Tuesday, June 23, 2020

नातं- भाग २


🔸भावबंध नात्यांचे🔸
लेखन- सीमा उरुणकर

"बबड्या अरे बबड्या, हे काय? तू का पाणी भरतोय? मी आलीये ना ,सोड तू ती बादली,  मी आहे ना!!" हो हाच तो बबड्या.  हल्ली गाजत असलेल्या "अगबाई सासुबाई "मधला. हा बबड्या  आणि ती आसावरी यांच्यातील हा संवाद आणि हा प्रसंग पाहून मनोमन चीड आली. खरंच अशी असावी का आई? आभाळाएवढी माया करणारी आई; त्यापोटी मुलाला दुर्बल आणि आळशी बनवणारी ?आणि मग हि सिरीयल बघताना आसावरी,- बबड्या, शुभ्रा व आसावरी, दत्ताजी आणि आसावरी अशा नात्यांवर विचारांची शृंखला मनात घोळू लागली. या अनुषंगाने नात्यांचे वेगवेगळे बंध ,भावना व त्यानुसार रोजचे घडणारे अनेक छोटे-मोठे प्रसंग डोळ्यांसमोर तरळू लागले. खरंच सगळ्यांची संलग्न असणारा हा विषय म्हणजे नाते. हे नाते आई_ मुलं, नवरा बायको ,सासू सासरे _सून ,काकी ,आजी-आजोबा या सर्वांबरोबर असणारे हे नाते. प्रत्येकाबरोबरचे भावबंध वेगवेगळे, भावविश्व वेगवेगळे. पण प्रत्येक नात्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पदर फुलत जाणारे, प्रत्येकाकडून काहीना काही शिकणारे. 

आणखी असंच नातं ते म्हणजे मैत्रीचं ज्यामुळे स्वभावाची, वागण्याची बरीचशी जडण-घडण घडते. या मैत्रीमुळे बालवयापासून तारुण्य पर्यंत तर "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" या उक्तीप्रमाणे जर घडले तर व्यक्ती सर्वगुणसंपन्न होते तर अशी ही वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर असणारी वेगवेगळी नाती अगणित प्रकारची. पण या सगळ्या नात्यात अत्यंत आवश्यक असा गुण म्हणजे  विश्वास.!!! आई-वडिलांनीही मुलांना विश्वासात घ्यावे लागते व तोच विश्वास मुलांनीही सार्थ करावा लागतो. पती-पत्नी या नात्यात तर प्रेमापेक्षा विश्‍वास महत्त्वाचा ठरतो .या नात्यात एकमेकांचा आदर करण्याने, एकमेकांची किंमत योग्य पद्धतीने करण्याने, शक्य तेव्हा एकमेकांना सहकार्य करण्याने विश्वासाचे व प्रेमाचे नाते बहरत जाते आणि मग दोघांचे मनोमिलन केव्हा होते ते कळतही नाही .पण या नात्यात अलीकडे विश्वास व प्रेमाची बरीचशी जागा 'बरोबरी' या गुणाने घेतली आहे. सहनशक्तीची जागा 'मनमौजी' ने घेतली आहे. दुसऱ्यापेक्षा' स्व 'ला महत्व दिले जात आहे. तीच तर्‍हा सासू-सून या नात्यातही दिसून येत आहे .सासू नवीन पिढी बरोबर मिळते-जुळते घेत असतानाच मनाच्या तारेवरची कसरत करताना दिसून येत आहे. एकाधिकारशाहीचा वापर न करताही बरेचदा तिची अवहेलना होत आहे. हे असे का? या 'का' ची कारणे खूप आहेत परंतु उत्तर मात्र एकच आहे. ते म्हणजे विश्वास!!! एकमेकींना वाटणारा विश्वास !खरंतर या नवीन मुलींकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळ्या प्रसंगाकडे बघण्याची नजर असते. 

काही प्रश्न त्या चुटकीसरशी सोडवतात म्हणून दोन्ही पिढ्या संवादातून बऱ्याच गोष्टी सोडू शकतात आणि त्यातूनच एकमेकांबद्दल  प्रेम व आदर वाढत जाईल, पण महत्वाचे म्हणजे ऐकून घेण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून असावी. नाते जपताना विश्वासाचा बरोबरच आणखीन एक  महत्त्वाचा गुण लागतो तो म्हणजे संस्कार. मोठ्यांचे आचार-विचार, कार्य पद्धतींचा बराच पगडा कळत न कळत मुलांवर होत असतो. एकत्र कुटुंबात हे संस्कार सगळ्यांकडून मुलांवर होत असतात .प्रत्येक व्यक्तीच्या विविध आवडीनुसार खेळ, वाचन, देवधर्म ,स्वच्छता या प्रमाणे मुलांवर छाप पडते आणि विविधांगांनी ती विकसित होत जातात .वाद-संवाद, प्रतिवाद यातून दोन्ही बाजूंचे आकलन होते .सर्वात शेवटी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी नाती टिकतात, एकमेकांना बांधून ठेवतात ,बहरतात ती फक्त आणि फक्त स्त्री मुळे! हो, हीच स्त्री जी दोन्ही घराण्यांना जोडणारी दुवा असते, संस्कारांची पाठराखीण असते ,संस्कृतीची जाण राखीन असते ,घराची व्यवस्थापिका असते ,सहनशक्ती चे भांडार असते. साक्षात दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती चा संगम असते .आणि म्हणूनच विंदा करंदीकर आपल्या कवितेत स्त्री रूपांचे वर्णन असे करतात ,"तू घरभर भिरभिरत असतेस ,स्वागतासाठी सुहासिनी असतेस ,वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहीता असतेस, भविष्याकरता स्वप्न सखी असतेस.!!!!
  seemaurunkar@gmail.com Ichalkaranji
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात्याच्या रेशिमगाठी🔸
लेखन- सौ पल्लवी बेहेरे
 
 
 नातं म्हणजे आपुलकी माया, प्रेम, जिव्हाळा आणि सोबत. प्रत्येक नात्याचे एक वेगळेपण असते.  लहानपणी आई वडिलांची माया मिळते. आजी, आजोबा,  काका -काकू, आत्या मावशी, मामा-मामी अशा अनेक नात्यांची ओळख आपल्याला होते. त्यांचे प्रेम मिळते. शाळेत, बालवाडीत गेल्यावर आपल्याला खूप मित्र मैत्रिणी मिळतात, त्यांच्याजवळ आपली मैत्री होते. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांच्याबरोबर आपले प्रेमाचे नाते जोडले जाते. हे ऋणानुबंध आपल्याला कायम सोबत करतात.
          
लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीला अनेक नवीन नाती मिळतात. पत्नी, सून, जाऊ, वहिनी, काकू,  मामी अशा अनेक नात्यांनी ती नवीन घरात जोडली जाते. लग्न झाल्यावर  मुलांनाही अशीच वेगळी नाती जोडली जातात. विवाहामुळे दोन कुटुंबाचे एकमेकांशी नाते जोडले जाते अशा सर्व नात्यांनी आपले जीवन परिपूर्ण व समृद्ध  होत जाते. पती -पत्नीचे नाते हळुवारपणे जपावे लागते. कारण हे नातं म्हणजे "युगायुगाचे आपले नाते नको दुरावा असे असते."एकमेकांवरील प्रेमाने व विश्वासाने हे नाते जपत पुढची वाटचाल करायची  असते. नंतर नवीन  छोटया बाळाचे  आगमन होते. त्याचे संगोपन दोघांनी मिळून करायचे असते. आई -बाबा होणे ही आनंदाची  व समाधानाची परिपूर्ती असते. ते सुखाचे क्षण आपण मनोमन जपून ठेवत असतो. मुलांवर चांगले संस्कार करत असतो. नंतर त्यांचे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, लग्न या जबाबदारी आपण आनंदाने पार पाडत  असतो. नंतर जेव्हा नातवंडांची चाहूल लागते तेव्हा आपले आज्जी - आजोबा       
म्हणून प्रमोशन होणार हा आनंद असतो. आपल्या नातवंडच्या येण्याने आपला जीव सुपासारखा मोठा होतो. नातवंडाला न्हाऊ-माखू घालण्यात त्याला ओव्या म्हणून निजवताना दिवस वर्षे  निघून जातात. या वाटचालीत आपल्याला पतीची किती मोलाची साथ होती हे जाणवते. हे ऋणानुबंध असेच राहोत असे मला वाटते. 
           
वरील सर्व नात्यांचे अनुभव हे माझे स्वतःचे आहेत. मी माझ्या कल्पनेने त्याचा मागोवा घेतला आहे. माझे आयुष्य या सर्व नात्यांनी बहरून गेले आहे. आई -वडील, सासू -सासरे, माझ्या बहिणी व मुले यांच्यामुळे माझी वाटचाल सुखी झाली आहे. मला माझ्या पतीची समर्थसाथ, प्रेम व गाढ विश्वास आहे. म्हणूनच खालील काव्य ओळी ओठावर येतात. 
               "तुला सगळं देऊन सुद्धा माझी ओंजळ भरलेली पाहिले तर तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली."
                                    
pallavibehere35@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸आपलं नातं🔸
लेखन-  पल्लवी बेहेरे 

वाचन - कट्ट्यामुळे जुळले आपले नाते 
सर्वांचे लेख, कविता वाचून मन भरते 
प्रत्यक्ष भेटत नसलो तरी, नसतो अनोळखी 
परस्परांना शुभेच्छा देत, जुळतात नव्या  ओळखी 
नव्या कल्पना, नवे विचार यांची होते देवघेव
कधी भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ 
यातून विहरत राहतो हीच  ठेव 
अशीच नात्यांची, वीण विणू सारे जण 
प्रत्यक्षात कधी भेटू, याची वाट पाहत आपण. 
                   
pallavibehere35@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸सृजनतेचे नाते🔸
लेखन- सौ. दीपा पुजारी.

आज सकाळी गेटमधून बाहेर रस्यावर आले व नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी जवळच्या दुकानाकडे निघाले. मंद, शीतल, झुळुक आली आणि…..ओ….हो…..बरोबर बकुळगंध घेऊन आली. माझी पावले थबकली. माझ्यासाठी तिने पायघड्या घातल्या होत्या. सर्व वातावरणात धुंद, मंद, मधुर सुवास पसरवून तिने स्वत:ला आपल्या मातेच्या सेवेत समर्पित करून टाकले होते. तिचा हा सावळगंध सावळ्या मृदगंधेशी एकजीव झाला होता.

लहानपणी आई जवळच्या बागेत खेळायला घेऊन जायची. बरोबर सुई दोरा असायचाच. खेळून झाले की न चुकता ती मला बकुळीची फुले वेचून माळ करायला सांगायची. यातील तिचा हेतु त्या वयांत मला कळला नव्हता. पण आता लक्षात येते. बकुळीच्या (Mimusops elengi) सुवासाने व शीतलतेने व त्या नाजुकशा फुलांमधील सूक्ष्म छिद्रातून एकसर गुंफताना एकाग्रता, कोऑर्डिनेशन इ. गुण वाढीस लागायचे. अगदी ५-६वर्षांची होते तेंव्हा पासूनच बकुळीने माझे सावळेमन तिच्या सावळगंधाने व्यापले आहे.

माझी ही मैत्रीण शाळेच्या मैदानात पुन्हा भेटली. कोल्हापूरच्या म.ल.ग. हायस्कूल मध्ये. ही मुलींची शाळा म्हणजे राजवाड्याचाच एक भाग होती. तिला तशी शाळेची आखीव रेखीव इमारत नव्हती. पण राजवाड्याचे नक्षीदार दगडी खांब, दगडी पायर्‍या, कमानी, महिरपी वाल्या जाळीदार खिडक्या असा सरदारी, खानदानी व तरीही शालीन रुबाब होता. मैदानातील बकुळी भोवतीचा छोटासा पार खेळून खेळून दमल्यानंतर आम्हा मुलींचा विसावा बनत असे . NCC/Scout अशा मार्चींग साठी "Turn left" चा खास corner होता.

विद्यापीठ हायस्कूल जवळील अंबाबाई च्या देवळाचे जे दगडी प्रवेशद्वार आहे त्या पायर्‍यांवर बकुळीचे गजरे (वळेसर) विकणार्‍या मुली बसायच्या. पुढे मोठेपणी तिथून जाता येता माझे पाय थांबायचेच. खिशाने फारशी श्रीमंत नसूनही मी ते सावळे एकसर खरेदी करायचीच. या एकसरांनी माझ्या काही पुस्तकात व कपडेपटात अजूनही गंधसुरांची मैफल व आठवणींची सुरावट जपली आहे. आज ते सर अधिकच गहिरे, सावळे नाही नाही, गडद तपकिरी झाले आहेत व माझ्या आठवणींचे रंगही तितकेच गहिरे….

सकाळी याच रस्यावर बूचाच्या फूलांचाही सडा असतो. चारच पांढर्‍याशुभ्र पाकळ्या व लांब किंचित पोपटी पण पांढरा च देठ. चार पैकी दोन पाकळ्या जोडीच्या. याही झाडाला माहिती आहे फक्त देणे. ही फुले तर उलटीच लटकलेली असतात फांद्यांवर. परागीभवन झाले की झेपावतात जमिनीकडे. डांबरी रस्ता, बाजूला लाल माती आणी त्यावरील हा पांढरा फुलसडा! मन वेडावून जाईल नाहीतर काय? याही फुलांची माझी ओळख माझ्या शाळेने करून दिली. घराला जसे परसू असायचे ना तसे आमच्या शाळेला परसातले छोटे पटांगण होते. तेथे उंच ऊडी लांब ऊडी इ. खेळ खेळले जायचे. याच पटांगणाच्या एका बाजूला ही बुचाची झाडे (Milingtionia hortensis) होती अगदी एका रेषेत. पण या आकाशनिंबाला बुचाचे झाड का म्हणतात हे मात्र विज्ञानाच्या तासालाच कळले. काचेची निर्मिती झाल्या नंतर काचेच्या बाटल्या तयार होत पण त्यांचे टोपण मात्र करता येत नव्हते. तेंव्हा या झाडाचे खोड बूच करण्यासाठी वापरले जाऊ लागले व झाडाचे नामकरण झाले बूचाचे झाड. झोकून देणे म्हणजे काय हे यांनाच माहित. आणी त्यासाठी ही फुले उमलतातच मुळी उलटी, सहजपणे गळून जाण्यासाठी

निसर्गाशी नाते जपण्याचं काम सर्व वनस्पती करतात. मातीतून पाणी, खनिजे,जीवनतत्त्वे घेतात तशीच ती मातीला परतही करतात. पाने, फुले, फळे बिया अशा अनेक रुपात ही परतफेड सुरु असते. किंबहुनापुनश्च मृद्गंध बनणे हेच यांच्या फुलण्याचं खरं ध्येय असते. ही दान करण्याची कला निसर्ग सातत्याने शिकवत असतो. 

     "प्राजक्त, कुंदा, मधुमालती नावे तरी किती
      समर्पणाने सांगती देण्याची महती
      तयांना संपन्न करुन गेली ही धरती
      ऋण फेडण्या तयेचे सुमने ती वर्षिती

      तिच निर्मिती,तिच फुलविती,रुजविती
     आंधळे मनुजन तया पदी तुडविती
     उमगेल मनुजा कधी तरी ही ऋतुगती
     हसेल अवनी आनंदुनी वर्षुनी जलपाती "

खरेच, कळेल का माणसाला निसर्गाशी असलेले त्याचे नाते? किती प्रकारे या फुलांनी, फळांनी, वृक्षांनी समजावले? मातीपासून निर्माण होऊन पुनश्च मातीच होण्याचे इंगीत अंगी बाणणे, कृतीत आणणे व हे ऋतुचक्र अविरत फिरते ठेवणे यासारखी दुसरी परतफेड नाही. 

लताजींच्या गाण्याप्रमाणे,

  "रहे ना रहे हम, मेहेका करेंगे   
  बनके कली, बनके सबा बागे वफा़में"

हे ज्याला कळले त्यानेच माणुसकीचे, मानवतेचे, सृजनाचे नाते या निसर्गाशी जोडले असे म्हणावेसे वाटते.

deepapujari57@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸आईची आई🔸
लेखन- सौ. दीपा पुजारी

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-GaintsCauseway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. "चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर." ती हातात लॅच की घेऊन ऊभी. तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे…."आई,२० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा" "बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे." असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. "आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं."

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

deepapujari57@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸डब्यातलाW  शिरा🔸
 लेखन- डॉ अनुराधा कुलकर्णी 

   आयुष्यात बऱ्याचवेळा असं होतं की, आपल्याला कुणालातरी थँक यू,सॉरी म्हणायचं  असतं. एखाद्या गोष्टीला दाद द्यायची असते,पण राहूनच जातं. बऱ्याचदा अनवधानाने, क्वचित जाणूनबुजून! असो! मी २रीत असतानाची गोष्ट आहे.वडील शिक्षक असल्याने बदल्या असायच्याच! त्याचवर्षी आईलाही नव्यानेच नोकरी मिळाली होती. तिची शाळा सकाळी ६.५०ला व माझी ७.३०वाजता.ती तिच्याबरोबरच न्यायाची मला कारण शाळा घरापासून लांब होती.शाळेचा पहिलाच दिवस होता तो! आम्ही डबा न घेताच निघालो.
मधल्या सुट्टीत बाईंनी सांगितलं सगळ्यांना, 'हं, आता मधली सुट्टी, डबे खा.' माझ्याकडे डबा नव्हता. कावरीबावरी होऊन मी जागेवरच बसून राहिले.बाईंच्या ते लक्षात आलं. त्यांनी सर्वांना विचारलं,'आज आपल्यात एक नवीन मैत्रिण आलीआहे .कोण बरं तिला आपल्या डब्यात घेणार?'
        
एक गोरीपान छोटुकली मुलगी पळतपळत माझ्याजवळ आपला डबा घेऊन आली व हाताला धरून मला म्हणाली,' चाल,आपण डबा खाऊया!'बाईचाही चेहरा समाधानाने खुलला. स्टीलचा छोटा पेढीघाटी डबा तिने उघडला. तूपातला शिरा होता त्यात! दोघींनी मिळून फस्त केला.किती सहजपणे, निर्व्याजपणे केलं होतं तिनं हे सगळं! कधीतरीच आम्हाला बर्फाचा गोळा खायची संधी मिळायची.पर्वणीच असायची ती! तिची माझी घट्ट मैत्री झाली.  पुढच्या वर्षी पुन्हा बदली झाली व आम्ही दुसऱ्या गावी गेलो. त्यानंतर असंख्यवेळा अनेक प्रकारचा शिरा केला, खाल्ला,खाऊ घातला,पण त्या डब्यातल्या। शिऱ्याची सर खरोखरच कशालाच नाही आली!ती निर्व्याज मैत्री, प्रेम,निरागसता,निरपेक्षता अविस्मरणीयच!प्रत्येकवेळी शिरा करताना मला ती हटकून आठवतेच!खरंतर  आता मी तिचं नावपण विसरले.पण त्या डब्यातल्या शिऱ्याने मात्र मनात घर केलंय, कायमचं!

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी            
              

No comments:

Post a Comment