Sunday, June 14, 2020

नातं- भाग १

🔸कृष्ण सखा🔸
लेखन-अश्विनी शिरूर

नातं हा विषय मोठा गहन आहे. निर्जीव वस्तूंपासून झाडाझुडपापर्यंत, आणि प्राणी पक्ष्यांपासून माणसापर्यंत प्रत्येक नातं वेगळाच अनुभव देऊन जातं. कधी अविस्मरणीय, तर कधी अविश्वसनीय. नात्यानात्यातले संबंध, ऋणानुबंध, प्रेम आणि जिव्हाळा, तर कधी हेवेदावे, रुसवेफुगवे, द्वेष आणि तिरस्कार. नात्यांबद्दल जितकं लिहावं तितकं थोडं.

मला कृष्णाच्या तीन प्रेमाच्या नात्यांबद्दल आज इथे सांगायचंय. आणि प्रेम तरी किती वेगवेगळ्या प्रकारचं! 

राधा
राधेचं कृष्णाबरोबरचं नातं हे नेहमीच सर्वांच्या आदराचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गोकुळ सोडून गेल्यानंतर कृष्ण कधी परतून आला नाही, पण राधा-कृष्णाचं नातं मात्र चिरंतन राहिलं. राधेचं प्रेम निरपेक्ष होतं. तिने कृष्णाकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. जेव्हा कृष्णाने विचारलं की तुला काय हवंय, तेव्हा तिचं उत्तर होतं की "कृष्णा, तू दुःखात असशील तेव्हा माझे नाव घे. तुझी शारीरिक, मानसिक पीडा तू मला दे. कारण सुख चार क्षणांचे, तर दुःख चिरकालाचे सोबती असते. त्यामुळे मी कायम तुझ्या सोबत असेन."
या प्रेमाला उपमाच नाही. प्रेमाच्या प्रांतात कुणाचं उदाहरण दिलं जातं तर ते राधेचंच. जन्म-जन्मांतरीच्या विश्वासाचं, त्यागाचं आणि समर्पणाचं असं हे नातं.

द्रौपदी
द्रौपदी ही कृष्णाची सखी होती. कृष्णाने द्रौपदीच्या बाबतीत मित्र, तत्वज्ञ, सल्लागार, पाठीराखा या सगळ्या भूमिका निभावल्या. व.पु. म्हणतात त्या प्रमाणे, पांडवांसारखे बलाढ्य पाच पती असून सुद्धा द्रौपदीसाठी कृष्णाशी नातं हे प्रगल्भ आणि अतिशय तरल अशा मानसिक स्तरावरचं होतं. द्रौपदीचा कृष्ण वेगळाच होता. मित्र ही संकल्पना त्याने पूर्णत्वास नेली. शेवटी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने धावा केला तो कृष्णाचाच. आणि तो त्वरेने तिच्या मदतीस आलासुद्धा. द्रौपदी बरोबरचं त्याचं नातं हे मैत्रीचं, तिचा संताप, त्रागा, निराशा, हतबलता  समजून सर्वतोपरी समजून घेण्याचं आणि कणखर पाठीराख्याचं.

रुक्मिणी
रुक्मिणी ही कृष्णाची अर्धांगिनी. त्यांचा प्रेमविवाह. शांत आणि सौम्य स्वभावाच्या रुक्मिणीने कृष्णाचे मन जिंकून घेतले. जेव्हा सत्यभामेने अहंकारापोटी कृष्णाची तुला करायची ठरवली, तेव्हा रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने जगाला हे दाखवून दिलं, की माणसाला प्रेमानेच जिंकता येते. असं म्हणता येईल की कृष्ण आणि रुक्मिणीचं प्रेम हे निःशब्द, समंजस  आणि आत्मिक स्तरावर अत्युच्च प्रकारचं होतं.  शब्दांनी त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे. 

कृष्णाने एकूणच प्रत्येक नातेसबंधाला एक वेगळंच परिमाण दिलं. जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या स्त्रियांना सामाजिक स्थान मिळावे म्हणून त्याने त्यांच्याबरोबर विवाह केले. हे त्याचे स्त्री-मनाचा विचार करणे बऱ्याच जणांना रुचले नाही, पण त्याने ते केले. 

महाभारतासारख्या जुन्या काळात कृष्णाने स्त्रियांबरोबरच्या नाते संबंधाबद्दल क्रांतिकारी विचार, निर्णय आणि कृती केली. कृष्णाने प्रत्येक नात्याची मर्यादा राखली आणि जगाला हे दाखवून दिलं की ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची नाती एकाच वेळी कशी निभावायची. त्याचा एक वस्तुपाठ त्याने घालून दिला जो आज ही आदर्श आहे.

ash.shirur98@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
 
🔸मी नुकतंच एक नातं विणायला घेतलं होतं🔸
 लेखन- डाॅ.श्रुती

मी नुकतंच एक नातं विणायला घेतलं होतं
नवीनच सुरुवात होती,
धागेही रंगीबिरंगी होते.
सुंदर एका नक्षीचं स्वप्नही पाहिलं होतं.
पण प्रत्यक्षात काढताना कळालं की,
प्रत्येक नक्षी तशीच कधी जमत नसते.
शेवटी स्वप्न हे स्वप्नच असतं.
प्रयत्न सुंदर करण्याचाच होता, प्रत्येक टाका सुंदरच व्हावा याचे आतोनात प्रयत्न चालले होते.
नक्षी वेगळे वळण घेऊ लागली की, सावरण्याचा प्रकार चालू होता.
नात्यांप्रमाणे धाग्यांचे ही रंग बदलावे लागत होते.
कधी धागा मोठा व्हायचा, गुंता बनायचा,
तो अलगद सोडवावा लागायचा.
अगदी तुटत चाललेल्या नात्यांचा सोडवावा तसा.
तर कधी धागा लहान बनवायचा, नातं टिकवण्याची तडजोड करावी तसा पुरवून वापरायचा.
या विणण्यानं बरंच काही शिकवलं.
विणताना कधी धाग्याला गाठही घालावी लागायची,
पण नवीन सुरुवातीसाठी.
तर कधी गुंता न सुटल्यानं धागा कापावाही लागायचा.
मागचे दोन टाके उसवण्याच्या तयारीनेच.
प्रयत्न सुंदर करण्याचेच चालले होते.
आपलं नक्षीदार नातं कसं वेगळं बनेल याचे.
कधी वेगवेगळ्या टाक्यांनी,
तर कधी वेगवेगळ्या रंगांनी सजवायचं चाललं होतं.
मी एक नातं नुकतंच विणायला घेतलं होतं.
मी एक नातं नुकतंच विणायला घेतलं होतं.

shrutiapatil93@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸वृक्षराज🔸
लेखन- सौ.हेमा दत्तात्रय देशपांडे

खरंतर जन्मतः कितीतरी नाती बरोबर घेवूनच आपण आपलं आयुष्य सुरु करतो.
बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या निसर्ग शृंखलेत नात्याची शृंखलाही वाढतच जाते.
अधिकाधिक नाती निर्माण होतात, बहरतात, मजबूत होतात आणि आनंद देतात.
असंच माझं एक नातं तयार झालं, माझ्या दारी उभ्या असलेल्या डरेदार, हिरव्यागार, वृक्षराज बेलाशी!

पानगळती संपून वसंताची चाहूल लागताच, सुंदर कोवळी-कोवळी पोपटी पालवी फुटू लागली होती. पांढऱ्याशुभ्र मोहक वासाच्या फुलांनी आणि छोट्या छोट्या कळ्यांनी सारा परिसर मोहरला होता. मधमाशांची परागकण गोळा करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. छोट्या मोठ्या विविधरंगी चिमण्यांचा चिवचिवाट, पाखरांचा किलबिलाट आणि कोकिळेचा आलापही सुरु झाला होता. या बरोबरचं त्या हिरव्या कंच बेलात सुखेनैव बसून भारद्वाज जोडीचा प्रेमालापही सुरु होता. मग मी ही या चौफेर पसरलेल्या वृक्षराजाच्या सावलीत सारं काही विसरून आज बसले नसते तर नवलच झालं असत. त्या सावलीत विसावता क्षणीच,  मनातलं सारं काही विसरून मी नतमस्तक झाले, माझे हात अपोआपचं जोडले गेले आणि माझा जणू या जगाशी सबंधच संपला आणि वृक्षारजाशी संवाद चालू झाला. 
त्याचा प्रवास डोळ्या समोर उभा राहताच एक प्रश्न मी त्याला केला....
“पानगळतीत अक्षरशः पान न पान गळून नुसत्या सुक्या काड्या सांभाळणारा वृक्षराज, तो तूच का रे..?
तुझ्यात एवढा बदल..?”
वृक्षराज हसून उत्तरला, अग वेडे मीच तो ..! 
तेंव्हा न डगमगता खंबीरपणे उभा राहिलो म्हणूनच,आज मी तुला बहरलेला दिसतोय, किंबहुना आज मी अधिकच बहरलेला आहे. हो ना...?
त्याच्या या उत्तरात मला एक नवीन शिकवन मिळताच मी स्वतःशीच बोलू लागले...
अरे खरंच कि ग्रीष्म हा वसंत ऋतूला घेवूनच येतो किंबहुना वसंताची चाहूल ग्रीष्मच देतो. आज मनासारखं झालं नाही म्हणून खचून जाण्यात काय अर्थ आहे, उद्याचा वसंत माझाच असणार आहे आणि खरं सुखं हे भरभरून देण्यातच आहे, हे मला लक्षात येताच आता आपणही वाचन कट्ट्याच्या निमित्तानं भरभरून वाचायचं,लिहायचं अधिकाधिक सख्या जोडायच्या. बिलवरजासारख आनंदी,  समाधानी राहून, भरभरून आलेले क्षण अनुभवायचे, त्याच्याकडून मिळालेली ही ताकत, उर्मी घेवून आयुष्यातील चढ-उतार सहजपणे पार करायचे असं निर्णय मी त्या दिवशी घेतला.
आता पुन्हा माझ्यातील शिष्या वृक्षराजाला नतमस्तक होऊन म्हणाली....

कृतज्ञ मी या तुझ्या मोलाच्या शिकवणीसाठी,
पण विनंती तुला, माझी अजून एक मागणी पूर्ण करण्यासाठी..!
देवू करावी आम्हा सर्वांस, तुझ्यासारखीचं ताकत, दातृत्व, आत्मविश्वास आणि मनाची खंबीरता, आयुष्याच्या पुढील सुखकर प्रवासासाठी..!
आयुष्याच्या पुढील सुखकर प्रवासासाठी..!

ऐस-पैस पसरलेल्या फांद्यानी आशीर्वाद देत तो ही लेगेच त्याच्यातल आणि माझ्यातलं नातं अजून दृढ करीत म्हणाला....

“तथास्तु..! 
इच्छित मनोरत सिद्धरस्तु..!शुभमभवतु..!"
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
 
🔸नातं-अंगणाशी🔸
लेखन- सुचेता पाटील

 सडा रांगोळीनं सजलेल्या अन् चिमण्या-पाखरांच्या चिवचिवाटानं , गलक्यानं गजबजलेल्या अंगणाचं नि माझं. अंगण म्हणलं कि,स्वच्छ झाडून सडा टाकून रांगोळी नटवलेले असंच अंगण आपल्या डोळ्यासमोर येतं-ज्या अंगणात प्रवेश केल्याबरोबर प्रसन्न वाटतं पण माझ्या अंगणात पाय ठेवल्याबरोबर फक्त प्रसन्न वाटत नाही तर फुलांच्या बहरण्यानं मन बहरतं,चिमण्यांच्या थुईथुई करण्याबरोबर नाचायला लागतं.
        
रोजची - दिवसांची सुरुवातच माझी अंगणापासून होते. सकाळचा केर-वारा,सडा रांगोळी,पक्ष्यांचं खाणं-पिणं कोणत्या झाडाला किती फुलं लागलीयेत हे बघणं ही पहिली कामं. या कामांची इतकी सवय झालीय ना; झोपेतून उठताना डोळ्यासमोर आधी अंगण येतं. स्वप्नही चक्क अंगणाचीच पडतात. त्यामुळे त्यामुळे मला वाटतं आपलं किती घट्ट नातंय ना या अंगणाशी. मी अंगणासाठी काही करतेय की अंगणाने मला काय दिलंय हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा समोर येतो तेव्हा अर्थातच 'अंगण' जिंकत. काय नाही दिलं या अंगणा मला. सगळ्यांना वाटतं मी अंगणाची खूप सेवा करते. अशी शेखी मिरवण्याचं कारणच नाही. कारण एका हातानं मी दिलं असेन तर अंगणानं शंभर हातांनी भरभरून देवून मला समृद्ध केलं.

महाराजाधिराज श्रीमंत भारद्वाज यांचं दर्शन या अंगणामुळं सहज शक्य होतं. पोपटरावांची तरी खूप सेवा करायला मिळाली. दिवसातून बऱ्याच वेळा बुलबुल्यांच्या गप्पा ऐकायला मिळतात. भांडतात की बोलतात कळतं नाही पण मज्जा वाटते. सातभाई ओरडून ओरडून परेशान करतात.पण सावधही करतात हं- कुठं साप वगैरे आलाय का बघा म्हणून. साळुंक्या, शिंजीर, शिंपीमामा, होलेश्वर ,चिरक,टिट...एक का दोन एवढ्या सगळ्या पाहुण्यांची उठ -बस चालू असते माझ्या अंगणात. आमचे भाऊबंद असलेल्या वानरांची फौज तरी दर पंधरा दिवसांनी आली की चांगलीच धुमाकूळ घालून जाते. अंगणात चांगली पंगत बसते. त्यांच्या मेजवानीची सरबराई करता - करता दिवस संपतो. पाळलेले नसले तरी काही ही कुत्रे अंगणात येऊन भेट देऊन जातातच. त्यांना तसंच कसं पाठवायचं म्हणून काहीतरी देणं आलंच. सुगरणी एरव्ही जास्त येत नाहीत पण जेव्हा हळद लावून नटून थटून होतं तेव्हा लग्नाला आल्यासारख्या येतात त्या पूर्ण पावसाळा संपेपर्यंत अंगण सोडतच नाहीत. त्या वऱ्हाड मंडळींची मग खाण्या- पिण्याची भक्कम सोय अंगणात करावी लागते. काहीही असो माझं अंगण मात्र तेव्हा एखाद्या लग्न मंडपसारखं दिसतं. सगळीकडे आनंदी - आनंद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'चिऊताई ये, चारा खा,पाणी पी' किंवा 'एक घास चिऊ ताईचा' पासून अंगण- मी- अन् चिऊताई या आमच्या नात्याचा त्रिकोण आखला गेला ती 'आपली' चिमणी... सतत- सतत-राबता असतो तिचा. या घरात जाऊ का त्या घरात जाऊ असं म्हणत आम्ही अंगणात लावलेलं एखादं घर पकडायचं नि मग झालं त्यांचं त्या घरात घर बनवणं, मग बाळंतपण, पिलांना भरवणं, मोठं करणं, उडायला शिकवणं हे सगळे सोपस्कार अंगणात. तिच्याशिवाय आमच्या अंगणाला शोभाच नाही असं होऊन बसलंय आता.

वर्षभर माझं अंगण सदा न नकदा बहरलेलंच असतं. प्रत्येक सिझनच्या फुलणाऱ्या झाडांनी नटलेलं असतं. सुगंधाने दरवळलेलंच असतं.सीतारंजन, पारिजातक , सप्तपर्णी, रातराणी कशाकशाचा सुगंध घेऊ असं होतं. कुंतीचे गुच्छ सारखे खुणावत असतात. त्यांचा वास आधी घ्यायचा की त्याच्या सुंदरपणाला बघत बसायचं? बहाव्याच्या झुंबरांची नेत्रदीपक रोषणाई बघताना अंगणात उत्सव आहे असं वाटतं. त्याच्या पिवळ्याधम्मक चंद्रकोरींच्या नि पाकळ्यांच्या पायघड्या खाली गालीचा सुंदर अनुभव देतात. पिवळ्या फुलांसोबत पिंगा घालणाऱ्या काळ्या भुंग्यांची भून-भून वाटत नाही. माझा आवडीचा नेवरा!... त्याचं काय वर्णन करू? बहाव्याच्या पिवळ्या दुलईवर माणकं जडवल्यासारखं ही वाटतं.कधी गडद केशरी रंगाचा -पुष्कराजासह केशरीया बिछाना अच्छादल्याचा आभास. असा रत्नराशींचा वर्षाव करून बहावा अन् नेवर्यानं माझं अंगण खूप समृद्ध केलंय. अंगणावरून घराची संस्कृती कळते म्हणतात.पण माझ्या अंगणावरून माझी समृद्धी-श्रीमंती कळते. हो ना?
सासरी आल्यानंतर हळूहळू अंगणाशी माझं नातं असं जुळत गेलं.पण अंगणाशी माझी नाळ तर तेव्हाच जोडली गेली होती जेव्हा आज्जीनं अंगणातील धान्य पक्षांना निवांतपणे खाऊ दिलं आणि आईने सडा - रांगोळीची सवय लावली .

मायेनं विणलं की प्रत्येक नातं घट्ट होतं. ते सहज उसवलं जात नाही. असं माझं नि अंगणाचं नातं विणत गेलं, वीण घट्ट होतं गेली. ती कधीही बसवणार नाही याची काळजी मात्र मी नेहमी घेत राहीन.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात-उर्दू शायरीशी🔸
लेखन- सुचेता पाटील


'उर्दू शायरी- मेरी पसन्द' ही पसंद नात्यात कशी बदलली कळालंच नाही. शाळेत असताना आजोबा बऱ्याच शेर- शायरी सांगत.त्यांनी सांगितलेला पहिला शेर आजही मला आठवतोय.
     
खुदको खुद मे  ढुॅंढ,  खुदको दे निकाल,खुदको निकाल देने से, खुद खुदा हो जायेगा.
त्याच्या अर्थाची गहराई मला वेड लावून गेली. दैनंदिनीच्या प्रत्येक टप्प्यावर मी तो शेर आजमावत असते.आजही. ही साथ शेवटपर्यंत असणार आहे.आपले पाय जमिनीवरच राहण्यासाठी हे उपयुक्त आहे. आपला मानीपणा किंवा आपल्यातला अहंकार गळून पडल्याशिवाय आपण मोठे कसे होऊ?खुदा व्हायचंय ना. माझ्यातला मी पणा निघालाच पाहिजे.

नुक्ते की फेरपालट से हमसे जुदा हुआ,नुक्ता पलट देने से खुद खुदा हुआ.
हा शेर त्यांनी मला आधी अक्षर शिकवून मग ऐकवला.अक्षरं माझ्या आजही लक्षात आहेत. त्यातली गंमत पहा म्हणजे समजेल.
 خدا -जुदा جد-खुदा
नुक्ता म्हणजे टिंब/अनुस्वार. अक्षर एकच आहे. पण फक्त एका नुक्त्याने किती करामत केली. फक्त जागा बदलली.खालचा नुक्ता वर जाऊन बसला. एकदमच वरचा खुदा होऊन गेला.आपल्यालाही खालून वर जायचंय. तळातून उठून चारित्र्याच्या उंच शिखरावर जाऊन बसायचं आहे. भगवान बनायचं आहे.प्रसंगाला अनुसरून त्यांची शायरी चालायची उदा.-
 सैर कर दुनिया की गाफील जिंदगानी फिर कहाॅं,जिंदगी  गर कुछ रही तो नौजवानी फिर कहां...अशी.
अध्यात्माचा बाज असलेली त्यांची शायरी वेगळाही प्रवास करायची.
दो नान पुख्ते बुदंम, कुत्र्याने घेऊन गेला, समशीर बरकशीदंम ,नाल्याचे पार गेला.
 अशा प्रकारचे शेर ऐकायला गंमत वाटायची. ते स्वतः ते तयार करून ऐकवत. साहित्याचा तो एक प्रकार आहे म्हणे. त्यांनी सांगितलेलं मला आठवतं नाही.
       
आता अशा विविधतेतून माझं शायरी प्रेम प्रवास करत होत. हिंदी-मराठी शायरीचांही परिचय होत गेला. नातंही जोडत गेलं.या प्रवासात अगदी समरसून साथ देणारी मैत्रीण होती. जया. (जयश्री सोळंके) जिवाभावाची बालमैत्रीण. कागदाचा पुडा जरी आला, त्यावर शेर शोधायचो. सापडायचाही. रद्दीत, लायब्ररीत असो किंवा कोणाचं घर- मासिकावर झडप पडलीच म्हणायची.त्यातल्या कथा- गोष्टींवर लक्ष नसायचं.असायचं फक्त गजल सापडते का?कि एखादी शायरी किंवा एखादा शेर इकडं. रेडिओवरच्या गजल बरोबर आमचा पेन चालायचा. कॅसेट खरेदीही फक्त गजलचीच. झपाटल्यासारखे शेर गोळा करायचो.दोघींनाही ही एकच ध्यास.शेरो-शायरी.लग्न झालं. मार्ग दोघींचेही ही बदलले. पुढच्या प्रवासात आजूबाजूचे, मित्र- मैत्रणी,नवरा इतर नातलग सगळे असेच दर्दी असतील तर किती बहार येईल असं वाटलं होतं. पण तसं कोणीच भेटलं नाही. शायरीचं माझं नातं मात्र तसंच राहिलं. मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं.त्याला जास्त वाढवता किंवा दृढ करता आलो नाही. कैफ भोपालीनं  म्हणल्यासारखं -
      गुल से लिपटी हुई तितली को गिराकर देखो,आॅंधीयो, तुमने दरख्तो को गिराया होगा
 तसं माझं शायरीला चिटकून आहे.
        
मातृभाषेवर माझं खूप प्रेम आहे. पण रमते मात्र मी उर्दू-हिंदी शायरीतच. कारण हैदराबाद स्टेटच्या निजामाच्या अमलाखाली असलेला आमचा प्रदेश आपसूकच उर्दूचा प्रभाव. (शाळेतही ही अन् बोलीभाषेवर ही)अनुषंगाने हिंदी आलीच. यांनीच तर माझं नातं शायरीशी जोडलं होतं. भाषा महत्त्वाची नाही. भाव महत्त्वाचा आहे. भावावरून आठवला म्हणून एक शेर - बिना भाव बाजार मे वस्तू मिले न कोय,बिना भाव रीझे नही नटवर नंदकिशोर
 अगदीच नाही असे नाही. या प्रवासात अगदी थोड्या वेळापुरते काही सहप्रवासी भेटले. त्यांच्याकडून थोडी- थोडीशी शिदोरी मिळत गेली. आमच्या एक मॅडम होत्या डॉ.सुलभा मुरलीधर. माझ्या हिंदी प्रेमापोटी त्यांनी मला फार महत्त्वाच्या चार ओळींचा संदेश दिला.मॅडमना पण त्यांची मैत्रीण उस्मानाबाद चे मंत्री पद्मसिंह पाटलांची बहिण होती त्यांनी दिला होता. त्या चार ओळी माझ्या प्रत्येक डायरीच्या पहिल्या पानावर जागा धरून बसतातच. जसा पहिला शेर ही बसतो तसा. त्या ओळी अशा -
     तुम औरों को हॅंसते देखो मनु तुम हसो और सुख पाओ,अपने सुखो विस्तृत करो,सबको सुखी बनाओ

 पुढे जेष्ठ साहित्यिक, कवी- डॉ. जयशंकर प्रसाद अभ्यासताना या ओळींची माझी छान ओळख झाली. जसा माझ्या आजोबांचा पहिला शेर सतत माझ्यासोबत असतो. तसंच हर घडीला मी या चार ओळींचं विस्मरण होऊ देत नाही. मध्येच एक जबरदस्त शिदोरी मिळाली होती. एका सहप्रवाशांकडून पण तिची गोडी मला जास्त वेळ अनुभवता आली नाही. भाऊसाहेब पाटणकरांचे साहित्य. माझ्या मैत्रिणीच्या यजमानांनी माझी आवड बघून मला ही शिदोरी दिली होती. उमेश कुलकर्णी. यांची ही शिदोरी मी पुढं घेऊन जाऊ शकले नाही.
       
उर्दू शायरी बरोबर मी माझं हिंदी प्रेम हे जपलं होतं. या प्रवासाचं सगळ्यात मोठं स्टेशन मिळालं होतं. गुरुदेवांच्या चरणांचं. प्रज्ञाश्रमण अमित सागर महाराज. त्यांच्या कडून अफाट खजिना मिळाला. ते म्हणतात -
      अच्छाईयाॅं  देखले बस तू सारे जहान की,बुराईयों का कहीं कोई अंत नहीं दिखता
        तमाम उम्र यही सोचते हुए गुजरी कि,अपने बारे में कुछ सोचना जरुरी है!
        हे आत्मन! आत्मीयता अमृत की प्याली है,सांझ की नही, सुबह की लाली है
       संकेत से नही ही वचनं से भी चुप रहो,बातो से ही बात नहीं चरित्र से भी कुछ करो
 या अशा प्रकारचे भाव- देशप्रेम, धर्मनिष्ठा,अध्यात्म अशा विविध पैलूंचा खजिना त्यांच्याकडून भरपूर मिळाला. शायरीनं जिंन्दादिली दिली. गम-खुशी से अनेक अनुभव दिले. चिंता दिली. आनंद दिला. भावनांचे विविध पैलू दिले. सध्याची सामाजिक परिस्थिती बघताना असं वाटतं.-
         हरण लंकेश करके ले गया था जिस्को त्रेता,उसी युग से जलाई जा रही है आज तक सीता
मुझे मानव की पीडा चैन से रहने नहीं देती,पढी जब भी हृदय से मैने मानव प्रेम की गीता
 पण दुसर्या क्षणाला स्वत:ला सावरताना असंही वाटतं-
        दु:ख नहीं कोई कि अब उपलब्धियों के नामपर,और कुछ हो या न हो, आकाश छाती तो हे
 म्हणजेच मानवी मनाचे तरंग शायरीतून व्यक्त होताना दिसतात. त्यासाठी शायरीचं महत्व सांगताना म्हणावं वाटतं-
       ये शायरीयाॅं नहीं फूल की खिलती कलियाॅं है,जिनका रस ले- लेकर हम सब झुमा करते है
आजोबांनी शायरीची ओळख करून दिली. तिचं नातं जोडलं गेलं. या शायरीतून खुदाचीही ओळख झाली. गुरूंनी मोक्षाची ओळख करून देताना आशीर्वाद दिला होता या शायरीतून-
      जिनेन्द्र देव अक्षय जेता, उन्हे कहते है मोक्ष नेता!पाना यदि तुम्हें है मोक्ष को तो,ध्याना पडेगा निज में 'सुचेता'
आज मनाच्या कोपऱ्यात जरा डोकावून बघितलं, खूप सापडलं. पण तेवढं सगळं देऊ शकत नाही ना. म्हणून एवढंच.
धन्यवाद.
suchetapatil1792@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

4 comments:

  1. सस्नेह नमस्कार !!!

    सर्व लेख सहजसुंदर आणि ओघावते आहेत. सर्व लेखांचे शब्दांकन आणि मांडणी केवळ अप्रतिम आहे.

    सर्व लेखिकांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी खूप शुभेच्छा !!!

    शुभेच्छुक,
    मनोज खांडरे, पुणे

    ReplyDelete
  2. Khup chan lihali ahes ashwini pratekach pratekashi nata kasa asava he sundar lihali ahes 👌👌👌

    ReplyDelete
  3. Sarv lekh Khup sunder utarale aahet....👌🏻👌🏻

    ReplyDelete