Tuesday, June 23, 2020

नातं- भाग ३

🔸नातं - गोपाळा.🔸
लेखन- गणेश शिंदे.

   नाती कुठे, कधी , कशी तयार होतात, हे सांगता येत नाहीत. सख्खी नाती भरपूर असतानाही जोडलेली नाती निर्माण होतात आणि ती जवळची कधी होतात कळतंच नाही.या वाचन कट्ट्यावर अनेकांचे अनेक लेख वाचले अन् भावलेदेखील. यातूनच माझ्या आयुष्यातील एक नातं उलगडण्याचा हा प्रयत्न....

आपल्याच(इचलकरंजी) गावात असलेल्या एका नामवंत डॉक्टरांच्या घरी त्यांच्या वडिलांना सोबत  म्हणून मी जात होतो... इथेच एका नवीन नात्यात बांधलो गेलो.... तर झाले असे की, मी माझ्या काकांच्या म्हणजे गद्रे काकांच्या घरी अभ्यासाला जात असे... एकदा काका - काकूंच्या बोलण्यात विषय आला की...त्या डॉक्टरांकडे पाठवलेला तो मुलगा न सांगताच सोडून गेला. त्यांनी परत कोण येईल का? असे विचारले आहे.  काकांनी मला सहजच विचारले  ..तू जातोस काय?...  पण सुरुवातच  'नाही' पासून करायला नको आणि दुसरं म्हणजे काकांच्या पुढच्या अनेक प्रश्नांना सामोरे जाण्यापेक्षा होय म्हटलेलं बरे...😊😊 म्हणून मी जातो म्हणालो...आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. घर एवढं मोठं आणि तेही इतकं स्वच्छही होतं.. घरात इतकी शांतता, इतका व्यवस्थितपणा, वस्तूंची सुंदर मांडामांड...सगळं कसं चित्रपटात असल्यासारखं वाटतं होतं. घरी काकू होत्या. त्यांनी बसायला सांगितलं आणि पाणी दिलं. सुरुवातीला वाटलं, आपण काही इथे राहू शकणार नाही . गद्रे काकांना बहुतेक दुसऱ्या कोणालातरी पाठवावे लागणार... पण नंतर काका-काकूंच्या व माझ्या गप्पा सुरु झाल्या... ओळख झाली. मला तिथे काय काम करायचे आहे हे काकूंनी सांगितले. वेळ ठरली आणि नंतर आम्ही आजोबांच्या... म्हणजेच बापूंच्या खोलीत गेलो....९४-९५वर्षांचे बापू, अंगाने बारीक, रंगाने गोरे, पातळ सुती सदरा घालून, अर्धवट डोळे मिटून झोपले होते. आमची ओळख झाली, मी माझं नाव त्यांना सांगितलं "गणेश". काकू म्हणाल्या, "बापू ,उद्यापासून हा रोज रात्री येईल तुम्हाला सोबत म्हणून, रात्री काही लागलं तर याला हाक मारा,तो देईल".
     
दुसऱ्या दिवशी रात्री १० च्या दरम्यान मी गेलो. सर्वांशी ५-१० मिनिटे बोलून मी बापूंच्या खोलीत गेलो. नंतर बापूंना काकूंनी दूध आणि गोळ्या दिल्या, मी आणि बापू थोडं बोललो आणि झोपायची तयारी केली. खूप अवघड्यासारखं वाटतं होतं. बापू झोपले...मला मात्र झोप येत नव्हती. एकच विचार यायचा, रात्री बापूंनी काही मागितलं आणि मी उठलोच नाही तर म्हणून रात्रभर जागाच राहिलो . सकाळी बापूंना प्राथमिक मदत केल्यावर  बापू आणि मी चहा  घेतला आणि थोड्या वेळाने बाहेर पडलो. सुरुवातीला मी गेल्यानंतर रोज बापूंना माझं नाव सांगत असे. पण त्यांना माझं नाव लक्षात राहायचं नाही. ते गोपाळा म्हणायचे आणि कायम मग गोपाळाच म्हणत राहिले. रात्री मी गेल्यावर माई झोपायला जायच्या. मी बापूंना दूध गोळ्या देऊन आम्ही खूप गप्पा मारत असत. कधी कधी मला उशीर व्हायचा त्यावेळी  काकू दूध घेऊन जायच्या तर बापू काकूंना म्हणायचे "गोपाळा येणार आहे ना? तो आल्यावरच घेईन".आज हे आठवलं की डोळे लगेच पाणावतात. त्यांच्या आयुष्यातील खूप आठवणी, प्रसंग, नोकरीत असतानाचे किस्से, अडचणी, दुःखे... त्यांचा दिनक्रम ..अशा बऱ्याच गप्पा होत असत. अजूनही बापूना इतकं आठवत होतं याचं आश्चर्य वाटायचं.आणि माझ्या मनात यायचं.... बापूंना इतकं सगळं आठवतं मग माझं नाव का लक्षात रहात नसे बरं? ....गप्पा वाढल्या की काका-काकू येऊन डोकवायचे मग आम्ही शहाण्या मुलानं सारखे झोपायचो.
     
काही महिन्यानंतर चांगले फिरणारे, गप्पा मारणारे बापू जास्तच आजारी पडले. अंथरुणाला खिळले ..  खाणं- पिणं,औषधे पाईप मधून द्यावी लागायला लागत होती. बापूंना बहुतेक त्रास व्हायचा. त्यांची तळमळ खूप व्हायची.  बोलत नव्हते, सारखे हात जोडायचे. त्यांची ही अवस्था बघून सर्वांना वाईट वाटायचं. काका-काकू खूपच काळजीने  बापूंना सांभाळायचे. या काळात काकांचे भाऊ,वहिनी,(काका- काकू), बहिणी(आत्या) या सर्वांचीही ओळख झाली. सर्वजण बापूंसोबत राहायचे.  रोज रात्री दूध देणं, मग गोळ्या, रात्री तहान लागल्यावर उठून पाणी देणं, सकाळी ब्रश पुन्हा चहा,अंग पुसणे, कपडे बदलणे, यामध्ये वर्ष कधी संपले कळलेच नाही. बापूंशी एक खूप छान नातं बांधलं गेलं. हे नातं असं होतं की आजही मला या नात्याला काय नाव द्यावं हेच कळलं नाही. याच काळात काकूंशीही एक छान नातं जमलं. काकूंना कलेची खूप आवड. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ती पहावयास मिळायची.  यातूनच आमचं जे ट्युनिंग जमलं त्यामुळेच मला प्रत्येक गोष्टीत, प्रसंगात सजावट करता येऊ लागली. पुढे नोव्हेंबर मध्ये माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी मी दोन-तीन दिवस सुट्टी घेतली. भावाचे लग्न ज्या दिवशी होते त्या दिवशीच बापू गेले. माझ्या घरी लग्न म्हणून मला काही सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी मला कळलं की बापू गेले. विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर.  बापू, त्यांचं बोलणं, त्यांच्या हालचाली सगळं आठवू लागलं. डोळ्यातलं  वाहणारं पाणी थांबतच नव्हतं. माझ्या आईला त्यांच्या प्रत्येक आठवणी सांगून रडत होतो.काहीतरी माझ्यापासून लांब गेलंय असे वाटत होतं....का मी सुट्टी घेतली असही वाटायचं..
   
आज या गोष्टीला ९-१० वर्षे झालीत.... पण आजही बापू म्हटलं की त्यांची हालचाल  ,बोलणं, त्या सर्व गोष्टी आठवतात आणि नकळत डोळे पाणावतात. त्या वेळी काकांनी मला बापू गेल्याचे सांगितले असते तर आज  मला जे बापू आठवतात ते कदाचीत आठवलेही नसते. यानंतर बऱ्याचदा कोणीतरी ,काही कामासाठी  विचारतात की नाव काय तुमचं. मी सांगतो, गणेश, गणेश शिंदे. पण मनात कुठंतरी ..."गोपाळा, गोपाळा"...ऐकू येत असतं..... 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸ये जो खिडकी है🔸 
लेखन- चित्कला कुलकर्णी

आठशे खिडक्या नऊशे दारं... रेडिओवर गाणं लागलं होतं. गाणं ऐकता ऐकता खिडकीशी संबंधित आणखी काही गाणी आठवली. 'मेरे सामनेवाली खिडकी मे.... शाम ढले खिडकीतले...
ये जो  खिडकी है...आणि मग कविताही  आठवत गेल्या. एका कवितेत इंदिरा संत म्हणतात, 'घराला एक खिडकी हवी..'

कविता आठवता आठवता डोक्‍यात लख्खकन् वीज चमकून गेली .....
अरे ! माणसाचं आणि खिडकीशी असलेलं नातं किती सुरेख आहे! आता हेच बघा, माणूस प्रवासाला निघाला की त्याला खिडकीची जागा हवी. आरक्षण करायचं असेल तर तो आधी खिडकीच्या जागेची चौकशी करतो. आरक्षण मिळालं नाही तर गाडी लागताना धावत धावत जाऊन खिडकीतून आपलं सामान टाकून ती जागा पटकावतो आणि मग जग जिंकल्याचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. परवा तर गंमतच पहायला मिळाली. बसला  प्रचंड गर्दी एक बाई आपल्या  लहानग्याला घेऊन निघाली होती. बिचारीला चढताच येईना. मग , खिडकीची जागा कुठली ?  शेवटी तिनं शक्कल लढवली. लहानग्याची ओली झालेली चड्डी खिडकीतून आत टाकली. आणि म्हणाली, " अहो, काय करायचं? माझ्या बाळाला खिडकी खूप आवडते. घरातही खिडकीजवळ गेलं की गप्प बसतो बघा.. आता ही  खिडकीची जागा मिळेल बघा.. दुसरं कोण बसणार त्या ओल्या जागेवर ...?  पोरगं खूश आणि मीही ... " 
गंमत आहे ना ?
 
प्रवासात प्रत्येकालाच खिडकीजवळची जागा हवी असते. स्वच्छ मोकळा वारा अनुभवायचा असतो. पाठीमागे धावणारा निसर्ग, गावं, शहर सारं सारं न्याहाळायचं असतं. गाडी थांबली की बाहेरची गंमत बघायची असते. विक्रेत्यांकडून काही घ्यायचं द्यायचं असतं. आणि हो, कुणाकुणाला अविचारानं काही फेकायचंही असतं. खिडकीतून बाहेर हात काढून नये, डोकावू नये अशा सुचना असल्या तरी  बाहेर हात काढायचा असतो.डोकावायचं असतं. खिडकी उघडत नसली की प्रवाशाला चैन पडत नाही. धडपड धडपड करून तो ती उघडतोच.   कधी कधी तर संकटकाळी बाहेर पडायचा मार्ग असे लिहिलेल्या खिडकीचा उपयोग आत येण्यासाठी तो करतो. गंमत आहे ना ! 

सरकारी खासगी कार्यालयांच्या खिडक्यांचं नातं आदरयुक्त धाकाचं. विद्यार्थ्यांना विद्यापिठाशी संबंधित कुठलीही माहिती किंवा कागदपत्रे मिळावीत म्हणून एक खिडकी योजना सुरू केली. तसंच सरकारी कार्यालयात कार्यान्वित केलेल्या एक खिडकी कक्षामुळे विविध परवानगी मिळवणं प्रचार करणं सोयीचं झालं. संगणकात तर शोध खिडकीला( सर्चविंडो) अतिशय महत्त्व. या कामाच्या खिडक्या बंद असल्या सगळंच ठप्प!!
 घराला तर  खिडक्या हव्यातच. पूर्वी वाड्यांना ऐसपैस खडिक्या असायच्या. (आता फक्त त्यांची वर्णनं चित्रं ऐकायला, पाहायला मिळतात. पण, आपण भाग्यवान आहोत. आपल्या गावात अजून काही वाडे आणि त्यात आपल्याला बसता येतील एवढ्या मोठ्या खिडक्या आहेत.) आता वाडे  संपत आले. खिडक्यांचं रूप बदललं. परवाचीच एक घटना..
 एके ठिकाणी घराचं बांधकाम सुरू होतं. घर मालक कामगारांना खिडक्या बाबत सुचना देत होता. सरकती, आतून उघडणारी,  बाहेरून उघडणारी ...अशा खिडक्या कुठे कुठे असाव्यात हे समजावून सांगत होता. सरतेशेवटी एक वैशिष्ट्यपूर्ण खिडकी त्यांना बनवायला सांगितली. एका मोठ्या चौकटीत पुन्हा एक मोठी जाळी असलेली पूर्ण उघडणारी चौकट करायला सांगितली. त्या खिडकीतून पूर्णपणे बाहेर डोकावून पाहता यावं,  मोठं सामान बाहेर सोडता यावं अशी रचना करायला सांगितली. जेव्हा ती खिडकी पूर्ण झाली तेव्हा कामगारांनाही त्या खिडकी बाहेर डोकावून इतरांशी गप्पा मारून आनंद घेतला. खरंच, माणसाला खिडकी अतिशय प्रिय. माणसाच्या मनाला देखील अशीच खिडकी असावी. बाहेरचं  विशाल जग  त्यातून पहाता यावं. दुर्विचार शिरू नयेत म्हणून खिडकी बंद ही करता यावी.  निसर्गाचं मनोहारी विभ्रम पाहण्यासाठी स्वच्छ, निरभ्र, आकाशाचा आनंद घेण्यासाठी जगात चालणारी सुखदुःखं जाणून घेण्यासाठी त्याला ती खिडकी उघडता यावी. हो नं ?
     
chitkala.kulkarni20@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात्यांचा गमतीदार संबंध🔸
लेखन- स्वाती कुलकर्णी-जोशी

नातं रक्ताचं ,नातं मैत्रीचं ...कधी प्रेमाचं, कधी भक्तीचं ..नातं निसर्गाशी जोडलेले .. नातं  मुक्या प्राण्याशी जोडलेलं.. विविध अंगांनी फुलणारं... मना मनाशी एकरूप होणारं..
 माणूस कितीही एकटा राहतो म्हणाला... तरी मानवी मनास कोणाच्या ना कोणाच्या  नात्याचा आपलेपणा हवाच असतो. इथकेच काय,  प्रत्येक सजीव घटकाला आपलेपणा हवा असतो ...म्हणून तर कीडा-मुंगी पासून ...प्रत्येक जण गटात रहात  असतो.
माणसाचं सुद्धा असंच आहे बरं का... !! नात्याशिवाय तो कदापीही राहू शकत नाही.
        
काही माणसं नाती प्राणपणानं जपणारी असतात ...पण काहीजण *बादरायण*संबंध* जोडून घेणारी असतात.. एरवी या नात्यांचा फारसा संबंध नसणारी सुद्धा ...विशेष काही घडले तर तो आमचंच  की... असे म्हणून रिकामी होतात --- माझ्या आजोबांचे एक मित्र होते. ते चारचौघात गप्पा मारायला लागले की हमखास एक वाक्य यायचंच.. ते ना ..ते आमचे स्नेहीच !!!! म्हणजे बघा...कोणीतरी म्हणायचं "अण्णासाहेब, काल ते रावसाहेब भेटले बघा, काय दिलदार माणूस हो.. पन्नास एकराचा मालक आहे पण गर्व म्हणून तो  नाही. मी सहज घरी गेलो तर एवढा पाहुणचार केला की काही विचारू नका." यावर हे आजोबांचे मित्र लगेच म्हणणार,"ते रावसाहेब होय, अहो, मी ओळखतो त्यांना... ते ना ..ते आमचे स्नेहीच!!. मागच्याच्या मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे , आम्हाला तर चार दिवस ठेवून घेतले होते....आमचे अगदी खासच हो ते "  यावरती माझा मामा म्हणायचा, -- उद्या चंद्रावरनं जरी कुणी आलं ना तरी तो यांचा स्नेहीच..हे ऐकून आम्ही भाचे कंपनी खो खो हसायचो. असते काहींना आत्मप्रौढी दाखवायची सवय... काय करणार?

अगदी अशीच माझ्या आईची मैत्रीण होती. कोल्हापूरला राहायची .. माझी आई शिक्षिका असल्यामुळे दोघी सारख्या कामानिमित्त एकत्र यायच्या... कधी आमच्या घरी, तर कधी तिच्या घरी ...तिला आजूबाजूला घडलेल्या मोठ्या घटनांमध्ये आपल्या संबंधित कोणी आहे हे सांगायला फार आवडायचे..

एकदा ताराराणी विद्यापिठात अभिनेत्री सुलोचनाबाई भेट देण्यास आल्या. कार्यक्रम चालू असतानाच ही माझी मावशी आईला म्हणाली, "सुलोचनाबाईंची भाची आहे ना, ती माझ्या वहिनीची खास मैत्रीण आहे बरं का !!अगदी गळ्यात गळे!!" ...बरं वहिनीचं आणि हिचं पटतंय का.. तेही नाही हो... तरीही हिचं "माझ्या वहिनीची....." हे पुन्हा कुठूनही कसेही नाते जोडण्याचा प्रपंच आहेच ..
           
काही जणांना आपल्या जवळच्या नात्यांविषयी  जरा जास्तच कौतुक असतं( सर्वांनाच असते पण त्याचे प्रदर्शन  करणारे हे लोक).. म्हणजे आपला तो बाब्या ...या कॅटेगरीमध्ये.." आमची सानू आहे ना .. तीअजिबात आंबट खात नाही हो...!! काय स्वयंपाक करायचा कळतच नाही हो" ..अरे , सगळा स्वयंपाक आंबटच असतो का?
         
आणखीन एक आसामी...यांच्या संपर्कात अनेक दिग्गज लोक आले होते.(की हे अनेक दिग्गज लोकांच्या संपर्कात आले होते...!) अश्या व्यक्ती स्वयंप्रकाशी आणि स्वकर्तुत्वावान असतात .. म्हणजे मोठे राजकारणी, सिनेकलावन्त, थोर साहित्यिक,महान समाजसेवक, महान कलाकार ,खेळाडू.. यांच्या  संपर्कात आले होते. तुम्ही कधीही आमच्या या महोदयांना भेटा, हे नक्की तुम्हाला चार पाच अश्या लोकांच्या भेटी सांगतील....आणि अशा सांगतील की हे  दोघे जणू परममित्रच..खरं तर  याभेटींचा उल्लेख नेहेमी नम्रतेने व्हायला हवा...ते मोठे आहेत यात आपला "ग्रेट"पणा तो काय?..
           
हल्ली सेल्फी काढण्याचा धडाका इतका मोठा आहे की प्रमुख पाहुण्यांना या  सेल्फीने  धडकी भरते..त्यानंतर हे सेल्फी बहाद्दर ....ते आमच्या ओळखीचे आहेत असे सांगत सुटतात, "तेव्हां नाही का , आम्ही सेल्फी काढला होता त्यांच्याबरोबर...".असं हे दुसऱ्याच्या प्रकाशाने स्वतःला चमकविणारे बेगडी नाते..
              
एकदा अशी मोठी ओळख सांगणाऱ्या महाशयांना मी म्हणाले , "तुमची ओळख आहेच त्यांच्याशी तर एव्हढे माझ्या विद्यार्थिनींचे एक काम आहे ते करून द्याल का?आपण त्यांना भेटायला जाऊ या का?" तर म्हणाले, "गेलो असतो हो... पण फार बिझी असतात ना... असा "U"टर्न मारला की काही विचारू नका...हां !  पण या सगळ्यांमध्ये अनेक जण असेही भेटले..ज्यांना नात्यांचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला आहे.. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकासाठी यांच्या माणुसकीचा हात सदैव पुढे असतो..  खऱ्या नात्यांचा अर्थ इथे उमगतो..अश्या अनेकांपैकीं एक मैत्रीण मोठ्या शहरात राहते .गृहिणी पद सांभाळता सांभाळता अनेक लहान मोठ्या लोकांना सतत मदत करत असते. एकदा एका अतिशय प्रतिथयश  कवीचे शेवटचे काही दिवस तिने खूप सुसह्य केले, कधी गप्पा मारून , कधी हवे ते खायला घालून , कधी शुश्रूषा करत...पण तिने याची वाच्यताही कधी केली नाही. 
         
असे लोक पाहिले की नात्यांचा खरा अर्थ याना उमगला आहे असे वाटते मग ते नाते रक्ताचे असो वा आणखीन कोणतेही असो....!!
 
sjkmam@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸चिकणी सुपारी🔸
डॉ.अनुराधा कुलकर्णी

परवा ओटीच्या आलेल्या सामानातून तांदूळ बाजूला काढत होते. त्यात २रु चे नाण, खोबऱ्याचा तुकडा,हळकुंड आणि चिकणी सुपारी होती. चिकणी सुपारी हातात घेतली आणि मन सैरभैर झालं. डोळ्यासमोर 'आक्का'च आली.

आक्का म्हणजे माझी आजी! आईची आई, दिवाणबहाद्दूर गोडबोले यांची नात. ती चिकणी सुपारी खायची कातरून. भरडी सुपारी तिला लागायची व ती लवकर मऊपण होत नाही म्हणून चिकणी सुपारी. ४फूट६-७इंच उंचीची,वजन ३२-३५किलो असलेली होती माझी आक्का! आयुष्यभर सर्वांवर फक्त प्रेम आणि प्रेमच केलं तिने. कधी कोणावर रागावणं, चिडणं, द्वेष करणं तिच्या शब्दकोशातच नव्हतं.११वी पासून शिकायला मी तिच्याकडे होते. सर्व काम तिनेच शिकवले मला. रोज सकाळी साडेचार वाजता उठायची. वाड्यातील कुणाशी भांडण नको म्हणून। सर्वजण उठायच्या आत ती मला आवरायला लावायची. देवपूजा करून माझं आवारेपर्यंत घासण्यासाठी लगबगीनं उपकरणी तिसऱ्या मजल्यावरून खाली आणून द्यायची. कामं करून कोणीही मरत नाही असे म्हणायची. तेंव्हा इतका राग यायचा तिचा पण त्याचाच आता आयुष्यभर उपयोग होतोय आणि त्याचा अर्थही आता समजू लागलाय. आजारी असलेल्या आजोबांचं,अण्णांचं ७वर्षे अंथरुणावर तिने सर्व  केलं. प्रत्येकवेळी बेडपॅन स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली यावं लागायचं तेव्हा. आंघोळीनंतर आक्काचा मेकअप आम्ही बघायचो. तिची लाकडी पेटी होती. त्यालाच आरसा होता. फणीनी वेणी घालायची. आधी मेण, मग त्यावर कुंकू.  चापून चोपून९वारी नेसायची. हौशी तर एवढी होती की आण्णा असेपर्यंत तिच्या डोक्यांतल फूल काही हालल नाही आणि मंगळवार, शुक्रवार जोगेश्वरी चुकली नाही.आमच्याकडे झोपाळा होता. बसायला येणाऱ्या मुलांसाठी खडीसाखर आणून ठेवी. तिचे उपास असायचे. त्यासाठी मीठ, साखर, दाण्याचं कूट वेगळे असायचे. मी तिला  म्हणायची,'वाणी तुझी साखर त्याच तराजूत तोलतो. त्यावर म्हणायची, दृष्टीआड सृष्टी!  फक्त २री शिकली होती, पण न चुकता वर्तमानपत्र वाचायची. दिवसभर नातवंडांना सांभाळायची,तेहीआनंदाने. म्हणी अगदी चपखलपणे वापरायची.पोत काम सुरेख करायची. तिला एकदा बरे नसताना दवाखान्यात नेऊन सर्व तपासण्या करून आणल्यावर तिला त्याचं एवढं अप्रूप वाटलं! लौकिकदृष्ट्या व्यवहार तिला कधी जमलाच नाही.'अजातशत्रू होती आक्का!  वयोमानानुसार थकत गेली आणि अण्णांना भेटायला निघून गेली. मला नेहमी म्हणायची, मी मेले की तुला माझी आठवण येईल. खरच बरोबरच होतं तिचं. 
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
     
🔸नातं गुरू शिष्याचे🔸
लेखन- सौ. वैजू फडके

'नातं' वाचनकट्ट्याचा आजचा हा विषय काही नवीन नाही. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. नाती अनेक प्रकारची असतात. आपण ती अनुभवत असतो. रक्ताची नाती,  मित्रमैत्रिणी बरोबर असलेली नाती, आपल्या सहवासात आलेल्या अनेकांशी असलेली वेगवेगळी नाती. अशी अनेक नाती आपण जपत असतो. यामध्ये गुरुशिष्याचे नातेदेखील असते. हे मी अनुभवले आहे. जवळजवळ वीस वर्षे क्लासेस घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांशी माझं नातं जोडलं गेलं. विद्यार्थी अगदी निर्व्याज प्रेम करत असतात. आयुष्यभरासाठी टिकणारी ही एक शिदोरीच असते.  त्यांच्याकडूनही आपल्याला खूप शिकता येते.       

सुरवातीला विरंगुळा म्हणून सुरू केलेले नंतर गरजेपोटी वाढवलेले क्लास हा माझा एक ठेवाच आहे. हे क्लास बंद करताना मला अतिशय त्रास झाला. माझे विद्यार्थीसुदधा त्यावेळी हळवे झाले होते. नाहीतर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ सहा ते सात तास मी त्यांच्यातच असायचे. विद्यार्थ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यांनी माझ्या शिकवण्याचे चीज केले.
 
मला आजही तो दिवस आठवतो. वीसेक वर्ष झाली असतील. एक दिवस माझा क्लास चालू होता. आणि अचानक एक बाई व तिच्याबरोबर एक सहावी सातवीतील मुलगा माझ्याकडे आले. ती बाई त्याला शिकावणीसाठी घेऊन आली होती. अगदी केविलवाणा दिसत होता तो. अचानक माझ्याजवळ येऊन माझ्या पाया पडत तो म्हणाला,"बाई, मला तुमच्याकडे क्लासला यायचेच आहे." हे वाक्य मी अजूनही विसरले नाही. लवकरच माझ्या लक्षात आले की तो अतिशय बुद्धिमान व कष्टाळू आहे. हलाखीची परिस्थिती असूनही शिकण्याची जिद्द आहे. मी सुद्धा मग ठरवले की त्याला होईल तेवढे आपण शिकवायचे. आज तोच मुलगा म्हणजे निखिल, सी.ए. होऊन दिल्लीला मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पदावर आहे. मात्र अजूनही तो माझ्या संपर्कात आहे. छोट्या मोठ्या गोष्टी तो मला सांगतो, सल्ला विचारतो. मागील वर्षीच लग्न ठरवताना तो पत्नीला घेऊन आला होता. मला या नात्याचा अभिमान वाटतो.

असे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत. क्लास सोडून पुढील शिक्षणासाठी जाताना कितीतरी मुले भावुक होत असत. उत्तम गुण मिळाल्यावर त्यांना होणारा आनंद आजही मला आठवतो. आजदेखील गुरुपौर्णिमेला कित्येक विद्यार्थी फुले घेऊन येतात,काहींचे फोन येतात. बहुतेक विद्यार्थी आजही माझ्या संपर्कात आहेत. काही विद्यार्थी इंजिनियर, काही डॉक्टर तर काही सीए झाले आहेत. काहीजण पुढील शिक्षणासाठी परदेशी गेले आहेत. विशेष म्हणजे इकडे आल्यावर मला भेटण्यासाठी ते आवर्जून येतात. काहींना मी ओळखू शकत नाही. पण ते मात्र मला विसरले नाहीत. रस्त्याने जाताना , एखाद्या दुकानात अचानक एखादा विद्यार्थी समोर येऊन विचारतो,"मॅडम, मला ओळखलंत का?" खरं तर चेहरा ओळखीचा वाटत असतो पण नाव आठवत नसते. मग त्यांनी ओळख सांगितल्यावर खूप छान वाटते.  असे हे माझे अनेक विद्यार्थी आणि त्यांचे व माझे असलेले नाते मी हृदयात जपून ठेवले आहे. ते चिरंतन राहील.

vaijuphadake23@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

2 comments:

  1. खुप छान.. नातं रंगवले आहे,..काळ वेळ न बघता विचार जुळले की नातं आपोआप जुळतं..एका मोत्याच्या माळेत गुंफुन राहत..

    ReplyDelete
  2. 'ये जो खिडकी है' खूप भावले . नातं हा जिवलग , मित्र किंवा परिचित एवढयापुरता छोटा विषय नसावा . ते चालत्या-बोलत्यांशीही असलं पाहिजे असं नाही . कांही नाती त्या क्षणाची असतात पण खूप कांही देऊन जातात . धावणाऱ्या गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना दिसणाऱ्या पाळणाऱ्या निसर्गाशी असलेलं नातं कोणी नाकारू शकतो ? तो क्षण आनंदी करणारं , द्वैतभाव संपवणारं , आपलेपणानं कवेत घेणारं नातं लाखमोलाचं , नाही का ?

    इथे तो दवाखान्यातील आंधळा पेशंट , ज्याची कॉट खिडकीजवळ होती व खोलीतील दुसऱ्या डोळस पेशंटला ( ज्याला उठता-बसता येत नव्हते व शेजारचा आंधळा आहे हे माहीत नव्हते .. ) बाहेरील बागेचे , येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे, वाहनांचे , शाळेतील मुलांचे , बागेतील प्रेमी युगुलांचे वर्णन असे कांही सांगायचा की ऐकणारा दुसरा तो हरखून जायचा . दुर्दैवाने तो आंधळा मृत्यू पावतो आणि हा डोळस त्या खिडकीजवळ स्वतःची कॉट ठेवतो व खिडकीबाहेर पाहतो . तर बाहेर ना रस्ता असतो , ना बाग असते . तिथे समोर पन्नास फुटावर भली उंच तुरुंगाची भिंत असते ! आता त्या डोळस माणसाला प्रश्न पडतो की त्याचा पार्टनर कशाचे वर्णन करायचा ? तो तिथल्या नर्सला विचारतो . ती सांगते , " अहो , तो तर आंधळा होता ! " आता मात्र या डोळस रुग्णाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात . त्या अंधळ्याने त्याचे तिथले सर्व दिवस कसे आनंदी व टवटवीत केलेले असतात !काय नाव द्यायचे या नात्याला ?

    🙏🙏

    ReplyDelete