिरी रंग तुझा मखमली.
इवल्याशा हातांना झाली तुला पकडण्याची घाई.
किती आकर्षक रंग असतात ना या फुलपाखरांचे.त्यांनी साद घातली अन् आपण त्याला प्रतिसाद दिला नाही असं होईल का?अशीच प्रतिसाद देण्याची घाई आपण करतो, जेंव्हा काळे ढग दाटून येतात तेंव्हा.काही बाहेर राहिलय का?भिजण्यासारखं असेल तर त्याला आत आणण्याची लगबल.
तो ढग बघ कसा आतुरलाय,मातीत मिसळण्यासाठी वेडापिसा झालाय.
वैशाखात भाजुन निघालेली ही जमीन थंडगार होण्यासाठी या ढगांना साद तर घालत नसेल ना?मग पाऊस पडला की सगळं कसं थंडगार होतं.
पहिला पाऊस पडला की सगळं आहे तिथंच ठेवायचं,
पावसात जाऊन मनसोक्त भिजायचं.
पहिला पाऊस कोणाला साद घालत नाही हो!आवडतच ना सगळ्यांना भिजून प्रतिसाद द्यायला.कवि लोकांना तर पावसाळा म्हणजे एक उत्सव!ते कविता करून या पावसाला प्रतिसाद देतात.त्यांच्या आठवणीत रमतात.
आठवणी असतातच अशा प्रसंगानुसार आठवण्यासारख्या,
काही क्षणातच हसवून किंवा रडवून जाण्यासारख्या.
बसमध्ये खिडकीकडेला एकटं बसलेलो असताना या आठवणी आपल्याला साद घालतात. प्रतिसादात आपल्या डोळ्यातून कधी अश्रू ओघळतात तर कधी गालावर हसू उमटतं.
थोड्यावेळात आठवणी मागं पडतात आणि लक्ष बाहेरच्या सृष्टीवर पडतं.
खिडकीकडेची जागा त्यातून येणारा थंडगार वारा,
चहु दिशेने पसरलेला सृष्टीचा हिरवागार नजारा.
हा नजाराच साद घालत असेल म्हणूनच तर त्याच्या प्रतिसादात आपण खिडकीकडेची जागा पकडण्यासाठी धावत असतो.आपल्या बाजूच्या खिडकीतून नदी दिसली तरी आपलं समाधान होत नाही. पलीकडच्याच्या खिडकीतूनही नदीची दुसरी बाजू बघण्याची आपली धडपड चाललेली असते.संथ वाहणारी नदी बघितली की किती समाधान मिळतं.समुद्रही या नदीला साद घालत असेल का?
निळा समुद्र तिला खुणावे ये मज भेटीला
डोंगर दर्या पार करून आली तुजला भेटाया.
समुद्राला प्रतिसाद देण्यासाठीच तर ही नदी डोंगर- दर्या,खाच-खळगे सगळं पार करून धावत-पळत समुद्राकडे निघालेली असते.समुद्रकिनारा तर प्रत्येकाला हवाहवासा.वेगळाच आनंद मिळतो.समुद्र, नारळाच्या झाडांची रांग आणि तिथं जर राधा-कृष्णाचं मंदिर असलं तर..तर वातावरणात नवचैतन्य निर्माण होतं.निसर्ग आणि देवाचं सानिध्य शारीरिक, मानसिक थकवा दूर करुन मन:शांती देतं.राधा - कृष्णाची सुबक मूर्ती न्याहाळत असताना मन गोकुळात जाऊन पोहचतं.कृष्णाच्या बासरीच्या आवाजाचा कानोसा घेत राधा, कृष्णाच्या मागं कशी धावत असेल या विचारांत माझं मनही राधा - कृष्णाच्या मागं धावू लागतं.
साद घालुनी बासरीची सखा कृष्ण तीला खुणावे,
मग बावरी ही राधा त्याच्याच मागे धावे.
इचलकरंजी.
shrutiapatil93@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
*साद-प्रतिसाद.*
लेखिका-सौ पल्लवी / रेखा विजय बेनाडीकर.
साद-प्रतिसाद हा विषय कट्ट्यावर आला आणि मी विचार करू लागले. खरतर काहीच सुचत नव्हते. हे ही येता जाता विचारायचे, काही लिहिलंस का ग?
मला एकदम पू. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधले रावसाहेब आठवले, जे पू.ल. ना सारखे सारखे 'झाली का स्टोरी' असे विचारत होते.
गंम्मत वाटली. 😀
'हे इंसां तू दे साद,
मिलेगा तुझे प्रतिसाद।
ध्वनी के साथ सुनेगा,
प्रतिध्वनी का नाद'।
किती सुंदर ओळी आणि आताच्या परिस्थितीला अगदी योग्य.खरं तर निसर्ग आपल्याला खूप भरभरून देत असतो. पण माणसांला सतत जादा काहीतरी हवे असते. तो एकमेकांशी ईर्ष्या करत असतो.
वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करतो. त्यातूनच या कोव्हिड १९ चा जन्म झाला. आज तो मानवाच्या हातून निसटला आहे. त्याने सगळीकडे हाहाःकार माजवलाय. सगळे देश या संकटाला तोंड देत आहे.
आपला देश गरीब आहे. चीन सोडता सगळ्या जगाची मिळून होईल, तेव्हढी लोकसंख्या एकट्या भारताची आहे.
या साठी मोदीजी सगळ्यांना मदत करण्याची विनंती करत आहेत. प्रत्येक जण फुल ना फुलाची पाकळी देऊन खारीचा वाटा उचलत आहे.
अशा मध्ये आपली फिल्म इंडस्ट्री ही मागे नाही, खूप मनापासून काम करीत आहे.
लाखो परप्रांतीय मजदूर मुंबईत अडकले होते. प्रत्येकाला आपापल्या घरी जायची घाई होती. त्या लोकांसाठी *सोनू सूद* देवता बनून आला. आज पर्यंत त्याने ३०,००० च्या वर लोकांना सुरक्षित घरी पोचविले आहे.
*अक्षय कुमार* ने २५ कोटी रु. 'P M .Care fund' ला दिले. *अमिताभ बच्चन* यांनी कल्याण ज्यूवेलर्स, सोनी पिक्स यांच्या सहकार्याने एक लाख फ़िल्म इंडस्ट्रीशी निगडित कामगारांची जेवणा खाण्याची व्यवस्था केली.
अशी खूप जणांनी छोटी-मोठी मदत केली.
५-६ वर्षा पूर्वी मी लेह लडाखला गेले होते. तेंव्हा आमच्या बरोबर एक गाईड होता. त्याचे नांव अमीर खान .
आपल्या हिरो आमिर खान पेक्षा ही हा देखणा. हा मुलगा 'दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स' मध्ये शिकत होता. जिथे मनमोहनसिंग, अमर्त्य सेन यांच्यासारखे प्रख्यात अर्थतज्ज्ञ शिकले.
मी अमिरला विचारले, 'अरे मग तू गाईड म्हणून का काम करतोस'? त्याने जे उत्तरं दिले, ते ऐकून मला त्याचे खूप कौतुक वाटले.
तो म्हणाला, 'ये मेरा कश्मीर, कारगिल बहुत सुंदर है। मुझे ये सुंदरता आपतक पहुचांनी है और उसे सलामत रखना है। यहां की गरिबी दूर करनी है। जबतक ये आर्टिकल ३७० नहीं हटेगा, यहां तरक्की नही होगी। मैने और मेरे दोस्त लोगोंनें अपनी मिट्टी को वचन दिया है, हम यंहा तरक्की करके ही रहेंगे'।
माझ्या मनात आले, ही त्याला त्याच्या मातीने घातलेली सादच आहे.
किती विश्वास.
मला एकदम आमचा काळूराम आठवला. काळाभोर, देखणा असा हा आमचा लॅब्रॅडोर. त्याचे नांव आम्ही ब्लॅकी ठेवले होते. मी त्याला प्रेमाने काळूराम म्हणायची.
आमच्या घरी आला, तेंव्हा तो जेमतेम एक महिन्याचा होता. तेंव्हा त्याचे ते घाबरलेले डोळे पाहून मला एकदम भरून आले. मी त्याला जवळ घेतलं आणि तो पण लगेच मला बिलगला.
मी जिथे असे तिथे तो माझ्या पायात येऊन बसत असे. रात्री तर सगळे झोपले, की तो मला उठवत असे व छानपैकी माझ्या मांडीवर झोपत असे. त्याच्यासाठी मी चक्क महिनाभर जागरण सुद्धा केले.
पुढे तो मोठा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी खाली पिंजरा केला आणि तो तिथेच राहू लागला.
त्याची माझ्या मुलीशी व सासूबाईंशी खूपच गट्टी होती. तो मोठा झाल्यावर मी मात्र कधीतरीच त्याच्यावरून हात फिरवत असे.
तो ही शांतपणे त्या दिवसाची वाट पहात असे. एकदा चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहीले व काळूराम पळून गेला. थोड्या अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात आत जाऊन बसला.
दिवसभर माझी मुलगी व सासुबाई शेताजवळ जाऊन त्याला हाका मारत होते. तो काही बाहेर येईना.
मी मुलीला म्हंटले, अगं मी जाऊन बघू का? तसे त्या दोघी म्हणाल्या, 'तुझं कुठं त्याच्याशी एवढं सख्य आहे? आम्हाला बधत नाही, तो तुला काय बधणार'?
संध्याकाळ झाली तशी मला पण त्याची काळजी वाटू लागली. मी ह्यांना घेऊन शेताकडे गेले.
काळू महाराज शांतपणे शेतात बसले होते. मला पाहिल्या बरोबर, त्यानं तोंड फिरवलं. मी थोड्या मोठ्यानं 'काळू-राम काळू-राम, येरे राजा. चल घरी जाऊया', अशा दोन तीनदा हाका मारल्या.
आणि काय आश्चर्य, तो पळत पळत येऊन मला बिलगला. जणू त्याचा माझ्यावरचा राग पूर्ण गेला होता. मला धन्य धन्य वाटलं.
साद ही फक्त एकमेकांना घातलेलीच असते असे नाही तर मनाने अंतर्मनाला घातलेली ही साद च असते.
त्याचे प्रतिसाद ही मनातच उमटतात.
सोनू सूद, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन याना त्यांच्या अंतर्मनाने घातलेल्या सादे ला हा प्रतिसादच आहे.
इचलकरंजी.
vijaybenadikar@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
"साद – प्रतिसाद "
लेखिका -सौ. हेमा दत्तात्रय देशपांडे
“सुप्रभात हेमाराणी ! उठताय ना?” “हेमाराणी!”, किती गोड साद! वाटलं, ऐकतच रहाव ! तोही प्रतिसादच होता माझा ! तोपर्यंत पुन्हा साद आली , "हेमलता , उठ आता !” आता मात्र डोळे उघडून पाहीलच , एवढी सुंदर गोड साद कोण घालतय ?” पाहते तो काय ?, माझं वय हसतमुखाने माझ्यासमोर उभे होते. अगदी आदबीने, गोड साद घालून, मला उठवत होते. “ काय लक्षात आहे ना? आजची तारीख , वार? काही आठवतय का? कि विसरलं?” आताशा असच होत बाई माझ, हे विसरल.........ते विसरल ............. लक्षातच राहत नाही. “ए सांग बाबा आता , काय आहे आज? तारीख, वार? सांग बाबा !” अग आज २१ जून , विसरलीस? “ हो! हो! आज ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस” हो ना? शिवाय आज दिवस मोठा असतो” “अजून काय?” बघ........... आठव! अजून काय? तुझा काहीतरी संबंध आहे! बघ, नीट आठव! येईल लक्षात”! “अरे हो” खरच कि! आता आल लक्षात! विसरलेच होते मी. २१ जून! माझा वाढदिवस! पण हे तुझ्यामुळेच हं ! सगळे म्हणतात, ‘वयामुळे विसरायला होत. “सगळे म्हणू देत, पण तू नको म्हणूस. मी तुला आठवायला मदत केली. विसरायला नाही!” हो रे, खरचं, तू मला आठवण करून दिलीस, किती चांगला आहेस तू! खास दिवसाची, खास सुरुवात केलीस, थॅंक्यू हं !”
“ठीक आहे! ठीक आहे! आता उठ, फ्रेश होऊन खास दिवस अजून खास कर!”
“ए , मी काय म्हणते , मी आज वॉकींगला, व्यायामाला दांडी देऊ का? लोळू दे ना थोडावेळ तुझ्याशी गप्पा मारत ?”
वयाने एकदम रागाने पाहिले माझ्याकडे, “तू जर अस काही करणार असशील , तर जातो मी निघून , चक्क वयाने माझ्याकडे पाठच फिरवली."
बाब बमी एकदम घाबरले , उठून वयाला अडवत म्हंटल, “नको रे बाबा नको! चुकलच माझं! कान पकडते, उठा बशा काढते पण मला सोडून जाऊ नको. तू सांगशील ते सार ऐकीन , अगदी प्रॉमिस!”
मग वयानेही मोठ्या दिमाखात सांगायला सुरुवात केली. “ व्यायाम ......... मग तो चालण्याचा असो , योगा, प्राणायाम असो चुकवायचा नाही . कबूल?” “ हो हो ......! तिखट , मीठ, साखर प्रमाणात खाणं! कबूल? “ हो.......... हो..........!”
तू सांगितलेलं सगळ मला कबूल आहे. तुझ मी सगळ ऐकीन. त्याप्रमाणे वागीन सुद्धा. खुश? आता वयाचा रागही थोडा दूर झाला होता . चेहऱ्यावर थोडी स्मितरेषा उमटलेली दिसत होती . मग मी हि धीर करून म्हंटल, “ माझपण एक मागणं तू ऐकशील? मी मागेन ते देशील?”
“चल दिल, माग काय हव ते !”
“ मला न अजून खूप वाचन, लेखन , गायन करावसं वाटत. अगदी मी तुझ्या साथीने शाळा , कॉलेजमध्ये करत होते ना........तस्सं! खूप हिंडाव , फिराव, जग पहावं! नवनवीन शिकावं ..... शिकवावं ! खूप साऱ्या सख्या असाव्यात, नाती जोडावीत, नाती वाढवावीत अस मला वाटत. करशील ना तू माझी ही इच्छा पूर्ण ? तुझी साथ-सोबत असेल तरच हे शक्य आहे. करशील ना एवढं?”
गालातल्या गालात , मिश्कील हसून वयाने प्रतिसाद दिला......आणि म्हणाला.....तथास्तु !!!
इचलकरंजी.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘 साद-प्रतिसाद
लेखिका-- सौ अश्विनी शिरूर
साद प्रतिसाद हा विषय दिल्यावर खरं तर पहिल्यांदा कोकिळाच आठवली. तिच्या 'कुहू' ला जर आपण प्रतिसाद दिला तर ती लगेच परत 'साद' घालते.
कोणताही सजीव सादेला प्रतिसाद देतोच. पण निसर्ग सुद्धा प्रत्येक ऋतू नुसार हाकांना प्रतिसाद देत असल्याचं आपण पाहतो. माती पहिल्या पावसाने सुगंधित होते. तृणांना अंकुर फुटतो आणि पावसाच्या सादेला प्रतिसाद देत सृष्टी हिरवीगार होते. वसंतात झाडांना नवी पालवी फुटते. झाडे चहू अंगांनी बहरून येतात. हिरव्या रंगांच्या विविध छटांनी सृष्टी नटते. हा सृजनाचा काळ असतो. हिवाळ्यात पानगळती चालू होते. याचा अर्थ पिकल्या पानांची निवृत्ती आणि नवीन पानांना संधी. उन्हाळ्यात झाडे सुकतात, पण मूळे खोलवर जातात. झाडांचे जमिनीबरोबरचे नाते घट्ट ठेवण्याला त्यामुळे मदत होते.
निसर्गप्रमाणेच पशू पक्षी ही सादेला प्रतिसाद देतात. कुत्रा, मांजर, बैल हे पाळीव प्राणी. त्यांना जीव लावला तर ते आपल्या मालकांसाठी काय काय म्हणून करणार नाहीत! शिवाजी महाराजांचा कुत्रा, त्याने महाराजांच्या चितेत उडी घेऊन आपली निष्ठा निभावली होती. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याने प्राणपणाला लावून, मैलोन मैल दौड करून आपल्या मालकाची संकटातून सुटका केली. त्यात चेतक धारातीर्थी पडला, पण मालकाला सुखरूप ठेवण्याचं काम त्याने इमानाने केलं.
मुक्या जीवांना प्रेम लावलं तर त्यांचा प्रतिसाद ही प्रेमाचाच असतो. पण त्यांना क्रूरपणे वागवले तर ती ही त्यांच्या धन्याकडे जायला बघत नाही, हे पूर्वीही सिद्ध झाले आहे. परवा केरळ मध्ये झालेली हत्तीणी बद्दल ची घटना तर सर्वांना माहितीच आहे. आपली भूक भागवण्यासाठी म्हणून तिने अननस खाल्ला, पण तो स्फोटकांचा अननस खाऊन तिची सोंड फाटली. पण मानवाच्या घृणास्पद आणि क्रूर गोष्टीसाठी तिचा प्रतिसाद हा चकित करणारा होता. तिने कुणालाही इजा न करता जलसमाधी घेणे पसंत केले. अशा वेळी खरं तर हत्ती बेफाम होऊन खूप नासधूस करतात. पण तिला कदाचित हा इतका मोठा धक्का होता, की तिचा प्रतिसाद ही त्याच प्रमाणे धक्का देऊन गेला. वाघांच्या बछड्याना घरी आणून पाळल्यावर ती सुद्धा जीव लावतात अशी सोनाली या वाघाच्या बछड्याची कथा असलेला धडा आम्हाला शाळेत सुद्धा होता.
झाडांशी आपण बोललो तर ती प्रतिसाद देतात असं एक उदाहरण मी मध्ये वाचलं होतं. एक आजी आजोबा निवृत्तीनंतर कोकणात शेती घेऊन रहात होते. त्यांची खूप छान बाग व शेती होती. दुर्दैवाने एक दिवस आजोबा देवाघरी गेले. घरातले सगळे नातेवाईक आले. दोन मुलं, सुना, नातवंडे होती, ते आले. दोन दिवस कुणाचं लक्ष गेलं नाही, पण तिसरे दिवशी बाहेर लक्ष गेल्यावर पाहिलं तर बागेतल्या एकूण एक झाडांनी त्यांना पाणी देऊन सुद्धा माना टाकल्या होत्या. मग आजींनी प्रत्येक झाडापाशी जाऊन, हात फिरवून त्यांच्याशी गप्पा मारल्या, तर झाडे टवटवीत दिसू लागली. हे दोघे रोज प्रत्येक झाडाशी बोलायचे. दोन दिवस त्या झाडांना कोणी साद घातली नव्हती. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद अतिशय क्षीण होता.
या उदाहरणांवरून एक लक्षात येते, की झाडे, झुडपे, पशू, पक्षी किंवा मानव यांना प्रेमाची साद घातली तर ते प्रेमाचा प्रतिसाद देतात.
ash.shirur98@gmail.com
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
साद प्रतिसाद
लेखिका-सौ दीपाली फडके
शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध ही पाचही माध्यमे आपल्याला साद घालत असतात. आपणही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. तो ही कधी शब्दातून, कधी स्पर्शातून, कधी कृतीतून तर कधी नजरेतून आणि कधी अव्यक्त ही असतो.
आषाढ महिना आला की आपल्याला वेध लागतात ते पावसाचे. त्या मृदगंधित वातावरणात भक्ती जागृत होते, डोळे पाझरू लागतात आणि वाट दिसू लागते ती पंढरीची. विठुरायाच्या दर्शनाची आस तीव्र होते.
'विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ' असा गजर करीत आषाढीची वारी सुरू होते. दरवर्षी भक्तीच्या परमोच्च सोहळ्याचे आपण साक्षीदार असतो. शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध ही पाचही माध्यमे विठुरायाच्या चरणी लीन होतात. अभंगातून घातलेली साद, तुळशीच्या माळांचा तो गंध, विठुरायाचे सावळे रुप, तो चरणस्पर्श, भक्तिरसात भिजणारे वारकरी हे सारे वातावरण अतिशय विलक्षण असते. डोळे मिटल्यावरही माऊलींचा तो अश्व रिंगण घालताना दिसत असतो.
लाखो वारकरी विठुरायाला साद घालतात आणि त्याला शरण जातात. ती शिस्त, तो समजूतदारपणा, ती भेटीची आस, ती आर्तता, तो आनंद, ते समाधान अनुभवण्यासारखेच आहे. आपल्याला कुठेही कसलाच भेदभाव जाणवत नाही, जाणवत राहते ते फक्त आणि फक्त भगवंताचे अस्तित्व. नामाचा जयघोष करत ते चालणे आणि त्यातले कष्ट जाणवतच नाहीत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा अनेक संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी न चुकता येतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. आधी हे सारे संत चालत यायचे आणि आता लाखो लोक येतात. हे सारे संत भक्त म्हणून किती श्रेष्ठ आहेत, नाही का? त्यांनी भगवंतांला घातलेली साद आणि भगवंताने त्याला दिलेला प्रतिसाद म्हणजे भक्तीचे सर्वोच्च रूपच जणु...
संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक कष्ट सोसले. ही चारही भावंडे शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला गेली असताना रेड्याने वेदपठण केले. आपण सारे एक आहोत हे सांगताना भगवंत त्यांच्या हाकेला धावून आला. निर्जीव भिंत ही जेव्हा चालवली जाते त्यासाठी विठू माऊली च प्रतिसाद देते. गीता जेव्हा मराठीतून ज्ञानेश्वरी म्हणून जनमानसात येते तो ही भागवंतांचाच सुंदर प्रतिसाद आहे असेच वाटते. म्हणून तर पसायदान हे त्यांचे वैश्विक मागणे आहे.
' आता विश्वात्मकें देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे|
तोषोनी मज द्यावे, पसायदान हे'
संत गोरा कुंभार यांची तर भक्ती किती श्रेष्ठ आहे. यांनी तर आपले काम करताना म्हणजे माती कालवून ती पायांनी तुडवत असताना स्वतःच्या रांगत आलेल्या छोट्या बाळालाही तुडवले. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते इतके गुंग झाले होते की आपण काय केले हे ही त्यांना समजले नाही. जेव्हा ते लक्षात आले तेव्हा त्यांनी केलेला तो विठ्ठलाचा धावा, ती घातलेली आर्त साद भगवंतांच्या हृदयी पोचली अन ते छोटे मूल रांगत रांगत परत आले. ती भक्ती, तो खरेपणा, ती आर्तता सारे काही विलक्षण!!
'निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी
तेणे केले देशोधडी, आपण यासी मायबापा'
संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले. पण त्यांनी कोणालाही दोष न देता भगवंताला निर्मळ साद घातली अन भगवंताने ते अभंग त्यांना जसे होते तसे परत दिले. हा भक्तीचा महिमा खरच खूप मोठा आहे.
संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत निवृत्ती नाथ, संत सोपानदेव यांनी ही भक्तीची आणि भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. हे सारे किती श्रेष्ठ आहेत आणि प्रत्येकाची भक्तीही तेवढीच श्रेष्ठ आहे.
असा अनुभव आपल्यालाही कधीतरी येतो. आपणही मनापासून साद घातली तर भागवंतही प्रतिसाद देतो कधी कळत तर कधी नकळत.. असाच काहीसा अनुभव आम्हाला जगन्नाथ पुरीमध्ये आला.
जगन्नाथ पुरी म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती रथयात्रा आणि तो भाविकांचा उसळलेला महासागर. ती लोकांची अपार श्रद्धा आणि त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी चाललेली धडपड. पुरीमधले हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पसरलेले हे भव्य मंदिर आणि मंदिरासमोरील रथयात्रेसाठी असलेला लांब, रुंद रस्ता मनात भरतो.
हे सगळे जरी असले तरीही येथील दर्शन व्यवस्था ही अगदी निराळी आहे. एक तर येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यात आपणही उभे असतो. एक एक प्रवेशद्वार उघडले जाते. त्या गर्दीतून आपण पुढच्या माणसांना ढकलत पुढच्या भागात जात असतो. ही मानसिकता असेल तरच आपण आत जाऊन दर्शन घेऊ शकतो.
आम्ही ज्या दिवशी तेथे होतो तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे देवळात रांग लावून दर्शन घ्यायला खूप गर्दी होती.
आम्ही असेच ढकलाढकली करतच गाभाऱ्यात पोचलो. तिथे आपण आत प्रदक्षिणा घालू शकत नाही, मात्र तिथल्या पंड्या लोकांना पैसे दिले तर मग काहीही घडू शकते. आम्हाला प्रदक्षिणा घालायची तर खूप इच्छा होती. पण लुबाडून घ्यायची इच्छा मात्र नव्हती. त्यामुळेच मनात देवाचा धावा सुरू होता.
' नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे '
अशी अवस्था आमची झाली होती.
आम्ही देवासमोर जाऊन उभे राहिलो अन आमचे डोळे आमच्याही नकळत मिटले गेले. आम्ही मनापासून जी साद घातली तिला भगवंताने ओ दिली. आम्ही अगदी सहज एकही पैसा न देता प्रदक्षिणा घातली. या ठिकाणी सामान्य भाविक पोचू शकत नाही तेथे आम्ही प्रदक्षिणा घातली. 'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना' असे झाले. आम्ही बाहेर आलो ते डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रु घेऊन आणि कृतकृत्य होऊनच.. इतक्या सहज आणि सुंदर दर्शनाने आमची स्वप्नपूर्ती झाली.
अशी मी अनुभवलेली आपल्या जीवनातली साद प्रतिसादाची अविभाज्य लय...
अनाहत वाहत राहणारी....
अव्याहत जाणवत राहणारी.....
phadkedeepali@gmail.com
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी
No comments:
Post a Comment